मनोगत

0

मनोगत

 मनोगत


ॲड. सुनील पाळधीकर

               

            एकदा एका मराठी भाषिक संगीतकाराला एका मुलाखती दरम्यान प्रश्न विचारण्यात आला तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण कोणता ? त्या संगीतकाराच उत्तर होतं असे दोन क्षण माझ्या आयुष्यात आले एक म्हणजे माझ्या संगीत नियोजनात दोन भारत रत्न एकत्र रित्या गायिले तो क्षण.  त्यांचा संकेत होता " राम शाम गुणगान" ह्या  भारत रत्न पंडित भीमसेन जोशी आणि भारत रत्न स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांनी एकत्रित पणे गाऊन अजरामर केलेल्या भक्ती गीतांच्या ध्वनी मुद्रिके कडे. आणि त्यांनी दुसरा क्षण सांगितला तो असा की जेंव्हा त्यांना महाराष्ट्र सरकारचा  लता मंगेशकर पुरस्कार मिळाला तो क्षण. आता पर्यंत आपल्याला निश्चितच हे लक्षात आलं असेल की ते संगीतकार दुसरे तिसरे कोणी नसून  जेष्ठ संगीतकार श्री. श्रीनिवास खळे आहेत ज्यांना आपण प्रेमाने अण्णा म्हणतो किंवा खळे काका म्हणतो. कांही मित्रांच्या आग्रहा खातर मी त्यांचा संगीत प्रवास आपणा समोर ठेवण्याचा एक लहानसा प्रयत्न करतो आहे.


                असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तसाच काहीसा भाग आपल्याला अण्णांच्या बाबतीतही पाहायला मिळतो. अण्णांचं शिक्षण बडोद्याला झालं. सुरवाती पासूनच  संगीताची आवड होती. श्रीनिवास खळ्यांचे शालेय शिक्षण बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई हायस्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षणाबरोबरच बडोद्याच्या सयाजीराव महाराजांच्या पाठशाळेत संगीत शिक्षणही १९४० पासून सुरू झालं. या विद्यालयात फैय्याज खाँ, गुलाम रसूल, अता हुसेन खाँ, मधुसूदन जोशी अशी संगीत क्षेत्रातील मोठी मंडळी होती. काही काळ गुलाम रसूल यांच्याकडूनही त्यांनी संगीताचे धडे घेतले. नंतर फैय्याज खाँ साहेबांचे शिष्य मधुसूदन जोशी यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली. त्यांचे खरे गुरू मात्र मधुसूदन जोशी हेच होते. पूर्ण पणे संगीतात तयार झाल्या नंतर त्यांनी उपजीविकेसाठी संगीत हेच माध्यम निवडलं आणि आई वडिलांच्या मना विरुद्ध मुंबई गाठली ते साल होतं साधारणतः 1948. खूप प्रयत्न केले पण काम मिळेना अशी स्थिती झाली होती. उदर निर्वाहा साठी लागणारं द्रव्य देखील त्यांना मिळू शकलं नव्हतं. अशातच १९५२ साली त्यांच्या आयुष्यात जीवनसाथी म्हणून वसुमती प्रधान ह्यांचा प्रवेश झाला. या विवाहा मुळे एवढं मात्र झालं की हालअपेष्टा सहन करायला त्यांना एक साथीदार मिळाला. एकदा तर अशी वेळ आली की नैराश्यात खळे काका हार्मोनियम विकून बडोद्याला परत जाण्याच्या मनस्थितीत आले होते. पण धीराच्या वसुमती ताईंनी त्यांना एक निर्वाणीचा सल्ला दिला ' हार्मोनियम विकायची असेल तर खुशाल विका पण ती विकून येणाऱ्या  पैशात थोडंस विष घेऊन या, आपण दोघेही घेऊ. आणि या इशाऱ्या मुळेच आपल्याला महान संगीतकार श्रीनिवास खळे मिळाले आणि म्हणूनच मी वर म्हंटलय की प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते. 


             तसं पाहिलं तर मंगेशकर भगिनी अनेकांच्या भाग्यस्थानी राहिल्या आहेत. अण्णांच्या च्या बाबतीत ही तेच झालं. १९५२ साली आशा भोसले ह्यांनी गायलेल्या दोन गाण्यांमुळे श्रीनिवास खळे प्रकाश झोतात आले. आणि रचना होत्या ग.दि. माडगूळकरांच्या म्हणजे दुधात साखर.


    गोरी गोरी पान फुला सारखी छान

      दादा मला एक वाहिनी आण...


                      आणि दुसरं होतं


 एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

  होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक


  ह्या दोन्ही गाण्यांची त्या काळी HMV ने तबकडी काढली होती आणि  ही गाणी घरा घरात पोहोचली. ह्या पूर्वी खळ्यांनी पाडगावकरांच्या  एका कवितेला (शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या) संगीत दिलं होतं आणि अभ्यास क्रमात असल्या मुळे ही कवीता घरा घरात म्हटल्या जाऊ लागली. थोडासा डोक्याला ताण द्या, तुम्ही एकदम गाऊ लागाल. शब्द होते.


टप्‌ टप्‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

भिर्‌ भिर्‌ भिर्‌ भिर्‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे !


            1960-61 पासून साधारणतः 1968  पर्यंत श्रीनिवास खळ्यांनी मुंबई आकाशवाणीत  नौकरी स्वीकारली तत्पूर्वी त्यांनी संगीतकार श्री दत्ता कोरगावकर ह्यांचे सोबत त्यांचे सहाय्यक म्हणून काम केले. आकाशवाणीत असतांना त्यांना एक सखा मिळाला, सुंदर काव्य कारायचा त्याच नाव होतं मंगेश पाडगावकर. दोघेही एकत्रच आकाशवाणीत जायचे. खळे काका चेंबूर ला राहायचे ते चेंबूर वरून लोकल पकडायचे तर पाडगावकर सायन वरून त्यांना जॉईन व्हायचे. भर मे महिन्यात एकदा पाडगावकरांनी  चार ओळी लिहिलेला कागदाचा तुकडा खळे काकाच्या हाती दिला अन काय आश्चर्य  VT ला पोहचे पर्यंत मुखडा चाल लावून तयार झाला होता. दोन तीन दिवसात एका सुंदर गाण्याचा जन्म झाला. सुंदर शब्द, उत्तम चाल आणि लता दिदींचा कर्ण मधुर आवाज...     *श्रावणात घन निळा बरसला*

           *रिमझिम रेशिमधारा*

    *उलगडला झाडांतुन अवचित* 

             *हिरवा मोरपिसारा*


          ह्या काव्याचा शब्दनं शब्द अंगावर रोमांच उभा करणारा आहे. मला तर नेहमीच वाटत आलंय की पाडगावकरांनी शेवटचं कडवं खळें साठी लिहिलं आहे.


पानोपानी शुभशकुनाच्या 

कोमल ओल्या रेषा

अशा प्रीतिचा नाद अनाहत शब्दावाचुन भाषा

अंतयार्मी सूर गवसला 

नाही आज किनारा


  ह्या गाण्या नंतर तर खळे काकांची प्रतिभा दिन प्रतिदिन बहरत गेली. खळ्यांवर 'अंतर्यामी सूर गवसला' हे चरित्र मारुळकरांनी लिहिलं पण ते आज उपलब्ध नाही. लता दीदींनी खळे काकां कडे गायलेलं हे काही पाहिलं गाणं नव्हतं. तर पाहिलं गाणं होतं ' या चिमण्यांनो परत फिरा रे घरा कडे अपुल्या'  या सुंदर गीताचे शब्द ग.दि.मा. ह्यांचेच होते. काकांनी हे गाणं पुरीया धनश्री आणि मारवा ह्या दोन रागात बांधलं. आजच्या काळात हे गाणं किती सयूंक्तिक वाटते पहा. मुलं विदेशात नोकरी साठी गेली आहेत आणि त्यांच्या आया मात्र आपल्या चिमण्यांची वाट पाहतात आणि त्यांना विनवतात 'या चिमण्यां नो परत फिरारे' 


              असाच एक सुंदर गळ्याचा गायक मराठी रसिकांना  अण्णांनी दिला. साल १९६३ आकाशवाणी वर भाव सरगम नावाचा कार्यक्रम प्रसारित होत असे. अण्णा नी भाव सरगम साठी एक गाणं बसवलं. हे अप्रतिम गाणं गाण्यासाठी गायकाचा शोध सुरू झाला. त्या काळी रेडिओ वर इंदोर चा एक गायक हिंदी गझल गात असे त्याच नाव A.R. date असं होतं, त्याला बोलावण्यात आलं पण गाणं मराठीत असल्या मुळे त्याने आपली असमर्थता प्रगट केली. 

खळे काकांनी तू फक्त हो म्हण बाकी मी पहातो म्हणून त्याला आश्वस्त केलं. सुधा मल्होत्रा ला घेऊन एक द्वंद्वगीत रेकॉर्ड करण्यात आलं. त्या काळी आकाशवाणीत यशवंत देव होते. गायकाचं नाव काय  लिहायचं म्हणून आकाशवाणीतून यशवंत देवांना फोन गेला, देवांनी A.R. म्हणजे अरुण च असावं असं समजून अरुण दाते लिहा असं सांगून टाकलं. इथे अरविंद दाते ह्यांच पुन्हा एकदा बारसं झालं आणि 'अरुण दाते' ह्या गायकाचा जन्म झाला. आणि ते सुंदर गाणं होतं......


शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी

चंद्र आहे स्वप्न वाहे,धुंद या गाण्यातुनी

आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा

 तू अशी जवळी रहा

 

               अरुण दाते ह्यांनी अजून दोन सुंदर गाणी अण्णांच्या दिग्दर्शनात गायली सोबत होत्या सुमन ताई आणि सुधा मल्होत्रा

आणि शब्द होते....


१  पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची

 जादू अशी घडे ही या दोन लोचनांची


२  हात तुझा हातातुन धुंद ही हवा

    रोजचाच चंद्र आज भासतो नवा


ही दोन्ही ही गाणी मंगेश पाडगावकर ह्यांच्या लेखणीतून उतरली होती. खळे काकांकडे कोण गायलं नाही अगदी आशा पासून तर आर्या पर्यंत. सर्वच म्हणतात खळे काकांच्या चाली खूप कठीण  असतात. एकदा तर एका गाण्याची तयारी करत असतांना आशाताई म्हणाल्या काका किती कठीण चाल आणि गाणं तयार झाल्या नंतर खुद्द आशाताई म्हणाल्या वाआआ काय सुंदर गाणं. ते गाणं होतं


 पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे

 आले मनात नवखे उमलून भाव सारे


गंगाधर महांबरे ची ही रचना अशाताईंच्या आवाजात सोबती ह्या सिनेमात ऐकायला आणि पाहायला देखील मिळते. सुरेश वाडकरांनी देखील काही चांगली गाणी खळे काकांकडे गायली आहेत.


           काळ देहासी आला खाऊ ।

           आम्ही आनंदे नाचू गाऊ ।।

असो किंवा


      धरिला वृथा छंद

  नव्हतेच जर फूल, कोठून मकरंद??


किंवा


जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा

  माझा न राहतो मी हरवून हा किनारा 


        ही गाणी म्हणजे लय आणि तालाशी खेळत आणि सुरांना कुरवाळत गाणं कसं म्हणावं ह्याचा एक सुंदर नमुना आहे.


         सर्व गोष्टींचा कळस म्हणजे अण्णांनी दोन दिग्गज संगीतकारांकडून गाणी गाऊन घेतली. त्यातले एक होते पं हृदयनाथ मंगेशकर आणि दुसरे  स्वर तीर्थ सुधीर फडके. सुधीर फडकेंनी जिव्हाळा ह्या चित्रपटा साठी ' लळा जिव्हाळा शब्दच खोटे' हे गाणं गायलं. तर पं हृदयनाथांनी दोन गाणी गायिलीत.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top