पंडित कल्याणजी गायकवाड यांना 'स्वर-मार्तंड' पुरस्कार प्रदान !
आळंदीतील प्रसिद्ध गायक व संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड यांना नुकताच 'श्री संत एकनाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्कार' प्रदान करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते गायकवाड यांना नुकताच पुरस्कार प्रदान केला.
ह.भ.प. संत एकनाथ महाराज मिशनच्या वतीने पैठण येथे आयोजित सोहळ्यात भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अमृताश्रम स्वामी (जोशी), भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषारजी भोसले, तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज, पंढरपूर विठ्ठल-रखुमाई संस्थानचे विश्वस्त ह.भ.प जळगावकर महाराज, नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज आदी उपस्थित होते. ह.भ.प. योगिराज महाराज गोसावी यांनी पुरस्काराबद्दल भूमिका मांडली.
जालना जिल्ह्यातील बारसवाडा या खेडेगावात पं.कल्याणजी गायकवाड यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच कल्याणजींना भजन गायनाची आवड, हीच आवड त्यांना स्वस्थ बसून देईना. वयाच्या १२ व्या वर्षी घरदार सोडून कल्याणजी भजन शिकण्यासाठी श्रीक्षेत्र आळंदीत आले. घरची परिस्थिती बेताची त्यामुळे पैशाची कमतरता, अशाच परिस्थितीत कल्याणजींनी आळंदीतील सिद्धबेट येथील वैकुंठवासी जयराम भोसले यांच्या धर्मशाळेत आश्रय मिळवला. दररोज चार घरी जाऊन मधुकरी मागायची व मिळेल ते खाऊन गायनाचा रियाज करायचा. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. अंतरीचे वणवे अंतरीच दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या बान्यापासून सुरक्षित राखण्यासाठी कसरत करायला लागते. जगण्याचा ताल आणि तोल सांभाळावा लागतो. जगण्याचे सूर सापडले की, आयुष्याला सौंदर्याचे साज सहज चढवता येतात. सद्विचारांचे साज लेवून आयुष्याला देखणेपणाच्या कोंदणात अधिष्ठित्त करावे लागते. सौंदर्याचे ताटवे उभे करून लक्ष देऊन सांभाळावे लागतात. आयुष्यात सकारात्मक विचारांना सांभाळता आले की, जगण्याला सजवणे सुगम होतं, हेच जीवनाचं सोपं वर्म कल्याणजींना सापडलं आणि संगीत क्षेत्राची वाटचाल जोमाने सुरू केली. साधना, रियाज आणि चिंतन करून यांनी आपल्या कलेवर प्रभुत्व मिळवले व आपली कला आपल्यासाठी मर्यादित न ठेवता कोणत्याही शिष्याकडून शिक्षणाचे मानधन न घेता मोफत शिक्षण दिले. वारकरी भजन संगीतामध्ये अनेक गायकांची पिढी कल्याणजींनी घडविल्या. त्यामध्ये कार्तिकी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड, आदिनाथ सटले, कौस्तुभ थोरवे, ज्योती गोराणे इ. आहेत. अशा या महान गायकाला 'स्वर मार्तंड' ह्या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल भारतीय संगीत कलापीठ आणि संगीत-जगत परिवारातर्फे तर्फे हार्दिक अभिनंदन..!