संगीताच्या विविध परीक्षांना बसणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी निवेदन
संगीताच्या परीक्षेला बसणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांनो ,आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे, ते लक्षपूर्वक ऐका आणि ध्यानात ठेवा. पहिली गोष्ट आपल्या अभ्यासक्रमाप्रमाणे जर आपला अभ्यासक्रम पूर्ण झाला नसला, तर आपण परीक्षेचा फॉर्म भरू नये. आपण त्या वर्षात जर आजारी पडलात, अभ्यास करून शकला नाहीत, तर उगाचच त्या परीक्षेचा फॉर्म भरू नये, आणि आपले हसे करून घेऊ नये. आपण आपले गायन आणि आपण आपले वादन मोबाईलवर अथवा अन्य उपकरणावर रेकॉर्ड करून, स्वतः ऐकावे व त्यावरून ठरवावे की, परीक्षेला बसावे की बसू नये. आपल्याला जर हे कळत नसेल तर, आपले हे रेकॉर्डिंग कुणा जाणकार व्यक्तीला ऐकवावे व त्यांचा नीट सल्ला घ्यावा. नेहमी लक्षात ठेवा की परीक्षा पास होणे हा गायन वादन शिकण्याचा उद्देश नसून ती एक आपली स्वतःची परीक्षा असते. त्यात आपण उत्तीर्ण होण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत. आपले प्रामाणिक प्रयत्न मात्र त्यासाठी झाले पाहिजेत. रोजचा रियाज आपल्याला केला पाहिजे. श्रवण, मनन, चिंतन, प्रत्यक्ष गायन असे रियाजाचे अनेक घटक असतात. त्या सर्व घटकांवर आपण लक्ष दिले पाहिजे, आणि ते आपल्या रियाजात जात अंतर्भूत केले पाहिजेत. इतर परीक्षा आणि संगीताच्या परीक्षा यामध्ये भरपूर फरक आहे. संगीताच्या परीक्षेत प्रत्यक्ष सादरीकरण करावे लागते. आणि त्यात स्वर, ताल, शब्दफेक हे आपल्याला जमावे लागते. दहावी बारावीला मार्क वाढतात, म्हणून कोणीही संगीत शिकू नये. आपल्याला जर संगीताची मनापासून आवड असली, त्यात आपल्याला गती असली, तरच आपण संगीत शिकावे. संगीत शिकण्यासाठी चांगला गुरु शोधणे अत्यंत आवश्यक असते. संगीत ही एक तपश्चर्य आहे, साधना आहे, हे लक्षात ठेवावे. संगीत हा छंद नाही हेही लक्षात असावे. संगीत ही हॉबी नाही. तिकिटे जमवणे, नखे वाढवणे, केस वाढवणे, वेगवेगळ्या मुर्त्या गोळा करणे, वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील एखाद्या विवक्षित विषयावरची कात्रणे जमा करून, त्याची चिकटवही तयार करणे असे अनेक छंद जोपासले जातात. त्यामध्ये संगीत अजिबात कुठेच बसत नाही हे आपण लक्षात ठेवावे. फावल्या वेळात संगीत शिकून संगीतात प्रगती साधता येत नाही. मी सगळं काही सांभाळून संगीत करेन, असा कोणीही विचार करू नये. संगीतासाठी वेळ काढावा लागतो. मला वेळ नसतो ही सबब चालत नाही. "आम्हाला कुठे गायन सादर करायचे आहे ? आम्हाला फक्त त्यातून आनंद घ्यायचा आहे" हे विधान अत्यंत हास्यास्पद आणि अज्ञानाचे द्योतक आहे असे मला वाटते. कारण संगीत ही सादरीकरणाचीच कला आहे. सादरीकरण जर केले नाही तर संगीत शिकून काहीही उपयोग होत नाही. राहिली गोष्ट आनंदाची.
तर विद्यार्थ्यांनो लक्षात असू द्या की,
संगीतातून आनंद हा १२ ते १४ वर्षानंतर हळूहळू मिळू लागतो. ज्याप्रमाणे नारळाचे बी पेरल्यावर नारळ लागायला जितकी वर्ष लागतात, तितकीच वर्ष संगीत शिकण्यास सुरुवात केल्यापासून ते आनंद मिळेपर्यंत लागतात. नुसती वर्षे जाऊन चालत नाही तर त्या वर्षांतील प्रत्येक दिवशी रियाज हा करावा लागतो. संगीत विषयक साहित्य वाचावे लागते, अनेक मोठ्या प्रतिभावंत गवयांचे संगीत ऐकावे लागते. परीक्षेत जेव्हा आपण परीक्षकासमोर बसतो, त्यावेळी परीक्षक आपल्याला अनेक प्रश्न विचारत असतात. त्याची उत्तरे आपण कुठलाही ताण न घेता अत्यंत धीराने दिली पाहिजेत. घाबरून जाऊन उपयोग नाही. घाबरल्याने जे येत असते तेही आपण विसरून जातो. यात दुसरा महत्त्वाचा भाग असा की, परीक्षक आपले स्वर,ताल ज्ञान जोखण्याचा प्रयत्न करीत असतात. वेगवेगळ्या रागातील बंदिशी गाऊन दाखवा असे ते सांगतात. यावेळी राग बदलणे बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही. एका रागातून ते दुसऱ्या रागात जाऊ शकत नाहीत. अशावेळी काय करावे हे त्यांना सुचत नाही.
मी एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण राग बदलतो, त्यावेळेला त्या रागाची बंदिश आपण गुणगुणावी. म्हणजे त्या रागाचे स्वर त्या बंदिशीच्या माध्यमातून आपल्या गळ्यावर स्वार होतात. कारण रागातील आरोह अवरोहांपेक्षा बंदिश ही आपल्या लक्षात राहते. आपल्या सांगितिक बुद्धीला समजते सध्या इतर विषयांची जेव्हा परीक्षा असते त्यावेळी बरेचसे विद्यार्थी परीक्षेच्या आधी काही दिवस भरपूर अभ्यास करत बसतात आणि मग पाठांतर करून परीक्षे परीक्षेत जातात. ते डोक्यात पाठ केलेले परीक्षेत लिहून पासही होतात. परंतु तसे संगीताच्या परीक्षेचे नसते. संगीताच्या परीक्षेसाठी नक्की केलेल्या रागांचे रागांचे आरोह अवरोह, बंदिशी याचा आपल्याला सलग वर्षभर अभ्यास करावा लागतो. तरच परीक्षेत यश मिळण्याची शक्यता निर्माण होते.
"माझी मुलगी सगळीकडे, सर्व क्षेत्रात, जिथे जिथे तिला घातली तिथे तिथे अपयशी ठरली, म्हणून विचार केला की तिला संगीत तरी शिकवावे" हा विचार अत्यंत चुकीचा असा आहे. संगीतासाठी सुद्धा या कलेची आवड, अत्यंत तरल बुद्धिमत्ता, स्वरज्ञान, तालज्ञान हे मुळातच असावे लागते. आवाज कितीही चांगला असला, आणि जर बुद्धिमत्ता नसली किंवा ताल अंगात भिनलेला नसला, तर तो विद्यार्थी संगीत क्षेत्रात कधीच यशस्वी होऊ शकत नाही, हे लक्षात असू द्यावे. संगीताच्या परीक्षेत "ख्याल गायनाची" परीक्षा ही रागाचा मनाने विस्तार करूनच दिली पाहिजे. सध्या बऱ्याच संगीत विद्यालयांमध्ये ख्यालासाठी सुद्धा आलाप लिहून दिले जातात. ही प्रथा अत्यंत वाईट असून, ख्यालाचा विस्तार म्हणजेच, ख्यालाच्या माध्यमातून त्या रागाचा केलेला विस्तार कसा करावा हे विद्यार्थ्याला समजत नाही. ते सर्वप्रथम समजावून सांगावे. रागातील स्वरांच्या वेगवेगळ्या रचना मनानी कशा कराव्या याचे विद्यार्थ्याला स्पष्टीकरण दिले पाहिजे. "मी गातो तसे तुम्ही गा" इतके सांगून विद्यार्थ्याचे दिशाभूल करता कामा नये. मला रागाच्या स्वरांच्या रचना कशा सुचतात ?, त्या मी कशा सादर करतो, वादी संवादी कोणते इत्यादी माहिती देऊनच गुरुने शिष्याला राग गायन शिकवले पाहिजे. शिष्याने देखील कुठलाही आड पडदा न ठेवता, गुरूला अनेक प्रश्न विचारून, ज्ञान त्यांच्याकडून काढून घेतले पाहिजे. थोडक्यात, गुरु शिष्य संवाद हा झालाच पाहिजे. संवादातून ज्ञान प्रकट होते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून, त्याप्रमाणे जर आपण रोज रियाज केला, अनेक गवयांची गाणी ऐकली, संगीत विषयक पुस्तकांचे वाचन केले, चिंतन केले, मनन केले, तर संगीत हे आपल्यापासून फारसे दूर राहत नाही.