हे आहे शास्त्रीय संगीत !!
शेकडो वर्ष साधना करून प्राप्त केलेलं हे संगीत सहज शिकता येणार नाही, दहा जन्म कमी पडतील. शास्त्रांमध्ये केवळ या रागात धैवत लागतो या रागात पंचम लागतो एवढच सांगितलय का ? रागाच्या माध्यमातून परमेश्वरा पर्यंत पोचण्याची वाट दाखविली आहे, भारतीय शास्त्रीय सांगितला मार्गी संगीत उगीच नाही म्हणत. आणि तो मार्ग प्राप्त करण्यासाठी त्याग हा करावाच लागणार ! जर पैसा कमवायचा असेल, घरदार सांभाळायच असेल तर भावगीत गा फिल्मगीत गा. या वाटेवर चालायचं असेल तर एकट आणि उपाशी राहायला शिका. ज्याच मन स्थिर नाही ती व्यक्ती ख्याल संगीत सखोलतेने गाऊ शकत नाही. प्रत्येक स्वराची व श्रुतीची पूजा जर करायची असेल तर त्यासाठी मन निर्मळ आणि स्थिर हवं. ख्याल म्हणजे काय ? ख्याल म्हणजे कलाकाराची त्या वेळची त्या क्षणाची मनोवस्था. ती मनोवस्था तो रागाच्या स्वरुपात मांडत असतो. गात असतांना पुढच्या क्षणात रागाच कुठलं नवीन रूप आपल्याला उमजणार आहे हे आपल्यालाच माहित नसतं. रागाच सत्य जर का उत्स्फूर्तपणे शोधायचं असेल तर मनात असत्य, लोभ, अपवित्रता यांना जागा नाही. त्यासाठी लागणारा संयम, निष्ठा प्रत्येका जवळ उपजत असेलच असं नाही. शास्त्रीय संगीताच्या नावाखाली स्वरांशी कुस्ती करणारे बरेच पैलवान आपल्याला पाहायला मिळतात, पण ते उपयोगाचं नाही. डोळे बंद करून सा लावल्यावर रागाला सोडून दुसरा कुठलाच विचार मनात येता कामा नये.
रियाज केवळ संगीताचा नव्हे तर कलाकाराच्या सहनशक्तीचा व चिकाटीचा आहे. कारण हा प्रवास खूप दूरचा आणि खडतर आहे, हार मानायचे खूप प्रसंग येतात पण एका कलाकाराने कधीही हार माणू नये. ज्या कलाकाराचं आपल्या मनावर नियंत्रन असेल त्याचा निश्चय कुठलीही परिस्थिती भंग करू शकणार नाही. तांत्रिक गुंतागुंतीत अडकून राहू नये, वर्षानुवर्षे १५ ते २० तास रियाज करून तांत्रिक प्रभुत्व जरी मिळवल तरी सत्याचा शोध लागू शकत नाही ! तंत्र हे भाव व्यक्त करण्याच फक्त साधन आहे, तंत्र शिकवलं जाऊ शकतं परंतु भाव शिकवला जाऊ शकत नाही. त्यासाठी स्वताच्या अंतरमनात प्रामाणिकपणे डोकावण्याची क्षमता पाहिजे, हे अतिशय अवघड आहे. यात आयुष्य जातं, म्हणूनच त्याला तपस्या म्हणतात. आणि तिकडे सापडलेल्या सत्याला सामोरे जायला खूप धाडस लागतं. कारण सत्य बऱ्याचदा कुरूप असतं !!