व्याख्या
संगीत :-
गायन, वादन व नृत्य या तिन्ही कलांचा ज्यामध्ये समावेश होतो त्यास 'संगीत' असे म्हणतात.
स्वर :-
गायन - वादनासाठी उपयुक्त नादास स्वर असे म्हणतात. मुख्य स्वर सात आहेत. त्यांची नावे षडज, रिषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद अशी आहेत. त्यांनाच व्यवहारीक भाषेत सा, रे, ग, म, प, ध, नी असे म्हणतात. हे शुद्ध स्वर आहेत.
कोमल स्वरः-
शुद्ध स्वर जेव्हा आपल्या स्थानापेक्षा खाली उतरतो तेव्हा त्यास कोमल स्वर असे म्हणतात. कोमल स्वर चार आहेत. (रे, ग, ध, नी)
तीव्र स्वरः-
शुद्ध स्वर जेव्हा आपल्या स्थानापेक्षा वर चढतो तेव्हा त्यास तीव्र स्वर असे म्हणतात. फक्त 'म' स्वर तीव्र होतो.
वर्जीत स्वर :-
रागात ज्या स्वरांचा वापर केला जात नाही. त्या स्वरांना त्या रागाचे वर्ज्य स्वर असे म्हणतात. उदा. भूप रागात म आणि नी हे स्वर घेतले जात नाही. त्यामुळे भूप रागात म, नी हे स्वर वर्ज्य आहेत.
सप्तक :-
सा पासून नी पर्यंतच्या क्षेत्रास की ज्यात सात शुद्ध स्वर आणि पाच विकृत स्वर असतात. त्यास सप्तक असे म्हणतात.
अलंकार (पलटा) :
- स्वरांच्या विशिष्ट आणि नियमबद्ध रचनेस अलंकार असे म्हणतात.
वादी :-
रागातील मुख्य स्वर की ज्याचा रागात जास्तीत जास्त वापर केला जातो त्यास वादी स्वर असे म्हणतात.
उदा. : भूप रागाचा वादी स्वर गंधार आहे.
संवादी :-
रागातील वादी स्वरानंतरच्या महत्त्वाच्या स्वरास संवादी स्वर असे म्हणतात. संवादी स्वर वादी स्वरापासून चौथा किंवा पाचवा असतो. उदा. :- यमन रागाचा वादी स्वर ग आणि संवादी स्वर नी आहे.
सरगम गीतः
- रागातील स्वरांना स्थायी-अंतरा मध्ये बांधुन तालबद्ध केलेल्या रचनेस सरगम गीत असे म्हणतात.
लक्षणगीत
ज्या गीतामध्ये रागाचे लक्षण सांगितले जातात त्या गीतास लक्षणगीत असे म्हणतात.
स्थायी-अंतरा :
गीताच्या पहिल्या भागास स्थायी व दुसऱ्या भागास अंतरा असे म्हणतात.
आलाप:-
रागाच्या नियमानुसार हळुहळू रागाचा विस्तार करण्याच्या क्रियेस आलाप असे म्हणतात.