संगीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने तबला शिकावाच ?
तालाची व्याख्याच मुळात संगीत मोजण्याच्या क्रियेला 'ताल' म्हणतात अशी आहे. या व्याख्येवरून संगीतातील तालाचे महत्त्व आपोआप लक्षात येते. भारतीय संगीतातील तालाची व्याप्ती प्रचंड आहे. उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय अशा दोन संगीतपद्धती आहेत.
उत्तर भारतीय संगीत शिकणारा विद्यार्थी; मग तो कोणताही प्रकार शिकत असो त्याला तबला / पखावज शिकणे फार महत्त्वाचे आहे. संगीत शिकणारे विद्यार्थी दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे काही जणांना लय-तालाची जाणीव जन्मतःच असते. दुसरा प्रकार म्हणजे असे विद्यार्थी की ज्यांना लय-ताल पटकन कळत नाही. काही जण असेही असतात की त्यांना लयीची जाणीव असते; पण ताल, त्याच्या मात्रा इ. काही कळत नाही. तर काही जणांना ताल, त्याचे बोल कळतात पण त्यांना मुळात लयीची अनुभूतीच येत नाही.गायनातील एखादी बंदिश चांगली सुरेल गाता आली, गळा तयार असला की सगळे आले असे नाही. खूप विद्यार्थी असे असतात की ज्यांचा गळा खूप तयार असतो, गोड असतो असे विद्यार्थी तालविरहित गाताना राजासारखे गातात. पण ताल सुरू झाला की यांची बोबडी वळते. याचाच अर्थ असा की बरेचसे विद्यार्थी तालाला खूप घाबरतात आणि या घाबरण्यामुळे त्यांच्या जमेच्या बाजू ते विसरून जातात व अपयशी ठरतात. म्हणजेच तालविषयक अज्ञान व भीतीपोटी त्यांचेच नुकसान होते. तालविषयक भीतीची किंवा अज्ञानाचा आणखी एक तोटा म्हणजे आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा होतो.
स्वर-ताल हा संगीताचा प्राण आहे. यातील एक जरी नसेल तरी संगीत निर्माणच होऊ शकणार नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचे अध्ययन चांगले असणे आवश्यक आहे. यावर प्रभुत्व आल्यास सादरीकरण आपोआप चांगले होईल. म्हणून कोणताही संगीतप्रकार आपण शिकत असलात तरी तबला/पखावजाच्या शिक्षणाची विद्यार्थ्याला आत्यंतिक गरज आहे. संगीतसाधनेतील साधारण ६-७ महिने केवळ तालावर मन एकाग्र करा. एकदा लय-ताल उमजू लागल्यावर गायला आणखी मजा येईल. शिवाय आत्मविश्वास वाढेल.
तबला/पखावजाचे शिक्षण घेणे म्हणजे केवळ ही वाद्ये वाजवत बसणे नव्हे. यापेक्षा तालशास्त्राचे शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. हे शिक्षण मौखिकरीत्या, विशिष्ट हस्तक्रियांच्याद्वारे घेता येते. प्रत्येक ताल त्याची खाली-भरी दाखवून म्हणणे इ. गोष्टींमुळे तो ताल समजायला खूप मदत होते. प्रत्यक्ष वादनाचे शिक्षण घेतले तर उत्तमच; पण तबल्यावरील तालांचे ठेके वारंवार ऐकल्यावरही कान आपोआप तयार होतात. त्यामुळे स्वराबरोबर तालाभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी तबल्यातील प्राथमिक बोल शिकून विविध तालांचे ठेके वारंवार वाजवावेत. यामुळे तालज्ञान वाढण्यास खूप मदत होईल.