तानसेन यांच्या गुरूंचे गायन
तानसेनाचं दैवी गाणं ऐकून
जेव्हा जेव्हा अकबर मंत्रमुग्ध व्हायचा,
तेव्हा तेव्हा तानसेन विनम्रपणे सांगायचा,
“माझ्या गुरूंपुढे मी काहीच नाही!”
अकबर म्हणायचा,
“असं शक्यच नाही… या भूतलावर तुझ्याइतका
श्रेष्ठ गायक कोणी असूच शकत नाही.
कसला गुरूबिरू सांगतोस.?”
तानसेन म्हणायचा,
माझ्या गुरूंच्या गायनापुढे माझं गायन
म्हणजे सूर्यापुढे पणती!
अकबर म्हणाला,
“मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही.
माझ्या कानानं ऐकूनच काय तो निर्वाळा देईन.
बोलव तुझ्या गुरूंना… काय असेल ती बिदागी
देऊयात आपण. होऊन जाऊदेत त्यांचं गाणं!”
तानसेन म्हणाला,
जहाँपनाह, ते अशा मैफली सजवत नाहीत.
त्यांचं गाणं फक्त त्यांच्यापुरतं असतं.”
अकबर म्हणाला,
“मग त्यांची जी काही गाण्याची वेळ असेल,
त्यावेळी जाऊन आपण बसू ऐकायला.”
तानसेन म्हणाला,
त्यांची अशी ठराविक वेळ नसते…
त्यांना वाटलं की ते गातात.
ते कुणाहीसाठी गात नाहीत!”
अकबरानं विचारलं,
मग त्यांचं गाणं ऐकायचं कसं?
तानसेन अकबराला मध्यरात्रीच्या सुमारास
लपून छपून गुरूदेवांच्या झोपडीपाशी घेऊन गेला.
दोघंही बराच काळ वाट पाहात बसले होते.
अशा दोन रात्री वाट पाहण्यात घालवल्यानंतर
एके दिवशी पहाटेच्या सुमारास
गुरुजींनी गाणं सुरू केलं…
ते स्वर्गीय गाणं ऐकल्यावर
अकबराचं देहभान हरपून गेलं.
दीड-दोन तासांनी ते गायन थांबलं,
तेव्हा अकबर जणू वेगळ्याच विश्वातून
जमिनीवर परत आला.
आकंठ तृप्त मनानं दोघंही एकमेकांशी
चकार शब्द न बोलता राजवाड्यापर्यंत आले.
मनात काठोकाठ भरून डचमळणारं
गुरुजींचं गाणं थोडं स्थिरावलं होतं.
अकबराने तानसेनाला विचारलं, तूही गातोस. तेही गातात…
तुझं गाणं अद्वितीय आहे. पण,
त्यांचं गाणं स्वर्गीय आहे. हा फरक कशामुळं?”
तानसेन म्हणाला,
मी काहीतरी मिळावं म्हणून गातो…
ते काहीतरी मिळालंय,
ते वाटून टाकल्याशिवाय राहवत नाही,
म्हणून गातात!