भारतीय संगीताचा इतिहास
भारतामध्ये संगीताची निर्मिती कधी झाली, कशी झाली किंवा कोणाद्वारे झाली याबाबत वेगवेगळ्या स्वरूपाची मते पहावयास मिळतात. मानवाच्या आध्यात्मिक विकासाबरोबर संगीताचा विकास होत गेला आहे. संगीताच्या निर्मितीबाबत अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु त्यापेक्षा आदिकाळापासून ते आजपर्यंतच्या काळापर्यंत संगीताचा विकास कसा झाला हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल. प्रागैतिहासिक काळापासून ते आजपर्यंतच्या काळापर्यंत भारतीय संगीताच्या झालेल्या विकासाचा कालखंड सर्वसाधारणपणे तीन भागांत विभागला जातो.
अ].मध्य काळ (इ.स. ८०० ते इ.स. १८०० पर्यंत)
ब]प्राचीन काळ (आदिकाळ ते इ.स. ८०० पर्यंत)
क]आधुनिक काळ (इ.स. १८०० ते आजपर्यंत)
(अ) प्राचीन काळ: सर्वसाधारणपणे आदिकाळापासून ते इ.स. ८०० पर्यंतच्या कालखंडास ‘प्राचीन काळ’ असे संबोधले जाते. प्राचीन कालखंडाचे तीन कालखंडांत विभाजन केले जाते. १.वैदिक काळ २.संदिग्ध काळ ३.भरत काळ .
(१) वैदिक काळ : वैदिक काळाची सुरुवात आदिकाळापासून झाल्याचे दिसून येते. याच कालखंडात हिंदू धर्मातील चारही वेदांची निर्मिती झाली. वेदांच्या निर्मितीमुळेच या कालखंडाला‘वैदिक काळ’ असे म्हणतात. सामवेद, ॠग्वेद, यजुर्वेद व अथर्ववेद या चार वेदांपैकी सामवेद हा पूर्णपणे संगीतमय असल्याचे दिसून येते. यामध्ये मंत्रांचे पठणसुद्धा संगीतामध्येच असे. यातील सामगायनामध्येस्वरीत, उदात्त व अनुदात्त या तीन स्वरांचा प्रयोग केला जात असे. पुढे कालपरत्वे या तीन स्वरांवरून चार स्वर, चारवरून पाच स्वर व पुढे पाचवरून सात स्वरांपर्यंत असा स्वरविकास याच वैदिक कालखंडात झाला हे या ‘सप्त स्वरतु गीतन्ते सामभि: सामगैबुधै।’ ओळीवरून सिद्ध होते. तसेच वैदिक काळात निर्माण झालेल्या अनेक ग्रंथांतही गायनाबरोबर दुन्दुभी, भूमीदुन्दुभी, वानस्पति, आघाती, कांडवीणा, वारण्याम, तूणव व बांकुर इत्यादी वाद्यांचा उल्लेख आढळून येतो. यावरून वैदिक कालखंडात संगीताची निर्मिती व साधना झाली असे म्हणता येते.
(२) संदिग्ध काळ : या कालखंडात निर्माण झालेल्या ग्रंथांमध्ये संगीताचे जरी वर्णन नसले तरी काही उपनिषदांमध्ये संगीताचा मोठ्या प्रमाणात व सामगायनाचा थोड्या फार प्रमाणात उल्लेख आढळतो.
(३) भरत काळ : प्राचीन कालखंडातील ‘भरत काळ’ हा संगीताच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ समजला जातो. ज्याप्रमाणे आजच्या काळात ‘राग-गायन’ प्रचलित आहे. त्याचप्रमाणे भरत काळात जाति- गायन प्रचलित होते. तसेच याच कालखंडात सर्वप्रथम तीन ग्राम, बावीस श्रुति, सात स्वर, अठरा जाती व एकवीस मुर्छना इत्यादींचे वर्णन दिसून येते. या कालखंडात भरत मुनिंचे ‘नाट्यशास्त्र’, मतंग मुनिंचे ‘बृहद्देशी’ दत्तिलांचे ‘दत्तिलम’ व नारदांचे ‘नारदीय शिक्षा’ अशा ग्रंथांची निर्मिती झाली.
(ब) मध्यकाळ : वैदिक काळानंतरचा काळ म्हणजे ‘मध्यकाळ’ होय. सर्वसाधारणपणे मध्यकाळाची विभागणी दोन भागांमध्ये केली जाते. अ]पूर्वमध्य काळ ब]उत्तर मध्य काळ
(१) पूर्वमध्य काळ : ‘पूर्वमध्य काळ’ हा मध्य काळाच्या पूर्वार्धातील महत्त्वाचा काळ मानला जातो. आजच्या कालखंडात जसे, ‘राग-गायन’ प्रचलित आहे. तसेच पूर्वमध्य काळात प्रबंध गायन प्रचलित होते. म्हणून या कालखंडास ‘प्रबंध काळ’ असे देखील म्हटले जाते. पूर्वमध्य काळामध्ये संगीतातील काही महत्त्वाच्या ग्रंथांची निर्मिती झाली, ती खालीलप्रमाणे ➤संगीत मकरंद : ‘संगीत मकरंद’ या ग्रंथांची निर्मिती पूर्वमध्य काळात महर्षी नारद यांनी केली. या पुस्तकांमध्ये सर्वप्रथम रागांचे वर्गीकरण स्त्री, पुरुष व नपुंसक वर्गात केलेले आढळते. यामुळेच या ग्रंथास ‘राग-रागिणी’ पद्धतीचा आधारग्रंथ मानले जाते. ➤गीत गोविंद : गीत गोविंद या ग्रंथाची निर्मिती पं. जयदेव यांनी केली. पं. जयदेव हे केवळ कवीच नाही तर उत्तम गायकदेखील होते. या ग्रंथाच्या माध्यमातून केलेल्या गीतांचा संग्रह संस्कृतमध्ये केल्याचे दिसून येते. ➤संगीत रत्नाकर : ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथाची निर्मिती शारंगदेव यांनी केली. या ग्रंथाला उत्तर संगीत व दक्षिण संगीताचा आधार आहे.
(२) उत्तरमध्य काळ : उत्तरमध्य काळ हा मध्य काळाच्या उत्तरार्धातील महत्त्वाचा काळ आहे. या काळात उत्तर भारतीय संगीताचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. म्हणून या काळास ‘विकास काळ’ असेदेखील म्हटले जाते. उत्तरमध्य काळात सर्वच राजांनी संगीताला राजाश्रय दिला असलातरी प्रामुख्याने मुसलमान राजांनी संगीततज्ज्ञांना आश्रय देऊन संगीतास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. पुढील काही मुसलमान राजांमुळे उत्तरमध्य काळातील संगीताला चालना मिळाली. ➤(१२६९ ते १३१६) : अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात अमीर खुसरो हा संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध विद्वान म्हणून ओळखला जात होता. असे म्हटले जाते की, त्याने वाद्यांमध्ये तबला व सितार, रागांमध्ये साजगिरी, सरपरदा, जिल्फ इत्यादी तर गायनामध्ये कव्वाली व तराणा आणि तालांमध्ये झुमरा, सुलताल व आडा चारताल (चौताल) इत्यादींची निर्मिती केली. ➤(१४५८ ते १४९९) : सुलतान हुसेन शर्की हे जौनपुर संस्थानचे राजा होते तसेच विद्वानदेखील होते. त्यांनी ‘बडा ख्याल’ प्रकार निर्माण केला. ➤ (१४८६ ते १५१७) : मानसिंह तोमर हे ग्वाल्हेरचे तत्कालीन राजा होते. त्यांच्या पदरी नायक-बख्शु हे प्रसिद्ध धृपद गायक होते. मानसिंह तोमरपासूनच संगीतातील ग्वाल्हेर घराण्याची सुरुवात झाली. राजा मानसिंह यांनी “मान कौतुहल” नावाचा ग्रंथ लिहिला. ➤(१५५६ ते १६०५) : अकबर हा स्वत:च संगीतप्रेमी असल्याने त्याच्या कालखंडात संगीताची मोठी प्रगती झाली. अकबराच्या दरबारात छत्तीस संगीतज्ज्ञ होते. त्यामध्ये प्रामुख्याने गोपाल नायक, बैजू, तानसेन इत्यादींचा समावेश होता. या सर्वांत तानसेन हा मुख्य होता. तानसेनाने अनेक रागांच्या रचना केल्या आहेत. त्यामध्ये दरबारी कानडा, सारंग, मल्हार इत्यादींचा समावेश होतो. तसेच तानसेनाने तयार केलेले धृपद आजही गायले जाते. याच कालखंडात तुलसीदास, सुरदास, मिराबाई इत्यादींच्या काव्य रचनांची आणि ‘रागमाला’, ‘रागमंजरी’, ‘सद्राग चंद्रोदय’ व ‘नर्तन निर्णय’ इत्यादी ग्रंथांची निर्मिती झाली. ➤(१६०५ ते १६२७) : जहाँगीरच्या दरबारात विलासखाँ, भक्खु इत्यादी संगीततज्ज्ञ होते. इ.स. १६१० मध्ये ‘रागविबोध’ नावाची ग्रंथरचना पं. सोमनाथ यांनी केली. इ.स. १६२५ मध्ये पं. दामोदर मिश्र यांनी ‘संगीत दर्पण’ नावाचा ग्रंथ लिहिला. ➤(१६२७ ते १६५८) : शाहजहाँच्या दरबारात दिरग खाँ व ताल खाॅं, विलासखाँ व लाल खाँ हे संगीततज्ज्ञ होते. या कालखंडात पं. दय नारायण देव यांनी ‘ दय कौतुक’ व ‘ दय प्रकाश’ या ग्रंथांची निर्मिती केली. ➤(१६५८ ते ७००) : औरंगजेबाच्या काळात म्हणजे इ.स. १६६० मध्ये पं. व्यंकटमखी यांनी ‘चतुर्दन्डी प्रकाशिका’ नावाचा ग्रंथ लिहिला. याच काळात भावभट्ट यांनी ‘अनुप संगीत रत्नाकर’, ‘अनुप और विकास’ आणि ‘अनुपाकुश’ असे तीन ग्रंथ लिहिले. ➤(१७१९ ते १७४८) : मोहम्मद शाह रंगीले हे स्वत: संगीतप्रेमी असल्याने त्यांच्या दरबारात ‘सदारंग’ व ‘अदारंग’ हे दोन गायक होते. त्यांचे ‘ख्याल’ आजदेखील प्रसिद्ध आहेत. याच काळात ‘टप्पा’ या प्रकाराची निर्मिती झाली. त्यानंतर म्हणजे १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुसलमानांचे राज्य हळूहळू संपुष्टात येऊ लागले व इंग्रजांचे प्रभुत्व वाढू लागले. या कालखंडात ‘त्रिवट’, ‘गझल’ व ‘तराने’ मोठ्या प्रमाणात प्रचलित झाले.
(क) आधुनिक काळ : (१८०० ते आजपर्यंत) इ.स. १८०० ते आजपर्यंतच्या कालखंडास ‘आधुनिक काळ’ संबोधले जाते. या कालखंडाचे दोन भागात विभाजन केले जाते. पहिला भाग इ.स. १८०० ते १९०० व दुसरा भाग इ.स. १९०० ते आजपर्यंतचा कालखंड होय. आधुनिक कालखंडात फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि इंग्रज भारतामध्ये आले. यापैकी इंग्रजांनी भारतावर आपले वर्चस्व गाजवले. या कालखंडात संगीताचा जरी प्रखरतेने प्रचार व प्रभाव झालेला नसला तरी या कालखंडात संगीततज्ज्ञांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर संगीतातील काही घटकांची व ग्रंथांची निर्मिती केली. (१) आधुनिक कालखंडात जयपूर संस्थानच्या राजा प्रतापसिंह यांनी ‘संगीतसार’ या ग्रंथांची निर्मिती केली.या ग्रंथांमध्ये त्यांनी शुद्ध थाटातील बिलावलची मांडणी केली आहे. (२) आधुनिक काळात सन १८१३ मध्ये पटना येथील मुहम्मद रजा यांनी ‘नगमाते-आसफी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी त्या वेळेस वापरल्या जाणाऱ्या राग व रागिणी पद्धतीत असणाऱ्या शिव, कल्लीनाथ, भरत व हनुमान या मतांचे खंडण केले. तसेच या पुस्तकात त्यांनी काफी रागाच्या थाटाऐवजी बिलावल रागाच्या थाटास शुद्ध थाट मानला आहे. (३) कृष्णनंद व्यास यांनी याच काळात ‘संगीत राग कल्पद्रुम’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी धृपद व ख्याल गायकीचा समावेश केला. (४) बंगालमधील सर सौरेंद्र मोहन टागोर यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘युनिव्हर्सल हिस्ट्री आॅफ म्युझिक’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी राग-रागिणी पद्धतीचा स्वीकार केला. (५) २० व्या शतकात खऱ्या अर्थाने संगीताचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. संगीताच्या या प्रचार व प्रसाराचे श्रेय पं. विष्णुदिगंबर पलुस्कर व पं. विष्णुनारायण भातखंडे यांना जाते. (६) पं. विष्णु नारायण भातखंडे : २० व्या शतकात पं. विष्णुदिगंबर पलुस्करांबरोबर संगीत क्षेत्राला विस्तृत स्वरूप देण्याचे कार्य पं. विष्णु नारायण भातखंडे यांनी केले. क्रियात्मक संगीत व शास्त्र या दोन्ही विषयांवर महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. ह्यापैकी हिंदुस्थानी संगीत पद्धती सहा भागांमध्ये लिहिले. याशिवाय ‘अभिनव’ ‘राग मंजरी’, ‘लक्ष संगीत’, ‘भातखंडे शास्त्र’ (चार भागांत) इत्यादी ग्रंथनिर्मिती केली. (७) पं. विष्णु दिगंबर पलुस्कर : आधुनिक कालखंडातील संगीत प्रसाराचे खरे श्रेय पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांना जाते. त्यांनी जवळपास ५० संगीतविषयक पुस्तके लिहिली. त्यात पाच भागांमध्ये बालबोध, २० भागांत रागप्रवेश, पाच भागांत भजनामृत लहरी, संगीत बाल प्रकाश इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. (८) प्रसारमाध्यमे : अलीकडील कालखंडात आकाशवाणी व चलचित्र (सिनेमा) इत्यादींच्या माध्यमातून संगीताचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. आकाशवाणीद्वारा केवळ शास्त्रीय संगीतच नाही तर भावगीत, भक्तिगीत, भजन अशा सर्वांगीण स्वरूपाच्या कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले गेले. अशा प्रकारे भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आजपर्यंतच्या काळापर्यंत संगीत दिवसेंदिवस बहरत गेले हे आपल्या लक्षात आले.