तबला / पखवाज रियाज पद्धती

0

तबला / पखवाज रियाज पद्धती

तबला / पखवाज रियाज पद्धती

भाग - १  

                    संगीत ही एक अशी कष्टसाध्य कला आहे की जिला प्रचंड मेहनतीची असते. या मेहनतीलाच संगीताच्या भाषेत 'रियाज' म्हटले जाते. या मेहनत करण्यालाच व्यावहारिक भाषेत 'सराव' असे म्हणतात. तबलावादन ही पण एक अतिशय कष्टसाध्य कला आहे. चामड्याने मढविलेल्या लाकूड व धातूच्या भांड्याच्या पृष्ठभागावर आघात करून विशिष्ट ध्वनी निर्माण करणे हे खचितच अवघड होय. म्हणजेच तबल्याची जी भाषा निर्माण झाली आहे ती प्रतिकात्मक असल्याने या भाषेचे प्रथमतः वाणीद्वारे म्हणजेच ' पढंत द्वारे मनावर / मेंदूवर संस्कार करून मग त्याची 'बजंत' म्हणजेच ते शब्द वाद्यातून कसे काढायचे हे शिकावे लागते. यामुळेच तबलावादन अवघड आहे. पण प्रामाणिक मेहनत घेणाऱ्यास काहीच कठीण नाही हेही तितकेच खरे.                                                                                               

                        भारतीय संगीतावर अध्यात्माचा खूप प्रभाव आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी संगीतशिक्षणही अध्यात्माप्रमाणे गुरुकुल पद्धतीने दिले जात असे. त्यावेळी केवळगुरूच्या आज्ञेचे पालन करून मिळेल तेवढी विद्या पदरात घेणे एवढेच शिष्याच्या हातात असे. त्यामुळे रियाज म्हणजे काय हे कळावयास पण वेळ लागत असावा. पण एवढे मात्र नक्की की गुरुआज्ञेचे तंतोतंत पालन केल्यावर आपोआपच शिष्याला कलेचे पैलू पडत होते. फक्त शिष्य रियाज म्हणजे काय हे व्यक्त करू शकत नसावा. काळ बदलला तशी परिस्थिती बदलली. गुरुकुलांचे रूपांतर विद्यालयीन शिक्षणात होत गेले. यावेळी शिष्याला गुरुकडे काही शंका विचारण्याची मोकळीक मिळू लागली. शिष्य आपापल्या शंका विचारू लागले. आजच्या काळात विद्यालये तसेच महाविद्यालये, विविध विद्यापीठे येथे संगीत शिकवले जाते. येथे संगीताच्या पदवी-पदव्युत्तरपर्यंत परीक्षा संपन्न केल्या जातात. यासाठी लिखित व क्रियात्मक अभ्यासक्रम राबवला जातो. यासाठी तज्ज्ञ शिक्षक असतात. त्यांना विद्यार्थी शंका विचारू शकतात. तसेच हल्ली विविध सेमिनार, कार्यशाळा यांद्वारे विविध विषयांवर चर्चा, व्याख्याने आयोजित केली जातात. यामध्ये रियाजाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. या सर्व गोष्टींमुळेच आजचा तबल्याचा विद्यार्थी रियाज' या संज्ञेबाबत अनभिज्ञ नाही. (याचा अर्थ पूर्वीचे शिष्य रियाजाबद्दल अनभिज्ञ होते असे नव्हे. पण त्यांना गुरुला काही विचारण्याची सोय नव्हती. शिष्याच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक त्या गोष्टी गुरु त्याच्या कानाला धरून करवून घेत असे. त्यामुळे शिष्यांना काही विचारण्याची गरज नसायची. पण कदाचित त्यावेळी शिष्य ते नेमक्या शब्दात व्यक्त करू शकत नसावेत.) आता गुरु-शिष्य नात्यात शिष्याला बऱ्यापैकी स्वातंत्र्य मिळाल्याने तो मुक्तपणे गुरुला शंका विचारू शकतो. पण असे असूनही अजूनही खूप जण 'रियाज' या संकल्पनेबाबत अनभिज्ञ आहेत. काही जण खूप चांगले वाजवितात. रोज खूप सराव करतात. पण अजूनही त्यांना आपण दैनंदिन सराव करतो तो 'रियाजा'त मोडतो की नाही? हे पुरेसे माहीत नसते. आणखी एक गोष्ट म्हणजे रियाज या विषयावर लिखित स्वरूपात ठोस माहिती फारशी उपलब्ध नाही. यामुळे बऱ्याच जणांना रियाज ही संकल्पना नवखी वाटते. तर काहीजण योग्य मार्गे रियाज करत असूनही त्यांना ही खात्री नसते की आपला सराव योग्य चालू आहे. त्यामुळे अतिसावधानतेपोटी ते सरावाचे विविध मार्ग अवलंबत असतात. कधी सहाध्यायांचे ऐकून तर कधी काही वाचून अथवा मोठ्या लोकांचे काही ऐकून त्यांचा खूप गोंधळ होतो व ते पुनःपुन्हा आपणरियाजाच्या योग्य वाटेवर आहोत की नाही याची खातरजमा करत असतात. या सर्व गोष्टी बहुतांश वेळा योग्य मार्गदर्शन नसल्याने अथवा विद्यार्थ्याचा गुरुवरील विश्वास डळमळीत झाला असल्यास घडून येतात. म्हणून या गोष्टी टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे तसेच ज्याला गुरू म्हणून स्वीकारले आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास हवा. तसे पाहता भारतीय संगीतातील प्रत्येक 'विधा' म्हणजे प्रकारासाठी रियाज अत्यंत महत्त्वाचा असतो. 

                      तबलावादकाला चांगला तबलावादक बनण्यासाठी खूप दृष्टिकोन अभ्यासावे लागतात. कारण तबला हे वाद्य भारतीय शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील बहुतेक सर्व विधांना (प्रकार) परिमाण म्हणून काम करत असल्याने तबलावादकाला या सर्व प्रकारांचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय तो उत्कृष्ट संगीतकार बनूच शकणार नाही. त्यामुळे त्याला दैनंदिन रियाजावेळी या सर्वांचे भान ठेवावे लागते. यामुळेच तबलावादकाच्या रियाजाच्या कक्षा रुंदावतात. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे स्वतंत्र वादन, यावर प्रभुत्व प्राप्त करणे त्याला सर्वप्रथम आवश्यक असते. आता स्वतंत्र वादनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्याला बऱ्याच गोष्टींची आराधना करावयास लागते. ती म्हणजे सर्वात प्रथम बोलांची स्वच्छता (स्पष्टता), सुयोग्य निकास, स्वतंत्र तबलावादनातील विविध संकल्पनांमागील व्याकरणाचा अभ्यास, घराण्यांचा अभ्यास, विविध ताल, त्यांची प्रकृती, विविध लयकारी त्यांची पढंत व प्रत्यक्ष वादनात उपयोग, तबल्यातील नादसोंदर्य, शब्दसौंदर्य, गणितीसौंदर्य यांचे अध्ययन. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तबल्यातील दोन प्रमुख बाज व या वाद्याची बनावट लक्षात घेऊन या वाद्याला वादनातून योग्य न्याय देणे इ. ही आराधना म्हणजेच रियाज होय. अर्थात सोलोसाठी व साथसंगतीसाठी वेगवेगळा वेळ देऊन रियाज करावा लागतो असे काही नाही. कारण ज्यावेळी सोलोसाठी विलंबित लयीत एखाद्या बोलाचा तासन्तास रियाज सुरू असतो तो रियाज साथसंगतीसाठीही उपयुक्तच असतो. तसेच साथसंगीताच्या रियाजाकरिता उत्तम उपाय म्हणजे जमेल तेवढा वेळ, जमेल तितक्या लोकांबरोबर साथसंगत करत राहणे व सतत मोठमोठ्या तबलावादकांनी केलेली साथसंगत ऐकत राहणे. कारण 'सुनना आधा सिखना होता है' असे बुजुर्ग सांगतात.खूप जणांचा असा मोठा गैरसमज आहे की, रियाज म्हणजे केवळ प्रत्यक्ष वादनाचा सरावच होय. थोडक्यात केवळ 'प्रॅक्टिकल प्रॅक्टिस' म्हणजे रियाज असे त्यांना वाटते. पण हे चुकीचे किंवा अर्धवट सत्य आहे. रियाजाबद्दल विचार करताना सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवावी की, रियाज ही संकल्पना केवळ शारीरिक मेहनतीशी संबंधित नसून तिचा मन अथवा मनोव्यापारांशी खूप जवळचा संबंध असतो. (म्हणूनच ज्या दिवशी आपली मनःस्थिती ठीक नसेल त्या दिवशी वादनात एकाग्रता होत नाही व ज्या दिवशी एखादी चांगली घटना घडून मन आनंदी असेल त्या दिवशी वादनावेळी उत्साह वाढलेला दिसेल.) ५-६ तास तबला वाजविला, पण मनात तिसरेच विचार असतील तर ते वाजवणे कुचकामी ठरते. त्यामुळे त्या वादनाला रियाज म्हणता येणार नाही. म्हणून जी गोष्ट आपण वाजवत आहोत त्याची मनातही तेवढीच आवर्तने व्हायला हवीत. त्यामुळे त्या रचनेतील सर्व प्रकारची सौंदर्यस्थळे हळूहळू लक्षात यायला लागून हातात आवश्यक ते बदल रियाजादरम्यान आपोआप होऊ लागतात व वादन निर्दोष होऊ लागते. खरेतर रियाज ही एक प्रक्रिया आहे की जी कलाकाराच्या प्रत्येक अवस्थेमध्ये निरंतर सुरू असते. दिवसेंदिवस कलाकाराचे मन प्रगल्भ होत असते. विविध अनुभव, थोरामोठ्यांच्या वादनाचे श्रवण, सहाध्यायांबरोबर चर्चा इ. मुळे स्वतःला चाचपणे म्हणजेच आपण नेमके कोठे आहोत हे तपासणे सतत सुरू असते. त्यातून स्वतःमधील दोष, त्रुटी कळतात. या अर्थातच मनाला कळतात व मनच त्यातून मार्ग काढते व एका नवीन दृष्टिकोनातून, नवीन काहीतरी साध्य करायला पुन्हा रियाज सुरू होतो. म्हणूनच मी म्हणतो की रियाज ही केवळ कलाकाराच्या शरीराशी संबंधित गोष्ट नसून तिचा कलाकाराच्या मनाशी खूप जवळचा संबंध आहे.

पुढील भागात आपल्याला रियाजाच्या काही पद्धती वाचायला मिळतील.


तबला / पखवाज रियाज पद्धती (भाग - २) वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top