संगीत एक संजीवनी
साहित्य संगीत कला विहिन:
साक्षात् पशुतुल्य पुच्छविषाणहिनः।
या श्लोकाप्रमाणेच मानवी जीवनात संगीत हे एक भौतिकाकडून अध्यात्माकडे घेऊन जाण्यास मदत करणारे माध्यम मानले जाते.भारतीय संस्कृतीमध्ये संगीत, संस्कृत ज्योतिष, आयुर्वेद आणि योगशास्त्र या पाच विद्यांचे अमूल्य महत्त्व आहे. आजही हे सूर मानवी जीवनावर रूंजी घालत आहेत.'संगीत' हे मानवी चंचल मनाला शांत करणारे एक औषधच म्हणावे लागेल ! पूर्वी गुरुआश्रमी राहून विद्यार्थी विद्यार्जन करीत तेव्हा प्रथम त्यांच्याकडून 'ओंकार साधना ' करून घेतली जात असे. बालवयापासूनच मुलांवर संगीताचे संस्कार झाल्याने संगीताबद्दल रूची , आवड, आस्था त्या मुलांमध्ये निर्माण होई. संगीत साधकांनी याचा उपयोग आत्मानंदासाठी करून घेतला , तर काहींनी आपली विद्या विद्यार्थ्यांमध्ये परावर्तित करून संगीताचा प्रचार प्रसार केला.हा अनमोल ठेवा समाजात तळागाळापर्यंत पोहोचवला. एका अर्थी त्यांनी आनंदाचा ठेवा इतरांना वाटून संगीत अगदी, लहानांपासून-मोठ्या पर्यंत श्रीमंतापासून-गरीबां पर्यंत कुठलाही हातचा न ठेवता सर्वाच्या अंतरात रूजविले.त्याचा एक परिणाम असा झाला , की आमच्या या धकाधकीच्या आयुष्यात मनाला विसावा देण्यासाठी संगीत विद्येने आपले अस्तित्व कायम ठेवले. मोठमोठ्या रिसर्च सेंटरमध्ये यावर संशोधने होऊ लागली, 'संगीत' हे मानसिक ताण- तणाव तसेच मनोविकारावर एक उत्तम औषध आहे असे अमेरिकेतील संशोधकांनी जाहीर केले आहे.म्हणूनच म्हणतात ,
संगीत है शक्ती ईश्वर की
हर सूर मे बसे है राम
रागी जो गाए रागिणी
रोगी को भी मिले आराम
संगीत हे माणसाला सच्चिदानंदाची अनुभूती देणारी जणू 'संजीवनी'च आहे!