कराओके गायक गायिका..
आज-काल कराओके वर गाणाऱ्यांचे पीकच आले आहे. जो उठतो तो कराओके वर गाणी गाऊ लागतो. मग आपण स्वरात गातो का ? तालात गातो का ? याचे त्याला भानही नसते. यामध्ये हौशी, गौशी, नवशिके असे अनेक लोक आपापली गाण्याची हौस भागवून घेत असतात. सध्या मोबाईलचा जमाना असल्यामुळे गाणे कराओके वर गायचे आणि त्याचे रेकॉर्डिंग मोबाईलवर टाकायचे आणि किती लाईक मिळाल्या हे रोज बघत बसायचे असा एक छंद बऱ्याच लोकांना जडलेला आहे. त्यातून "रियालिटी शो" मुळे गाणे काय, आपण सहज गाऊ शकू, असे अनेकांना वाटू लागले आहे. "लिटिल चॅम्प्स" किंवा तत्सम "रियालिटी शो" मधून लहान लहान मुले फार सुंदर गात असतात. ते पाहून अनेकांना वाटते की ही मुले इतकी सुंदर गातात, मग मी का नाही गाऊ शकणार ? गाणे काय अगदी सोपे आहे. परंतु तसे नसते. कुठलेही गाणे हे स्वरात, तालात गाता आले पाहिजे. आणि शिवाय त्या गायनात त्या काव्याचे भावही उतरलेले असले पाहिजेत. परंतु एवढा विचार करण्यासाठी कोणालाच हल्ली वेळ नसतो. आपले गाणे किती लोकांनी ऐकले ? किती लोकांनी लाईक केले ? यावर त्यांचे लक्ष असते. त्यातून काही लोकांना बेसूर, बेताल गाऊन सुद्धा भरपूर लाईक्स मिळतात. कारण लाईक करणारे हे गाण्याच्या प्रांतात अतिशय अनोळखी आणि अज्ञानी असे असतात. यामुळे अशा बेसूर, बेताल गाण्याऱ्याचा आत्मविश्वास आणखी वाढतो,आणि आणखी तो नवीन नवीन स्वतःचे व्हिडिओ टाकू लागतो. आता तर कराओकेचे क्लासही निघू लागले आहेत. पूर्वी फक्त शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत शिकवणारी विद्यालये होती. चित्रपट संगीत हे ऑर्केस्ट्रातून ऐकण्यासाठी लोक जात असत. घरच्या घरी चित्रपटगीतात ते रमून जात असत.आता बरेच लोक मोहम्मद रफी, मुकेश, मन्ना डे, किशोर कुमार यांचा वारसा चालवण्यासाठी उत्सुक असलेले दिसतात. कराओके वर त्यांची गाणी ते म्हणत असतात. परंतु बऱ्याच जणांना आपण नीट गातो किंवा नाही याबद्दल शंका असते. अशा लोकांना कराओके वरती गाणी शिकवण्यासाठी क्लास निघू लागले आहेत. क्लास घेणाऱ्याला कितपत गाता येते किंवा तो किती शिकलेला आहे, त्याला स्वरांचं किती ज्ञान आहे, तालाचे किती ज्ञान आहे, हे शिकणारा विद्यार्थी कधीच बघत नाही. तो क्लासला गेला, की शिकवणारे कराओके चे ट्रॅक लावतात आणि त्याला वेगवेगळी गाणी गावयास सांगतात. गाणी गाऊन झाल्यावर त्याचे कौतुकही करतात. थोड्याफार त्याच्या शंकांचे निरसन करतात. त्यामुळे हा शिकणारा खूप खुश होतो. त्याची हिंदी चित्रपट गीते गाण्याची हौसही अशा ठिकाणी भागते.
हे सगळे पाहून माझ्या मनात विचार आला की ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीत, सुगम संगीत याच्या परीक्षा असतात, त्याप्रमाणे कराओके वर गाण्याच्या सुद्धा परीक्षा असाव्यात. त्यामध्ये कराओकेचा ट्रॅक कसा निर्माण करतात ते कराओके वर गाणे गाण्यापर्यंतचा प्रवास कसा असावा, कसा असला पाहिजे याचे ज्ञान विद्यार्थ्याला करून देणे महत्त्वाचे ठरावे असे मला वाटते. या अभ्यासक्रमात सर्व मोठ्या गायकानी (मोहम्मद रफी, मन्ना डे, किशोर कुमार, हेमंत कुमार, मुकेश, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपुर) कलेसाठी केलेला संघर्ष, आणि त्यांचे पूर्ण जीवन चरित्र अभ्यासाला असावे असे मला वाटते. त्याचप्रमाणे काव्याचा अभ्यास म्हणजे काव्या च्या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास असावा. त्याचप्रमाणे चाली कशा लावतात ?, कशा लावाव्या याचे थोडेफार ज्ञान विद्यार्थ्याला देण्याचा प्रयत्न करावा असेही मला वाटते. शास्त्रीय संगीतातील निदान १२ ते १४ रागांचे प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्याला द्यावे आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकारांचे जे आवडते राग(यमन,भैरवी, शिवरंजनी, भिमपलासी, काफी,पहाडी,पिलू) ज्यावर अनेक चित्रपट गीते बेतलेली आहेत असे राग, आणि त्या रागांमधील सरगमगीते, बंदीशी विद्यार्थ्याला शिकवण्यात याव्यात असे मला वाटते. अभ्यासक्रम हा साधारण पाच वर्षांचा असावा. आणि त्यात सूर, ताल शब्दफेक हे घटक असावेत. ज्यांच्या या सर्व परीक्षा झालेल्या असतील, अशांनाच कराओके चे क्लास घेण्याची अनुमती असावी. त्याचप्रमाणे ज्याला शिकायचे त्यानेही अशा शिक्षित शिक्षकाकडे शिकण्यास जावे. असे झाले तरच, चांगले कराओके गायक तयार होतील.
- किरण फाटक