ताना म्हणजे काय ?
आलाप गायनाप्रमाणेच तानांचे गायन हेही ख्यालगायकीचे प्रभावी अंग आहे. आलापापेक्षा ताना गाताना तालाची लय थोडी वाढवतात. काही गायक लय जास्त न वाढविता तानाच दुप्पट लयीत घेतात. ताना गाताना रागनियम थोडे शिथिल होतात म्हणजे न्यास स्वर, कणस्वर, मींड हे तेव्हा गळ्यातून काढून दाखविणे शक्य नसते. प्रारंभी छोट्या ताना घेणे इष्ट. रागातील वॉवर्ज्य स्वर, रागाची प्रकृति, मन्द्र, मध्य किंवा तार सप्तकातील चलन या बाबीचा जसा आलापात तसा तानातही विचार करावा लागतो व षड्जापाशी यावे लागते. मंद्र ते मध्य किंवा मध्य ते तार सप्तकातील स्वर घेऊन तानेचे क्षेत्र वाढते. तिन्ही सप्तकात गायिली जाणारी तान गायकाच्या आवाजाची कुशलता दाखविते. अशाप्रकारे आलाप व तान हे रागगायनातील सौंदर्य वाढवितात.
तान म्हणजे काय ?
स्वरांचा असा एक समूह की जो द्रुत गतीने गायील्यास रागगायनात चमत्कृतीमुळे मिळणाऱ्या आनंदाचा व सौंदर्याचा आविष्कार होतो. 'तन्' (ताणणे) ह्या संस्कृत धातूपासून तान हा शब्द प्रचारात आला. रागातील नियम स्वरांना द्रुत गतीने गाऊन विविध प्रकारच्या ताना होतात. हे तानांचे विविध प्रकार असे.
१. शुद्ध तान - ज्या तानेत स्वरांचा क्रम सरळ आरोही व अवरोही असा असतो तिला 'शुद्ध तान' म्हणतात. हिलाच सरळ तान म्हणतात. उदा. रेगमपधनिसारे, सांनिधपमगरेसा. हिलाच आरोही अवरोही किंवा सपाट तान असेही म्हणतात.
२. कूट तान किंवा वक्र तान - ज्या तानेत स्वरांचा क्रम मागे पुढे किंवा वक्र असतो तेव्हा तिला 'कूटतान किंवा वक्रतान' म्हणतात. उदा. गमपमगरेसा, धनिधपमगरे, रेगरेपगमरेसा.
३. मिश्र तान - शुद्ध व कूट तानांचा मिश्र प्रयोग केल्यास ती 'मिश्र तान' म्हणावी. उदा. गमपधमपमग, रेगमगरेगरेसा.
४. खटक्याची तान - जर तान दुप्पट लयीत गायक गात असेल व मध्येच ती जर चौगुणमध्ये गायिली गेली तर तिला 'खटक्याची तान' म्हणतात.
५. बेहेलाव्याची तान - छोटे छोटे स्वरसमुदाय घेऊन बेहेलाव्याच्या ताना गातात. उदा. गमपगमरेसा, निनिधपमगरेसा, सारेंसांनिधपगमपगमरेसा.
६. अचरक तान - ह्या तानेत एक एक स्वर दोनदोनदा घेतले जातात. स्वरांचे द्वित्व ह्यात अपेक्षित असते. उदा. सासा, रेरे, गग, मम, पप.
७. ढाल तान - सरळ आरोही अवरोही क्रमाच्या जोरकस तानेला 'ढाल तान' म्हणतात.
८. सरोक तान - चार चार स्वर एकापाठोपाठ घेतले जातात ती 'सरोक तान' होय. उदा. सारेगम, रेगमप, गमपध, मपधनि, धपमग, पमगरे, मगरेसा.
९. लडंत तान - गतीची रचना किंवा आडलायीचे प्रकार असलेली तान म्हणजे लडंत तान होय. उदा. सारे सारे गममम रेगरेसासा.
१०. पलट्याची तान - आरोही स्वर घेत असताना मध्येच पलटून अवरोही क्रम घेणाऱ्या तानेला 'पलट्याची तान' म्हणतात.
११. गिट्करी तान - दोन स्वरांना घेऊन लगेच दुसऱ्या स्वराला पकडून पुढचा स्वर दोन वेळा म्हणण्याच्या क्रियेला 'गीटकरी तान' महणतात. उदा. निसा निसा, सारे सारे, रेग रेग,
१२. जबडयाची तान - कंठाच्या आतील भागातून आवाज काढून जबडाच्या मदतीन जोरकस आवाजात एक एक स्वर पुनःपुन्हा म्हटल्या जाणाऱ्या तानेला जबड्याची तान म्हणतात, अशा ताना म्हणायला कठीण असतात. .
१३. हलक तान - ही तान मंद्र सप्तकालील स्वरात नाभिस्थानापासून गंभीर आवाजान घेतली जाते. ही तान सहज पण जोरकसपणे गायिली जाते.
१४. गमक तान - गमक हा प्रकार आलापातही केला जातो. शीघ्र गतीने गमकेचे स्वर तानेत घेतल्यास ती 'गमक तान' होते. ह्यात स्वरांचे द्वित्व व आंदोलन असते.
१५. आलंकारिक तान - स्वरांचे अनेक अलंकार आलापातही असतात, ते द्रुत लयीत त्या त्या रागात गायिले की ती 'अलंकारिक तान' होते. उदा. सारेगम, रेगमप, गमपध. सारेग, रेगम, गमप, सारे गरे सारेग इ.
१६. छूट तान - तानेची तार सप्तकातून सुरुवात करून अवरोही क्रियेने शीघ्रतेने खाली गात येणे म्हणजे छूट तान होय. उदा. रेंसांनिधपमगरेसा.
१७. बोल तान स्वरात गीताचे बोल गुंफून तालात ते द्रुत लयीने गाणे म्हणजे बोलतान होय.
वरील सर्व तानांचे प्रकार रागगायनात गायक जरी एकाच वेळी नाही तरी रागाच्या प्रकृतीनुसार, आपल्या आवाजधर्मानुसार व आपल्या संगीत शिक्षणातून घेतलेल्या रियाजानुसार करीत असतो. आलाप हे सर्व रागगायनाचे महत्त्वाचे अंग आहे. आलापामुळे रागाचे स्वरूप, शास्त्र व सौंदर्य वाढते. आलापात रागाचे चलन महत्त्वाचे असते. स्वरांचा लगाव, कण, मींड, गमक, वक्र स्वर हे आलापाचे म्हणजेच ओघाने रागाचे सौंदर्य वाढवितात, तर तानांच्या प्रयोगाने रागाचे वैचित्र्य, आवाजाचा गुणधर्म व तयारी, गळ्याचा हलकेपणा दिसून येते व त्यामुळे तानाही रागगायन रंजक करतात.