तबला / पखवाज रियाज पद्धती
भाग - २
आता रियाजाच्या पद्धतींविषयी चर्चा करू.
आपल्या पूर्वजांनी अनुभवाच्या, निरीक्षणाच्या व कठोर साधनेच्या आधारे रियाजाबद्दल काही तत्त्वे, नियम तयार केले. त्यालाच आपण रियाजाच्या पद्धती म्हणून संबोधतो. रियाज हा केवळ एका गोष्टीसाठी नसून नानाविध गोष्टींच्या पूर्ततेसाठी करण्यात येतो. अर्थातच प्रत्येक उद्दिष्टासाठी रियाजाची पद्धत, तत्त्वे, नियम बदलतात. उदा. हाततयारी, बोलांची स्पष्टता, दमसास या तीनही गोष्टींसाठी रियाजाची पद्धत, तत्त्वे, नियम बदलतील. तसेच प्रत्येक वादकाची शारीरिक व मानसिक स्थिती भिन्न असते. अर्थातच प्रत्येकाच्या वादनातील बऱ्या-वाईट गोष्टी वेगवेगळ्या असतात. समर्थ व डोळस गुरु या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या शिष्यांकडून रियाज करून घेतो.
रियाजाच्या पद्धतीमध्ये सर्वात प्रथम अक्षरसाधनेचा क्रम लागतो. तबला - डग्यावरील सर्व वर्ण (अक्षरे) सुस्पष्ट वाजावीत या हेतूने 'अक्षरसाधना' या रियाजपद्धतीचा अवलंब केला जातो. नंतर दुसरी रियाजाची पद्धत बोलांची स्पष्टता येण्यासाठी अवलंबिली जाते. अक्षरसाधनेला प्रत्येक अक्षरावर भर दिला जातो तर त्यानंतर बोलामध्ये स्पष्टता निर्माण करण्यासाठी अतिशय विलंबित लयीत दीर्घकाळ एखाद्या बोलपंक्तीचे वादन/सराव केला जातो. यामुळे बोल स्पष्ट येण्यास मदत होते. नंतर वादनातील तयारीसाठी वेगळ्या पद्धतीने रियाज केला जातो. रोजच्या रोज आपला वेग किती वाढतो याची चाचपणी केली जाते. त्यासाठी रोज रचनेची थोडी लय वाढविली जाते व तो बोल अत्यंत तयारीत वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते. अर्थात यासाठी ती रचना ठराविक कालावधीपर्यंत हातात (वाजवत) रहाणे अत्यंत आवश्यक आहे. यानंतर दमसास म्हणजे शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी रियाज केला जातो. कारण एखादी रचना केवळ तयारीत वाजून उपयोग नाही. तर ती दीर्घकाळ वाजविण्याची व शेवटच्या मिनिटापर्यंत नादाची गुणवत्ता तीच टिकवून ठेवून वादन करण्याची शारीरिक क्षमता हवी. ही शारीरिक क्षमता म्हणजे दमसास होय. तर हा दमसास वाढण्यासाठी तयारीने वाजत असलेली रचना रोज लयीच्या चढत्या क्रमाने त्याच्या विस्तारासहित जास्तीत जास्त वेळ वाजवण्याचा प्रयत्न केला जातो. यात स्वतःकडून ही अपेक्षा असते की जी रचना कार्यक्रमात साडेतीन ते चार मिनिटे द्रुत लयीत वाजणार असेल ती रचना दमसासाच्या रियाजावेळी किमान १० ते १२ मिनिटे जास्तीत जास्त लयीत कणखरपणे व अविश्रांतपणे वाजावी. ही झाली थोडक्यात माहिती शारीरिक रियाजाची. अर्थात केवळ ही व हीच पद्धत व क्रम प्रत्येकजण पाळतो अथवा मानतो असे नाही. पण सर्वसाधारणपणे रियाजाचा प्रवास याच मार्गाने होतो. एक चांगला कलाकार बनण्यासाठी शारीरिक म्हणजेच क्रियात्मक रियाजाबरोबरच मानसिक (बौद्धिक) रियाजाची गरज असते.एखादी रचना कायदा आहे की रेला, ती दिल्लीची आहे की अजराड्याची या गोष्टी माहीत नसतील तर वादक शारीरिकदृष्ट्या तयार असून म्हणजे तयार वाजवत असूनही कोणत्याही प्रकारची सौंदर्यनिर्मिती करू शकणार नाही. हे मान्य की यासाठी विविध संकल्पना, घराणी, त्यांचे निकास, वैशिष्ट्ये यांचे एकदा अध्ययन केल्यास या गोष्टी कळू शकतात. पण तबल्यातील रचना जिवंत व्हाव्यात असे जर वाटत असेल तर त्या रचनेशी मैत्री होणे, सलगी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्या रचनेच्या क्रियात्मक रियाजावेळी त्या रचनेशी मनामध्ये सुसंवाद घडत जाणे आवश्यक आहे. यामुळे व्याकरणदृष्ट्या वादक तयार होईलच, पण त्याचे वादनही जास्त डोळस व सौंदर्यपूर्ण होईल. म्हणून एकदा त्या रचनेशी तुमचा संवाद सुरू झाला की त्या रचनेतील सौंदर्यस्थळे आपोआप तुमच्या हातामधून स्त्रवू लागतील. आता हा संवाद कोणत्या प्रकारे सुरू होईल अथवा विकसित होईल? हा प्रश्न पडणे साहजिक आहे. याचे उत्तर म्हणजे, ज्यावेळी आपण तबला वाजवित नसतो त्या प्रत्येकवेळी इतर काहीही करताना मनामध्ये अविरतपणे त्या रचनेची आवर्तने होणे आवश्यक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तबला हे वाद्यसंगीताचे परिमाण म्हणजे संगीत मोजण्याचे काम करतो. त्यामुळे कालगणती, कालाचे दीर्घ-सूक्ष्मादि भाग, दोन क्रियांमधील अंतर, लय, त्याचे पूर्णांकी - अपूर्णांकी प्रकार या सर्वांवर त्याचे प्रभुत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध ताल, त्यांचे ठेके, त्यांची ताली-खाली इ. ची संपूर्ण माहिती व ते ताल व त्याच्या विविध पूर्णांकी-अपूर्णांकी पटी हातावर ताली-खाली दाखवून म्हणता येणे, विविध संख्येने अक्षरसमूह अथवा आकडे यांच्या साहाय्याने अपूर्णांकी लयकाऱ्या हातावर ताल-खाली दाखवून म्हणणे इ. गोष्टी आवश्यक आहेत. हाच मानसिक अथवा बौद्धिक रियाज होय. बौद्धिक रियाजात याचबरोबर तबल्यातील सर्व प्रकारच्या रचनांची सुस्पष्ट पढंत ही एक आवश्यक गोष्ट आहे. कारण वाणी जेवढी स्वच्छ तेवढे वादन स्पष्ट. आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी साध्य करण्याकरता वेगवेगळ्या गोष्टींची उपाययोजना केली आहे. यालाही रियाजाच्या पद्धती म्हणता येईल. यापैकी काही गोष्टी खालीलप्रमाणे.
तबल्यामध्ये 'तिट', 'तिरकिट', 'क्डधिकिट', 'धिरधिर' असे अनेकमहत्त्वाचे बोल आहेत.
या प्रत्येक बोलांच्या अक्षरश: हजारो बंदिशी विविध बाजांमध्ये आढळतात. उण्यापुऱ्या ८० ते १०० वर्षांच्या आयुष्यात या सगळ्या बंदिशी हातात बसवून तयार वाजवणे हे केवळ अशक्य! म्हणून आपल्या पूर्वजांनी या समस्येवर तोडगा म्हणून 'मुरक्का' या रचनेची निर्मिती केली. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की मुरक्क्यामुळे प्रत्येक बोलाच्या प्रत्येकी हजारो बोलांवर प्रभुत्व मिळेल. ते कोणालाच शक्य नाही. कारण तबला व त्याच्या साहित्यासमोर मानव अत्यंत क्षुद्र. म्हणून याचा अर्थ एवढाच की एखाद्या बोलाचा मुरक्का केल्यास त्या बोलाच्या खूपशा रचना हातात बसवणे सोपे होते.
आता 'मुरक्का' म्हणजे काय ते पाहू.
'मुरक्का' ही रचना व्याकरणदृष्ट्या कायदा, रेला, तुकडा, गत इ. कोणत्याही रचनेत मोडत नाही. तो केवळ एक छोटा-मोठा बोलसमूह असतो व तो रचताना असा प्रयत्न केलेला असतो की तो वाजवायला खूप अवघड जाईल. 'तिरकिट'चा 'मुरक्का' असेल तर 'तिरकिट' वाजवायला कसे अवघड जाईल याचा विचार केलेला असतो. 'मुरक्का' या शब्दाचा अर्थ अर्क किंवा सार होय. अर्थात बोलावर सखोल व चोहोबाजूंनी विचार करून त्या बोलावर प्रभुत्व मिळविण्यासाठी निर्माण केलेली रचना म्हणजे 'मुरक्का' होय. महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे 'मुरक्क्या'चे स्वरूप वरीलप्रमाणे असले तरी काही कायदे व गतींची रचनाच अशी असते की ते 'मुरक्के'च असतात. उदा. 'घाधा तिट धाधा तींना' हा कायदा. हा कायदा म्हणजे 'तिट'साठी अतिशय प्रभावी 'मुरक्का' आहे. दुसरा 'मुरक्का' ही गत असून तो 'धिरधिर' या बोलाचा 'मुरक्का' आहे.
गत रचना उ. हाजी विलायत अली खाँसाहेब
धिरधिर किटधाऽ तिरकिट धिन्ना किटधा किटधा तिरकिट धिन्ना किटधाऽ तिरकिट धिन्ना किटतक तिरतिर तिरधिर धिरधिर धिरधिर ।
याचा रियाज केल्यास 'धिरधिर' वर चांगले प्रभुत्व येते. सलग दोन 'तिरकिट' येणाऱ्या रचनेसाठी खालील मुरक्क्याचा रियाज केला जातो.
तिरकिट तिरकिट तिरकिट धाधाकत ।
यानंतर दमसास वाढविण्याच्या दृष्टीने बुजुर्गांनी 'चिल्ला' या रियाज पद्धतीचा अवलंब केला. चिल्ला हा शब्द 'चेहलूम' या शब्दावरून आला असून याचा अर्थ '४०' असा आहे. या पद्धतीबद्दल बरेच समज-गैरसमज व मत-मतांतरे आहेत. उ. अमीर हुसेन खाँसाहेब यांच्याकडून चिल्ल्याबद्दलची जी नेमकी माहिती मिळाली ती पुढीलप्रमाणे..
'चिल्ला' हा रियाजाचा प्रकार दमसास / क्षमता वाढविण्याकरिता असल्याने येथे तुम्ही ज्या रचनेचा चिल्ला करणार ती रचना द्रुत लयीत सुस्पष्ट वाजत असेल हे गृहीत धरले आहे. त्यामुळे तयारीने वाजणारी रचना निवडून पहिल्या दिवशी वरच्या लयीत ती रचना त्याच्या विस्तारासहित ५ मिनिटे वाजवावी. दुसऱ्या दिवशीपासून १-१ मिनिट वाढवत जावा व लयही आदल्या दिवशीपेक्षा वाढवावी. शेवटच्या दिवशी (म्हणजे चाळिसाव्या) ती रचना अविरतपणे अर्ध्या तासापर्यंत सर्वात द्रुत लयीत वाजवावी. यामुळे त्या रचनेवर तुमचे प्रभुत्व प्राप्त होते. या झाल्या रियाजाच्या काही पद्धती. पण रियाज हा व्यक्तिसापेक्ष असतो. त्यामुळे रियाजाबद्दल विशिष्ट ठोकताळे बांधून ते सर्वांना लागू करण्यात कोणताच डोळसपणा नाही.