समान मात्रांच्या विभिन्न मात्रांचे तर्क व उपयोग
प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेले असे जवळजवळ ३५० ताल व त्यांचे ठेके आढळून येतात. यांपैकी केवळ १७-१८ ताल प्रत्यक्ष वापरात असल्याचे दिसून येते. उत्तर भारतीय संगीतात तबला हे वाद्य संगीतासाठी अत्यंत लोकप्रिय बनले. उत्तर भारतीय संगीताचा आवाका खूपच मोठा आहे. अनेक संगीतप्रकार यामध्ये सामावलेले आहेत. यांचे स्वरूप वेगवेगळे आहे. हे सर्व संगीतप्रकार म्हणजे ख्याल गायन (विलंबित द्रुत), स्वरवाद्य वादन, कथक, उपशास्त्रीय, सुगम इ. हे सर्व एकमेकांपेक्षा भिन्न असल्याने या प्रत्येकाच्या तालविषयक गरजा भिन्न आहेत.
तालनिर्मितीच्या सिद्धांतानुसार ताल/ ठेक्यांची निर्मिती विविध संगीतप्रकारांना समर्थपणे संगत करण्यासाठीच झालेली आहे. त्यामुळेच हे तालनिर्माण करताना ते ताल ज्या विशिष्ट संगीतप्रकारासाठी बनविले जाणार आहेत त्या संगीतप्रकारांना अनुरूप कसे होतील याकडे लक्ष दिले गेले आहे.
उत्तर भारतीय संगीतात ख्याल हा प्रमुख गायनप्रकार होय. यासाठी वापरले जाणारे तालही जास्त मात्रांचे आहेत. पण तालनिर्मितीच्या सिद्धांतामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की ख्यालियांनी जास्तीत जास्त १६ मात्रांच्या ताल चक्राची निवड केली. त्यामुळे उत्तर भारतीय संगीतपद्धतीमध्ये प्रचलित तालांमध्ये सगळ्यात मोठा ताल तीनतालच आढळतो. याचाच अर्थ असा की, जे काही अन्य ताल असतील ते १६ मात्रांच्यापेक्षा लहान असतील. अर्थात बाकीच्या संगीतप्रकारांना एवढ्या जास्त लांबीच्या तालांची गरज लागत नाही व जरी १६ मात्रा ख्याल व इतर प्रकारांसाठी वापरल्या तरी त्यांची लय मध्यकडे झुकणारी अथवा त्यापेक्षा जास्त आहे. समान मात्रांचे अनेक ताल निर्माण होण्याचे कारण हेही असेल की, १६ मात्रांचा हा सर्वात मोठा ताल निवडला गेला होता. त्यामुळे नवीन ताल निर्माण करताना तो १६ मात्रांपेक्षा कमी मात्रांचा असावा याची खबरदारी घेतली गेली तसेच हे संगीतप्रकार खूप लांबीच्या तालात सौंदर्यपूर्णही वाटले नसते. वरील सर्व संगीतप्रकार वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्यनिर्मिती करत असतात, या सर्वांच्या लयी, ताल वेगवेगळे असतात. त्यामुळे तालनिर्मिती करताना तो विशिष्ट ताल कोणत्या संगीतप्रकारासाठी व कोणत्या लयीमध्ये वाजणार आहे हे बघितले गेले. तालाचे बोलही त्या संगीतप्रकाराला अनुरूप ठरतील याची खबरदारी घेतली गेली. हेही समान मात्रांच्या अनेक तालांच्या निर्मितीचे कारण ठरले. तो विशिष्ट ताल ज्या लयीत वाजणार आहे त्यालाच अनुरूप असे त्याचे बोल तर निर्माण केलेच, पण त्यापूर्वी तालाचे स्वरूप निश्चित केले गेले. आता आपण काही तालसमूहाची उदाहरणे पाहू, की ज्यांच्या मात्रा समान आहेत.
१) तीनताल पंजाबी अध्धा तिलवाडा (१६ मात्रा)
२) दिपचंदी आडाचौताल झुमरा धमार (१४ मात्रा)
३) एकताल चौताल (१२ मात्रा)
४) रुपक तेवरा पश्तो (७ मात्रा)
५) झपताल सुलताल (१० मात्रा)
वरील सर्व तालसमूह पाहिले असता असे लक्षात येते, की हे प्रत्येक तालवेगवेगळ्या संगीतप्रकारांसाठी अस्तित्वात आलेले आहेत. उदा. तीनताल बहुदा सर्व प्रकारांना, तिलवाडा बडा ख्याल, अध्धा ठुमरी, पंजाबी नाट्यसंगीत, सुगम संगीत, एकताल बंद बाज व बडा ख्यालासाठी तर चौताल मात्रा तेवढ्याच पण खुला बाज व ध्रुपदासाठी, रुपक ख्यालासाठी, स्वरवाद्याबरोबर, सुगमसंगीतासाठी, एकल वादनासाठी, तर तेवरा खुला बाज व ध्रुपदासाठी, पश्तो, टप्पा व गझलसाठी झपताल बंद बाज, ख्याल, स्वरवाद्याबरोबर 'एकल वादनासाठी' तर सुलताल खुला बाज, ध्रुपदासाठी. वरील तालांच्या मात्रा समान असल्या तरी इतर कोणत्यातरी बाबतीत असमानता आढळेलच. उदा. टाळी / खाली / खंड / बोल इ. मध्ये. यावरून हे लक्षात येते की सर्व संगीतप्रकारांचे समाधान करण्यासाठी इतके ताल निर्माण झाले व समान मात्रांचे असूनही इतर काही गोष्टींच्या भिन्नतेमुळे ते एकमेकापेक्षा वेगळे ठरले.