अशी बनते सतार
महाराष्ट्राच्या दक्षिणेला पंढरपूरजवळ बेगमपूर नावाचे एक छोटे खेडे आहे. शेतकरी दसरा झाल्यानंतर आपल्या शेतात भोपळ्याच्या बियांची लागवड करतात. हे भोपळे खासकरून वाद्य तयार करण्यासाठीच पिकविले जातात. याची पूर्ण वाढ होण्यासाठी सहा-सात महिन्यांचा काळ जातो. शेतकरी याची विशेष काळजी घेतात जेणेकरून यांचा आकार बिघडता कामा नये. मार्च महिन्यात वाढ पूर्ण होताच हे भोपळे देठापासून कापून शेतातच वाळविण्यासाठी ठेवले जातात. पंढरपूरच्या उष्णतेत होरपळून निघालेले अद्वितीय असे हे भोपळे न आक्रसता आपला आकार तसूभरही बदलत नाहीत. ही पंढरपूर भागातल्या भोपळ्यांची खासियतच म्हणावी लागेल. हे भोपळे पूर्णपणे सुकल्यानंतर ते विक्रीसाठी ठेवले जातात आणि त्यांना चांगला भावही मिळतो.
मिरजेतले सतार मेकर्स खास पंढरपूर भागात येऊन भोपळे खरेदी करतात. विकत घेतलेले हे भोपळे लॉरीने मिरजेत आणले जातात. त्यानंतर त्यांना पोटमाळ्यावर ठेवण्यापूर्वी खोलीच्या छताखाली ते कोणती जागा पटकावणार हे त्या भोपळ्याचा घेरच ठरवितो. त्यावर त्याची शाईने तशी नोंद केली जाते. जेव्हा सतार किंवा तंबोरा तयार करण्याची ऑर्डर मिळते त्यावेळी प्रत्येकाच्या सोयीनुसारच तो तयार केला जातो, मग तो वापरणारा पुरूष किंवा स्त्री कोणीही असो, त्याला जो योग्य, सोयीचा वाटेल तोच भोपळा त्याच्यासाठी निवडला जातो. पुरुषांसाठी असणा-या भोपळ्याचा आकार तुलनेने मोठा असतो.
अशी बनते सतार आणि तंबोरा
भोपळा देठाच्या बाजूने गोलाकार कापून आतल्या सर्व बाजूंनी साफ केला जातो. त्यानंतर भोपळ्याच्या आतली त्वचा मऊ व्हावी म्हणून त्यात पाणी भरले जाते आणि तो पाण्याने भरलेला भोपळा दोन दिवस त्याच स्थितीत ठेवला जातो. दोन दिवसांनी त्यातील पाणी आणि गर काढून टाकाला जातो. त्यानंतर, त्यात उभ्या आडव्या दिशेने लाकडी काठ्या घट्ट बसविण्यात येतात जेणेकरून त्याला दिलेला आकार हा ‘समाकार’ रहावा हा त्यामागील उद्देश असतो. त्याचवेळी त्याच्या गोलाकार भागाभोवती ‘तून’ किंवा ‘टून’चे लाकूड वापरून त्यापासून त्याचा गळा तयार केला जातो.
शेवटी लाखेचा वापर करून त्या गळ्यावर दांडी बसविली जाते. त्यानंतर भोपळ्यावर लाकडाची एक तबकडी बसविली जाते जेणेकरून भोपळा बंद होतो. यापुढे त्यावर कलाकुसर केली जाते. त्यानंतर चार पाच वेळा पॉलिशचे हात दिले जातात. हे करत असतानाच या वाद्याचा रंग ठरविला जातो. शेवटी त्यावर खुंट्या, तारा आणि वाद्या बसवून हे वाद्य सूर जुळवून वाजविण्यासाठी सज्ज होते. अशा त-हेने सतार किंवा तंबो-याचा जन्म होतो.