तबल्याचे काव्यसौंदर्य
जगातील कोणत्याही भाषेचा उगम कसा झाला असावा याचा शोध घेणे फार कठीण आहे. भाषेचा मुख्य उद्देश हा केवळ एकमेकांचे विचार जाणून घेणे, संपर्क करणे हाच असावा सर्व सजीवांमध्ये केवळ मनुष्यालाच एवढी प्रगल्भ भाषा निर्माण करता आली, याचे मुख्य कारण त्याच्या वाणीची रचना हे असावे. संगीताच्या अनेक प्रकारांतून विचार प्रकटीकरण होतच असते. हे विचार प्रकटीकरण विशिष्ट सांकेतिक भाषेद्वारे होते संगीत ही एक मानसिक प्रक्रिया असल्याने त्याचा मनोव्यापारांशी जास्त संबंध असतो त्यामुळेच भाषेतील विचारांना विशिष्ट अर्थ जरी दिसत नसला, जरी ती भाषा कळली नाही, तरीही ती भावते / जाणवते.
भारतीय सगीतप्रकारांमध्ये विचार प्रकटीकरणाच्या प्रमुख दोन भाषा मानता येतील. त्या भाषा म्हणजे
१) 'स्वरभाषा', की जी स्वरांनी व्यक्त होते.
२) 'बोलभाषा', की जी बोलांनी व्यक्त होते.
जगातील अनेक व्यावहारिक भाषांच्या विकासाचा विचार केला तर असे म्हणता येईल की पूर्वी या भाषांचा उद्देश केवळ विचाराची देवाणघेवाण / संवाद यासाठीच होत असावा. त्यानंतर त्यामध्ये माणूस 'पद्या 'द्वारे आनंद शोधू लागला असावा. त्याचाच प्रभाव व्यावहारिक जीवनातील भाषा म्हणजेच 'गद्या' वर पडून 'गद्य' ही विकसित झाले असावे. त्याचप्रमाणे तबल्याच्या भाषेसंदर्भात बोलायचे झाल्यास तबल्याच्या उगमानंतर काही कालावधी या भाषेची व्याप्ती विशिष्ट उद्देशांसाठी पूरक ठरेल एवढीच सीमित असावी. उपयोगिता व त्यामुळे गरजा जसजशा वाढत गेल्या तसतशी ही भाषा विशिष्ट संगीतप्रकाराला पूरक ठरण्यास प्रगल्भ होत गेली असावी. कालांतराने या वाद्यावरही स्वतंत्र वादन होऊ शकते हा विचार दृढ झाल्यावर या बोलभाषेचा खऱ्या अर्थाने विकास सुरू झाला असावा. व्यावहारिक भाषेत गद्य व पद्य असे जरी शब्दप्रकार असले तरी संगीतात केवळ पद्य व काव्यच आहे. तबल्याच्या रचनांचा विचार केल्यावर ही गोष्ट पटकन लक्षात येते.
तबल्यात विस्तारक्षम व पूर्वसंकल्पित अशा दोन प्रकारच्या रचना आहेत. विस्तारक्षम रचनांना केवळ पूर्वसंकल्पित रचनांच्या तुलनेत जरी एखाद्या वेळेस गद्य समजले तरी त्यांच्यातील व्याकरणामुळे त्या पद्यच आहेत हे लक्षात येते तबल्याची भाषा काव्यच आहे असे विधान केले तर त्याला पुष्टी देणाऱ्या अनेक गोष्टी दिसून येतात.
तबल्याचा ताल म्हणजे एक निश्चित मात्रांचे वृत्त असते. ठेका हा त्याच वृत्तात बनतो. एखाद्या काव्याचे सर्व चरण समान मात्राकालाचे असतात. त्याप्रमाणेच ठेकाही तालाशी बांधील असल्याने पद्य बनतो. यामुळेच विविध तालात बनविलेल्या रचना त्या तालाच्या मात्रांइतक्याच अथवा गुणकाच्या पटीत असल्याने त्या पद्मरूपी होतात (महत्त्वाची गोष्ट म्हणजे काव्यात्मकता देणारी अशी 'ठेका' ही तालाची पहिली रचना / बंदिश आहे.) पद्यामध्ये चरणांच्या गम्भी / शेवटी विशिष्ट अक्षरांचा उपयोग करतात, की ज्यामुळे आरंभ व अंत्य ओळखणे सोपे जाईल. तबल्यातही बाचप्रमाणे सुरुवात व शेवट विशिष्ट अक्षरांनी होतो. उदा. कायद्याची सुरुवात बहुदा 'धा' ने व शेवट अपवाद वगळता 'धिनागिना' या बोलाने असतो.