वारकरी संगीतातील प्रमुख वादये
१) वीणा -
हे एक तंतुवाद्य आहे. पोकळ लाकडापासून हे वादय तयार केलेले असून याला चार तारा आणि चार खुंट्या असतात. खुंटीच्या साहाय्याने तारांवरील ताण कमी-जास्त करून गायक आपल्याला हव्या त्या स्वरात वीणा मिळवू शकतो. याचा उपयोग वारकरी संगीतात केला जातो.
२) पखवाज / मृदंग -
हे अवनद्ध प्रकारचे वाद्य आहे. हे वारकरी संगीतातील प्रमुख तालवादय आहे. मृदंग लाकडी खोडांपासून तयार करतात. दोन्हीच्या तोंडावर कातडे ताणून बसवलेले असते. त्याला पुडी म्हणतात. पुडीवर शाई चढवलेली असते. या वाद्याचा उपयोग साथीसाठी, तसेच स्वतंत्र वादनासाठी करतात.
३) हार्मोनियम-
हार्मोनियम हे सुषिर वाद्य आहे. हे वाद्य हवेच्या साहाय्याने वाजते. ही एक लाकडाची पोकळ पेटी असून त्यात हवा भरण्यासाठी भाता असतो. समोरील भागात काळ्या-पांढऱ्या पट्ट्या असतात. भात्याने हवा भरून कोणतीही पट्टी दाबल्यास स्वर वाजतो. हे खेडोपाडी पोहचलेले वादय आहे. याचा उपयोग साथीसाठी तसेच स्वतंत्र वादनासाठी ही होतो.
४) टाळ -
टाळ हे घनवादय आहे. वारकरी संगीतातील हे एक प्रमुख वादय आहे. दोन टाळ हातांत घेऊन एकमेकांवर आघात करून ताल धरतात. क्वचित दोन्ही टाळ एका हातात घेऊनही वाजवतात. टाळ जसे पितळी असतात तसे ते दगडी किंवा इतर धातूंपासूनही बनतात. काशाचे टाळ उत्तम नाद देतात.
जगद्गुरू संत तुकोबाराय म्हणतात,
लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष ।
सेवू ब्रम्हरस आवडीने ||