तबला वादकांचा जीवन परिचय
१) उ. शेख दाऊद खाँ - खाँ साहेबांचा जन्म सोलापूर येथे १६-१२-१९१६ रोजी झाला. सुरुवातीचे शिक्षण महंमद कासीम तर नंतर अनुक्रमे उ. अल्लादिया खाँ व उ. मेहबूब खाँ मिरजकर यांचे शिष्यत्व पत्करले. त्यामुळे तबल्यातील विविध घराण्यांच्या रचनांचा खजिनाच त्यांना प्राप्त झाला. त्यांचा हात अत्यंत तयार व नजाकतदार होता. दायाँ-बायाँचे त्यांचे संतुलन अफलातून होते. त्यांनी स्वतंत्र वादनाबरोबरच गायन-वादनाच्या साथसंगतीचे तंत्रही चांगलेच विकसित केले होते. त्यामुळे त्यांना उ. फैयाज खाँ उ. विलायत हुसेन खाँ, उ. बडे गुलाम अली खाँ, उ. अल्लाउद्दीन खाँ, उ. अली अकबर खाँ, पं. रविशंकर, उ. विलायत खाँ या सांरख्या श्रेष्ठ व मातब्बर गायक-वादकांकडून संगतीचे आमंत्रण असे. विस्तारक्षम रचना संपविताना ते तिहाई त्याच लयीत न घेता वेगळ्याच लयीत; विशेषतः संथलयीत घ्यायचे व एक वेगळेच सौंदर्य निर्माण करायचे. १९७५ साली 'हिंदू- मुस्लीम एकता' पुरस्कार तसेच १९९२ मध्ये संगीत नाटक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांचा मृत्यू २१-३-१९९२ रोजी झाला. त्यांच्या शिष्यांमध्ये पुत्र उ. शब्बीर निसार, बी. नंदकुमार व किरण देशपांडे हे उल्लेखनीय आहेत.
२) उ. मेहबूब खाँ मिरजकर - खाँसाहेबांचा जन्म १८७७ साली झाला. तबला व पखावज या दोहोंची आवड असल्याने सुरुवातीस महेशकरबुवा व बळवंतराव बर्वे यांच्याकडे शिक्षण झाले. त्यानंतर उ. जुगना खाँ, पं. जियालाल महाराज व लखनौ घराण्याचे उ. जहांगीर खाँ (इंदोर) यांच्याकडे उच्च शिक्षण झाले. उ. अब्दुल करीम खाँ, रोशनआरा बेगम, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. सवाई गंधर्व, पं. गजाननराव जोशी यासारख्या महान कलाकारांची त्यांनी साथसंगत केली आहे.
त्यांना विद्यादानाची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी मुक्तहस्ते विद्यादान केले. त्यांच्या शिष्यांमध्ये प्रामुख्याने उ. म्हम्हूलाल सांगावकर, वसंतराव भेंडीगिरी, नारायणराव चिक्कोडी, अब्बास कवठेकर, उ. बाबासाहेब मिरजकर, राजाराम जाधव, कराडे, रमाकांत देवळेकर, गणपती पर्वतकर, उ. शेख दाऊद, मधुकर गणेश गोडबोले हे उल्लेखनीय. त्यांचे पुत्र अब्दुल कादर, हनिफभाई मिरजकर, नानू नवाज मिरजकर यांनी घराण्याची परंपरा राखली आहे. उस्तादजींना जीवनात अनेक मानसन्मान मिळाले. त्यांच्या मृत्यूनंतर पुणे महापालिकेने त्यांचे निवासस्थान असलेल्या रस्त्याला त्यांचे नाव देऊन त्यांचा उचित गौरव केला.