तबला वादकांचा जीवन परिचय
भाग - २
१) उ. जहांगीर खाँ - यांचा जन्म इ. स. १८६९ मध्ये बनारस येथे झाला. त्यांचे तबल्याचे शिक्षण प्रथमतः पाटण्याचे तबलानवाज उ. मुबारक अली खाँ यांच्याकडे ९ वर्षे व त्यानंतर फरुखाबाद घराण्याचे उ. छन्नू खाँ यांच्याकडे झाले. याचबरोबर लखनौ घराण्याचे त्यावेळचे खलिफा आबीद हुसेन खाँ यांच्याकडूनही त्यानी विद्या प्राप्त केली.
लखनौ, दिल्ली, फरुखाबाद या तीनही शैलींचे अध्ययन केल्याने त्यांचा तबला अतिशय समृद्ध झाला. 'तबले के बाज' या नावाचे त्याचे एक तासाचे ध्वनिमुद्रण संगीत नाटक अकादमी, दिल्ली यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यांचे तबलावादन अतिशय तयार, नजाकतदार व विद्वत्तापूर्ण असे होते. १९५९ साली भारत सरकारतर्फे त्यांना राष्ट्रपती पुरस्कार तसेच खैरागड येथील इंदिरा कला विद्यालयाकडून त्यांना 'डॉक्टर ऑफ म्युझिक' देऊन गौरविण्यात आले. भारत व भारताबाहेर त्यांनी असंख्य शिष्य निर्माण केले. त्यापैकी नारायणराव दोरकर, शरद खरगोणकर, रवी दाते, गजानन ताडे, एम. व्ही. भिडे हे उल्लेखनीय आहेत. त्यांचे निधन १०७ व्या वर्षी दि. ११-५-१९७६ या दिवशी झाले. त्यांनी उ. अल्लादिया खाँ (कोल्हापूर), उ. रजब अली खाँ, उ. फैय्याझ खाँ इ. सारख्या वऱ्याच नामवंत गवयांची साथसंगत केली.
२) पं. चतुरलाल - यांचा जन्म १९२५ मध्ये उदेपूर येथे झाला. नामवंत सारंगीवादक पं. रामनारायण यांचे हे ज्येष्ठ बंधू, लहानपणापासूनच उदेपूरचे प्रसिद्ध तबलावादक पं. नाथुप्रसाद यांच्याकडे तालीम घेतली. त्यानंतर १५-१६ व्या वर्षी त्यानी उदेपूरच्याच उ. हफिजमियाँचा गंडा बांधला. त्यांच्या कर्णमधुर व कल्पनातीत तयारीच्या वादनामुळे दिल्ली आकाशवाणी केंद्राने त्यांना नोकरीस ठेवून घेतले. 3. अली अकबर खाँ व पं. रविशंकर यांच्याबरोबर त्यांनी कित्येक वेळा जगप्रवास केला होता.
पाश्चात्यांमध्ये तबल्याचा सोलो व साथसंगत लोकप्रिय करण्याचे श्रेय सर्वप्रथम पं. चतुरलाल यांच्याकडे जाते. त्यांची तंतुवाद्यांबरोबरील साथ अप्रतिम अशीच होती. मुख्य कलावंतास भरपूर वाव देऊन आवश्यक ठिकाणीच ते लयीच्या अंगाने वाजवीत. त्यांनी सतार सरोदवादनाबरोबर योग्य अशा अनेक प्रकारच्या तिहाया बांधल्या होत्या.
स्वतंत्र तबलावादनातही त्यांचे नवनवीन प्रयोग सुरू असत. कर्नाटक संगीतात प्रचलित असलेली खंडजाती उत्तर भारतीय स्वतंत्र तबलावादनात त्यांनीच प्रथम आणली. खूप तयारी, स्वच्छ निकास, दायाँ-बायाँचे वजनदार बोल, लयीचा पक्केपणा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. १९६५ रोजी अवघ्या ४० व्या वर्षी ते निवर्तले. त्यामुळे भारतीय संगीताची खूप मोठी हानी झाली.