मनोगत : भाग २

0


मनोगत  मला बाळासाहेबांनी गायिलेलं एक गाणं खूपच आवडतं.

लाजून हासणे अन् हासून हे पहाणे

 मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे ।। 


हे गाणं ऐकल्या नंतर मला नेहमीच एक प्रश्न पडायचा, इतके दिग्गज दोन संगीतकार असतांना लाजून हा शब्द का तोडल्या गेला असेल. कारण गाण्यात ला नंतर पॉझ आहे. या संदर्भात कांही मिळते का म्हणून खूप शोधण्याचा प्रयत्न केला एका कौशल इनामदार आणि अजित परब ह्यांच्या मुलाखतीत हाच प्रश्न कौशल ला सुद्धा पडला होता आणि खळ्यांचे शिष्य अजित परब ह्यांनी ह्याच कारण प्रत्यक्ष अण्णांना ला विचारलं. अण्णा म्हणाले ती चूकच होती, मी वारंवार सांगून देखील सुधारण्यात आली नाही, बाकी गाणं सुंदर झालं होतं , रेकॉर्डिंग झालेलं असल्या मुळे ती चूक तशीच राहिली. एखाद्या वेळला व्याकरणातील चूक सुद्धा गाण्याची सुंदरता वाढवते हे मात्र सिद्ध झालं. हृदयनाथांनी गायलेलं दुसरं गाणं होतं....


          वेगवेगळी फुले उमलली,

           रचुनि त्यांचे झेले

           एकमेकांवरी उधळले

           गेलेऽऽ ते दिन गेले


             भवानी शंकर पंडितांची  ही रचना किती सुंदर गायिली आहे बाळासाहेबांनी.


            श्रीमती मंगलाताईंनी ( खाडिलकर ) सांगितलेले दोन किस्से सांगितल्या शिवाय माझी लेखणी पुढे सरकत नाही. त्या म्हणतात " अण्णांना वसंतराव देशपांडे च्या आवाजात एक  गाणं रेकॉर्ड करायचं होतं पण त्यांच्या भाषेत वश्या काही तालमीला वेळ देत नव्हता शेवटी एकदाचा वश्याचा फोन आला मी येतोय वहिनींना झकास मटण करून ठेवायला सांग. तालीम सुरू झाली वश्या काय गातो आहे हे ऐकायला पाहिले कुमार आलेत त्या पाठोपाठच पु.ल. ही अवतरले स्वयंपाक घरातून दरवळणाऱ्या सुगंधा बरोबरच वसंतरावांच गाणं रंगात आलं होतं. ( सर्व मित्र मंडळी वसंतरावांना वश्या म्हणायची )श्री वा.रा. कांत ह्यांची रचना होती.


बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

 भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?


मंगलाताईंनी सांगितलेला दुसरा किस्सा ही खूप गमतीचा आहे. मंगलाताईंनी एक दिवस अण्णांना प्रश्न विचारला काय अण्णा मी असं ऐकलं आहे की तुम्ही हॉस्पिटल मधून पळून आले होते. त्यावर अण्णा म्हणाले बैस राजा तुला तो किस्सा सांगतो. मंगलाताई म्हणतात अण्णा जेंव्हा प्रेमळ अंतकरणातून बोलतात तेंव्हा आपल्याला जाणवते की त्यांचे ओठचं बोलत नाही तर त्यांचा चेहरा ही बोलतो अन डोळे ही बोलतात. ते म्हणाले की खरंआहे " मी पोटाच्या विकाराने जसलोक मध्ये ऍडमिट होतो. मला तर लता दिदींच एक गाणं रेकॉर्ड करायचं होतं. मी दवाखान्यातून सुटी मागितली पण ती मिळाली नाही, मग शेवटी गुपचूप मी दवाखान्यातून सटकलो. घरी येऊन तुझ्या काकुला सांगितलं की मला डिस्चार्ज मिळाला पण काय गम्मत थोड्याच वेळात हॉस्पिटल चे  कर्मचारी आणि पोलीस दारात उभे. मी सरळ डीन ला फोन लावला आणि सांगितलं की दिदींच गाणं रेकॉर्ड करायचं आहे , मी फक्त एक टेक ऐकून दवाखान्यात हजर होतो. माझी विनंती मान्य झाली आणि दिदींच एक सुंदर गाणं तुम्हाला देऊ शकलो. मंगेश पाडगावकरांच्या लेखणीतून उतरलेलं सर्वांग सुंदर गाणं....


जाहल्या काही चुका अन्‌ सूर काही राहिले

 तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले


               अण्णांनी केवळ भावगीत किंवा भक्ती गीतच बसविली असं नाही तर एक सुंदर लावणी देखील संगीतबद्ध केली आणि आजही ती लावणी, लावणी प्रकारात  दिमाखात उभी आहे. राजा बढे ह्यांच्या लेखणीतून उतरलेली ही लावणी *सुलोचना चव्हाण* ह्यांच्या आवाजात ऐकण्यात वेगळीच मजा आहे.


          *कळीदार कपूरी पान* 

         *कोवळं छान केशरी चुना*

            *रंगला काथ केवडा*, 

   *वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा*


               अण्णा किती सुंदर चाली द्यायचे हे पाडगावकरांच्या एका वाक्यातुन लक्षात येतं. ते म्हणतात माझी गाणी मला खळ्यांनी चाल लावल्या नंतरच कळतात. अण्णांनी  पाडगावकरांची जवळपास ३५-३६ गाणी केली. ह्या व्यतिरिक्त इतर १३५ गीतकारांची गाणी केली. त्यांनी खूप असे चित्रपट केले नाहीत पण जे काही केलेत ते संगीत दृष्टया अप्रतिम. जसे ‘यंदा कर्तव्य आहे’ (१९५६), ‘बोलकी बाहुली’ (१९६१), ‘पळसाला पाने तीन’,‘जिव्हाळा’ (१९६८), ‘पोरकी’ (१९७०), ‘सोबती’ (१९७१) या सर्वच चित्रपटांतील गाणी गाजली. ‘देवा दया तुझी’, ‘सांग मला रे, सांग मला आई आणखी बाबा ह्यातील कोण आवडे अधिक तुला" (बोलकी बाहुली), ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ (लता मंगेशकर) आणि ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे’ (सुधीर फडके) ही ‘जिव्हाळा’ या चित्रपटातील दोन गाणी त्यांच्या चित्रपटातील संगीताच्या उच्च दर्जाची साक्ष देतात. चित्रपटाप्रमाणेच काही नाटकांनाही त्यांनी संगीत दिले. ‘पाणिग्रहण’ (आचार्य अत्रे), ‘विदूषक’ (वि.वा. शिरवाडकर), ‘देवाचे पाय’ (चिं.त्र्यं. खानोलकर) या तिन्ही नाटकांतील गीतांना चाली, त्या नाटकांच्या आशयांप्रमाणे भिन्न आहेत. ‘पाणिग्रहण’ या नाटकातील ‘उगवला चंद्र पुनवेचा’ व ‘प्रीती सुरी दुधारी’ (बकुलपंडित) व ‘विदूषक’ या नाटकातील कुसुमाग्रजांच्या काव्य-गीताला भावगीताचा साज चढवून केलेली, ‘स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या राजस राजकुमारा’, ‘चांद भरली रात आहे’ (आशालता वाबगावकर) ही गाणीही लोकप्रिय झाली. 


               अण्णांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला तो दोन गीत समूहाने एक म्हणजे दोन भारत रत्न एकत्रित गायले तो ' राम- शाम गुणगान'  हा अल्बम ज्यात खालील गाणी/ भजनं होती 

  

   राम भजन कर मन

   राम का गुणगान करिये

   कृपा सरोवर कमल मनोहर

   बाजे रे मुरलीया बाजे

   श्री राम जयराम जयजय राम

   सुमती सीताराम

   श्याम घनश्याम बरसो


          ह्या ध्वनिफितीत राम आणि कृष्णावर आधारित गाणी आहेत. ह्यातील चार भजनं पंडित भीमसेन जोशी आणि भारत रत्न लताजींनी द्वंद्व स्वरूपात गायिली आहेत.

सुरवातीला कृष्ण गीतांमध्ये बासरी चा वापर आणि राम गीतात सतारीचा प्रयोग करण्यात आला होता. त्या काळी त्यांचा १२- १३ वर्षाचा एक शिष्य त्यांच्या कडे गाणं शिकायला यायचा. शिष्याच्या आईने अण्णांना सांगितलं की हा वीणा खूप छान वाजवतो. अण्णांनी त्याला वीणा घेऊन बोलावलं आणि समाधान होई पर्यंत वीणा ऐकली. डोळे मिटले आणी एक निर्णय घेतला . राम श्याम गुणगान परत रेकॉर्ड करायचं. राम गीतात वापरलेली सतार बदलून वीणा वापरायची. त्या शिष्यालाच सांगितलं की वीणा तूच वाजवणार. शिष्य घाबरला, दोन भारत रत्नांच्या गाण्याला साथ करायची होती त्याला. पण ते अण्णा होते. फक्त आणि फक्त राम का गुणगान करिये ऐका आणि सुंदर वीणेचा आनंद घ्या. तो शिष्य म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून आजचा प्रतिभावान गायक *शंकर महादेवन होता.*


              हिंदीत एक वाक्प्रचार आहे " समय समय की बात होती है" असाच हा किस्सा आहे, अण्णा HMV त रेकॉर्डिंग मॅनेजर होते आणि त्यांना ' या चिमण्यांनो परत फिरा रे' रेकॉर्ड करायचं होतं पण लता दिदींच्या तारखा मिळत नव्हत्या. एक दिवस त्यांनी दिदींना फोन केला आणि केंव्हा येता असं न विचारता चक्क या चिमण्यांनो हे गाणंच  ऐकवलं, काय  आश्चर्य  त्या गाण्याच्या इतक्या प्रेमात पडल्या की अण्णांना पुढचं काहीच कठीण गेलं नाही. वेळ बदलत गेली अण्णा मोठ्ठे संगीतकार झाले होते. लता दिदींना ' तुक्याचे अभंग'  करायचे होते आणि त्याचं संगीत अण्णांनीच करावं अशी त्यांची इच्छा होती. आता वेळ अण्णांची होती, दीदी त्यांना फोन करायच्या. काय सुंदर झाले आहेत तुक्याचे अभंग. प्रत्येक गायकाला असं वाटतं की आपण ही गावीत. अजरामर आहेत सर्व गाणी.


1  जय जय राम क्रिष्ण हरी

2  सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

3  व्रुक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे

4  अगा करुणाकरा

5  कमोदिनी काय जाणे तो परिमळ​

 6  हाचि नेम आता न फ़िरे माघारी

 7  खेळ मांडियेला वाळवंटि घाई

 8  भेटी लागी जीवा लागलीसे आस​

  9  जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

10  कन्या सासुरयाशी जाय​

11 आनंदाचे डोही आनंद तरंग​

12  हेचि दान देगा देवा


            अण्णा तुम्हाला जेंव्हा International who's who लंडन च्या यादीत स्थान मिळालं  तो एक आनंदाचा क्षण होता,  भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार मिळाला तो ही आनंदाचाच क्षण होता.   दादासाहेब फाळके ट्रस्ट चा

दादासाहेब फाळके’ पुरस्कार  ही सुंदर उपलब्धी होती अन महाराष्ट्र सरकारचा श्रीमती लता मंगेशकर’ पुरस्कार हा तर तुमच्या आयुष्यातला आनंदाचा परमोच्च  क्षण होता.              ॲड. सुनील पाळधीकर

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top