तबला वादकाचा ठेका

0

 
tabla

तबला वादकाचा ठेका


       ताल हा संगीताला स्थिरतेने स्थापित करणारा घटक आहे असे संगीत रत्नाकर या ग्रंथात लिहिले आहे. प्राचीन भारतीय संगीतातील अवघड मार्गी ताल आणि त्यातील विविध प्रकारच्या निःशब्द व सशब्द क्रियांपासून ते आधुनिक भारतीय शास्त्रीय संगीतातील तबल्यावर वाजल्या जाणाऱ्या तालांचे अस्तित्व तालाचे संगीतातील अद्वितीय स्थान दर्शविते. मार्गी तालातील अमूर्त ताल कालांतराने वाद्यांवर मूर्त स्वरुपात दर्शविला जाऊ लागला. प्राचीन काळातील त्रिपुष्कर, मृदंग, दुर्दर इत्यादी वाद्ये ताल वाद्यांद्वारे व्यक्त केला जाण्याचे पुरावे देतात. सध्याच्या काळात मृदंग(पखवाज) चौघडा, तबला आदी अवनद्ध वाद्ये तालदर्शक आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भारतात असलेल्या असंख्य अवनद्ध वाद्यांपैकी मृदुंग/पखवाज, तबला ह्या वाद्यांवरील नादवैविध्यांमुळे विविध बोलांची निर्मिती झाली. आणि या बोलांच्या आधारेच तालांचे विविध ठेके तयार झाले. मात्र बोलावर आधारित ठेके निर्माण करताना तालातील सम,काल, खंड-दर्शक बोल आणि त्यानुसार आघात यांची योजना झाली. हा झाला तांत्रिक भाग. तबला आणि पखवाज अथवा इतर कोणतेही अवनद्ध वाद्य वाजवणारा व्यक्तीचा हात, तिचा स्वभाव, तिचे शिक्षण आणि संस्कार याबरोबरच काळानुसार प्राप्त होणारा अनुभव यानुसार वादनात व्यक्तीसापेक्ष बदल पाहण्यास मिळतात. उदा: धा धिं धिं धा …. हा त्रितालाचा ठेका लाखो तबलजींनी आजवर करोडो वेळा वाजवलेला असेल. तरीही प्रत्येक तबलजीचा हाच ठेका वेगवेगळ्या पद्धतीने वाजला आहे. ‘घटाघटाचे रूप आगळे’ त्याप्रमाणे प्रत्येक तबला वादकाचे साथ करणे/ ठेका धरणे वेगळे असते. त्यामुळेच ऐकणाऱ्याला व गाणाऱ्या प्रत्येक वादकाच्या हाताचे वेगळेपण जाणवते. याबाबतीत फरक कशामुळे पडत असेल तर तो प्रमुखत: साथसंगत करणाऱ्या वादक ह्या व्यक्तीमुळे. हार्मोनियम वादकाबरोबर व इतर(गळा, हवामान वगैरे) गोष्टींप्रमाणे वेळेला गायकाचे गाणे तबला वादकावरही बरेचसे अवलंबून असते. त्यातून एखादा तबला वादक त्याच्या बरोबर अनेक काळ साथसंगत करीत असेल तर त्याच्या वाजवण्याची त्याला सवय झालेली असते. आता यातील सवय कशाची झालेली असते हे समजणे महत्वाचे आहे. वादकाच्या लयदारपणाबरोबरच तबला वादकाचा ‘दाया बाया’ मधून येणारा नाद, गायकाच्या गाण्याला वदनातून दिलेली दाद, हवे तिथेच वाजवणे आणि इतर वेळी लायदार ठेक्यामधून गायकाला विश्वास देणे याबाबतीत तबला वादक गायकाला संगत करत असतो. ‘संगतकार’ ह्या शब्दातच मुळी सगळं आलं. साथीचे स्वरूप अनेक घटकांवर अवलंबून असते. जसे की गायकीतील घराणी, गायक/गायिकेची तबियत, संगतकाराचा स्वभाव इत्यादी. शास्त्रीय गायनात अनेक घराणी आहेत त्यांना तबल्याची संगत ठराविक प्रकारची लागते. जयपूर पतीयाळा सारख्या घरण्याला स्वच्छ आसदार ठेका लागतो तर आग्रा ग्वाल्हेरच्या गायकीला भरीव आणि त्यांच्या बोलबांटीशी संवाद साधणारा ठेका लागतो.  त्या घराण्याअंतर्गत साथीचे स्वरूप समजून घेणे हा एक भाग आहेच. पण त्या त्या घरण्याला आवश्यक अशी साथ योग्य रीतीने करणारे दोन तबला वादकांच्या वादनामध्येही बराच फरक दिसतो. तो तसा असलाही पाहिजे. साथ सांगतीचे नियम पाळूनही या नियमांच्या चौकटीत राहून त्या गायकाच्या मनाला भिडणारे काम संगतकार करीत असतो. त्यामुळे ‘सवयीचा तबलजी’ ही उत्तम गायनासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे. कदाचीत त्यामुळेच गायक निव्वळ उत्तम स्वतंत्र तबला वादकाला घेण्याऐवजी जो साथ संगत उत्तम करतो त्याला बरोबर घेतात.      

     इथे एक स्पष्टीकरण करायला हरकत नाही की पुढील अवलोकन हे लय तालाची जाण असलेला गायक/गायिका व सांगतकार यांच्या बद्दलच आहे. या अर्थाने काहीवेळा तबला वादक दर्जेदार असूनही ते प्रसिद्ध असतीलच याबद्दल सांगता येत नाही. दर्जेदार म्हणजे केवळ प्रसिद्ध वादक असेच नव्हे, तर नाद लय आणि तालावर अरुढ होणारे उत्तम संगतकार असाही अर्थबोध होतो. या अर्थाने उत्कृष्ट तबला संगतकाराचे काम केवळ सम काल स्पष्टपणे दाखवणे, तयारीचे तुकडे वाजवणे, क्लिष्ट ठेकाभरी करणे यापेक्षा महत्वाचे असते. ते म्हणजे गायकाच्या गाण्याला प्रतिसाद देणे. ठेकाभरी, लयकारी हे भाग अवघड आहेतच पण गायकाचे काय? त्याच्यासमोर आणि श्रोत्यांसमोर स्वतःची तयारी दाखवणे हा तिथे प्रमुख मुद्दा नसतोच मुळी. बऱ्याच वेळा असे होते की गायक किंवा मुख्य कलाकार उत्तम सादरीकरण करणारा असतो आणि तबलावादक सुद्धा उच्च दर्जाचा असतो पण गायकाला तो पटत नाही आणि कार्यक्रम रंगत नाही. अशावेळी प्रेक्षकांकडून तबला संगतकारा विषयी काही कटू प्रतिक्रिया दुर्दैवाने ऐकायला मिळतात. “इतके उत्तम तब्बलजी असून सुद्धा गायकाला त्यांचे पटत नव्हते” अशा प्रतिक्रिया मी ऐकल्या आहेत. किंवा “अमुक एका गायकाला तमुक एक तब्बलजीच लागतो” त्यामुळे ”सगळीकडे राजकारण आहे” अशा प्रकारचीही प्रतिक्रिया ऐकायला मिळाली आहे. तर कधी कधी “काहीही म्हणा, अमुक एका तबलावादकाबरोबरच ह्या कलाकाराचा कार्यक्रम रंगतो” असेही ऐकायला मिळाले आहे. वरील तिन्ही प्रकारातून आपल्याला कधी निराशा, कधी मत्सर तर कधी कौतुकाची अनुभूती होते.साथ संगतीच्या बाबतीत नेहमीच “आमचे अमुक एक तब्बलजी यापेक्षा थोडं वेगळं वाजवतात हो” अशा हौशी कलाकारांच्या तक्रारीपासून अगदी कसलेल्या गायकाकडून तबला साथीदार बदलल्यामुळे “कुछ मजा नाही आ रहा है” अशा प्रकारची वाक्य ऐकावयास मिळतात. याबद्दल एक किस्सा इथे नमूद करायला हवा. एक सुरेल गाणारी गायिका घरी तबला वादकाबरोबर रियाझाला बसल्या होत्या. त्यांचा नेहमीचा संगतकार काही कामाने उपलब्ध नसल्याने त्यांनी दुसऱ्या वादकाला तात्पुरते बोलावले होते. आता ख्याल गाऊन झाल्यावर त्यांनी ‘दादरा’ हा गायनप्रकार गाण्यास सुरुवात केली. त्यांनी तबला वादकाला केरवा वाजवण्यास सांगितले. पण तबलजींचा ठेका  त्यांना काही केल्या पटेना. “आमचे नेहमीचे वादक” याहून काहीतरी वेगळं वाजवतात याच पालुपदावर त्या अडून बसल्या. उपस्थित वादकाने त्यांना केरव्याचे ठेक्याचे अनेक प्रकार वाजवून दाखवले पण यांना काही ते पटेना. शेवटी त्या तबला वादकाने त्यांचा निरोप घेतला. वरील उदाहरणावरून संथसंगतीतील अपरिहार्य व्यक्तीसापेक्षता लक्षात येते. पण या सगळ्यातून बाहेर पडून एक चिकित्सक वृत्तीने वाहू गेल्यास असे लक्षात येते की तब्बलजी जे वाजवतो ते गायकाला संगत म्हणून तर वाजवतोच शिवाय त्याबरोबरच तो गायकाच्या गायकीला प्रतिसाद सुद्धा आपल्या वादनातून देत असतो.हे प्रतिसाद तबला वादकाचा स्वभाव शिक्षण संस्कार यावर जसे आधारित असतात तसेच गायकाच्या स्वभावाचाही या प्रतिसादावर प्रभाव असतो. बऱ्याच वेळा साथ करणे म्हणजे “ठेका धरायला बैस” अशा गैरसमजात गुंडाळले जाते. पण साथ संगत हे प्रकरण “केवळ ठेकाच तर धरायचा आहे” यावर संपत नाही. ‘केवळ ठेका’ हा शब्द बऱ्याचवेळा फार अज्ञानातून वापरला जातो.

       साथसंगत आणि ठेका ह्यातील व्यक्तीसापेक्षता त्यामुळेच फार महत्वाची आहे.व्यक्तीसापेक्षता बाजूला ठेऊन  चिकित्सक दृष्टिकोनातून अनेक उत्तमोउत्तम गायक व गायिकांना या संदर्भात प्रश्न विचारला होता की सर्वप्रथम तुम्हाला तबलावादकाकडून कशाची अपेक्षा असते. अर्थात इथे ही अपेक्षा केवळ वादनाच्या बाबतीतच आहे हे समजूतदार लोकांनी लक्षात घ्यावे. या प्रश्नाचे उद्दिष्टय असे की तबलजी म्हटल्यावर गायक गायिकेच्या  मनात पहिली अपेक्षा काय असते? त्यांना त्याप्रमाणे चार पर्यायही दिले होते म्हणजे की -  

१. संगतकार म्हणजे कळण्यासारखा सुस्पष्ट ठेका देणारा 

२. किंवा क्लिष्ट अथवा तयारीचे वादन करणारा 

३. स्वैर वादन करणारा 

४. ठराविक वादक असण्याची गरज नाही. 

               त्यात बऱ्यापैकी कलाकारांनी स्वच्छ आणि नादमय ठेका त्यांच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. तर उरलेल्या बऱ्याच जणांनी भरणायुक्त ठेका याला आपली पसंती दिली. प्रत्येकाची आपापली आवड असते त्यानुसार त्यांची अपेक्षा सुद्धा असते आणि या अपेक्षा जो संगतकार पूर्ण करतो किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तो त्यांना भावतो. या अपेक्षा गायकीच्या घरण्याप्रमाणे आणि वैयक्तिक आवडीनिवडी प्रमाणे बदलत असल्या तरी साथ संगतकार आणि प्रमुख गायक यातील ताळमेळ हा विषय मात्र बदलत नाही. संगीत क्षेत्रात अशी बरीच नावे आहेत ति म्हणजे पं भीमसेन जोशी आणि पं शशिकांत उर्फ नाना मुळे, पं कुमार गंधर्व आणि पं वसंतराव आचरेकर, पं उल्हास कशाळकर आणि तालयोगी पं सुरेश तळवलकर. यात अजूनही काही नावे घेता येतील ती म्हणजे उस्ताद गुलाम रसूल खान, आनंद गोपाल बंदोपाध्याय, महापुरुष मिश्रा, केशवराव नावेलकर इत्यादी. वरील कलाकार साथीदार म्हणून असले की कार्यक्रम हमखास रंगणार. शेवटी गायक-साथीदार यांच्या ताळमेळातून आधी एकमेकाला आनंद प्राप्त होणे आणि त्याबरोबरच श्रोत्यांपर्यंत तो संक्रमित होणे हेच मैफलीचे आणि कलाकाराचे अंतिम उद्दिष्टय असते.


संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top