ढोलकी
महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकवाद्य संगीत तज्ञ कुर्ट सॅक्सच्या वर्गीकरणानुसार कंपीत वाद्य आणि भारत मुनींच्या वर्गीकरणानुसार आघात वाद्य या प्रकारात मोडणारे ढोलकी हे वाद्य आहे. तमाशा, पोवाडा, लावणी, खडीगंमत,शक्तीतुरा ई.संगीत प्रकारात महाराष्ट्रातील अनेक लोककला प्रकारात हे वाद्य वाजवले जाते. हे वाद्य पखवाजाप्रमाणेच असुन गळ्यात अडकून याचे वादन केले जाते. दोन्ही बाजूस चामडे दोरीच्या सहाय्याने ताणून घट्ट बसविले जाते एका बाजूस शाईचा लेप व दुसऱ्या बाजूस मसाल्याचा लेप चढवतात. दोरी ऐवजी नटबोल्ट आवळून पण ताण देण्याची पद्धत आहे. लावणी, सिनेसंगीत, लोकसंगीत, इत्यादी मध्ये या वाद्याचा वापर सर्रास केला जातो.
ढोलकी वादन करण्यासाठी किव्हा समजण्यासाठी संगीतामधील जाणकार असण्याची गरज नाही. गरीब,श्रीमंत संगीताचे जाणकार आणि सामान्य लोक अशा सर्वांनाच ढोलकी वेड लावते. ती कुठेही भेद करत नाही. तिच्यावर थाप पडताच प्रत्येकाच्या काळजाला भिडणारे हे एकमात्र वाद्य आहे. ढोलकी ऐकताना अगदी काही क्षणातच प्रत्येकाच्या मनात आनंद लहरी निर्माण होतात. अशी भावना ढोलकी सम्राट पंडित श्री पांडुरंग घोटकर गुरुजी यांनी व्यक्त केली आहे. पुढे गुरुजी म्हणतात वादकांना ढोलकीचा बाज कळालाच पाहिजे. ढोलकी हे वाद्य तासनतास एकट्याने वाजवण्याचे वाद्य म्हणजेच सोलो नाही तर ते ढोलकीच्या साथीने गाणं रंगवण्याचे वाद्य आहे. खूप वेळ ढोलकी वर कायदे, गत, मुखडे, तुकडे, चक्रधार इत्यादी वाजवून ढोलकीचा तबला करू नये.
ढोलकी हे वाद्य खैर, शिसम, बाभूळ, चिंच इत्यादी वृक्षांच्या खोडापासून तयार केलेले असते. खैर व शिसमची ढोलकी टिपेच्या स्वरात अधिक असदार बोलते. तिचे खोड हे आतुन पोखरलेले असते. शाईकडील बाजू निमुळती होत जाते व डग्ग्याकडील बाजू ढोलकीच्या मध्यभागाच्या प्रमाणात असते. ढोलकीला बाया व चाटी अशी दोन तोंडे असतात. चाटीकडील बाजू कमीत कमी सव्वा पाच इंच रुंद असते व बायाकडील बाजू सव्वा आठ इंच रुंद असते.
चाटीकडील बाजू गोलाकार स्टील रिंग मध्ये चामडे ताणून शिवलेले असते. पानाच्या मध्यभागी दोन ते अडीच इंच रुंद वर्तुळाकार शाईचा थर दिलेला असतो.हे पान नटबोल्टच्या साह्याने खोडावर बसवले जाते. ढोलकीच्या बायाकडील बाजूस चांमडे मढऊन गजरा बनवून खोडावर घट्ट बसवले जाते. त्यामधून घुमारा निघण्यासाठी गरजेनुसार आतील बाजूस मसाला लावतात. पूर्वी ढोलकीची पाने खोडावर बसवण्यासाठी रस्सीचा उपयोग व्हायचा. ढोलकी सुरात लावण्यासाठी मध्यभागी लाकडी खुंटी असायची. ही ढोलकी नऊ घरांची असायची परंतु हल्ली सर्व ढोलक्या नट बोल्टच्या व दहा घरांच्या आहेत. ढोलकीच्या चाटीसाठी वापरले जाणारे चामडे हे लहान म्हैस, बैल यांचे असते याला कटईचे पान म्हणतात. आणि बायासाठी वापरले जाणारे चामडे हे बकऱ्याचे असते. हे चामडे चुन्याच्या निवळीतून कमावले जाते त्यामुळे चामडे पांढरे शुभ्र बनते व रासायनिक प्रक्रियेतील हे चामडे पावसाळ्यात किंवा जास्त ताणामुळे फार काळ टिकत नाही.
ढोलकी हे पारंपारिक लोककलेतील लोकवाद्य असले तरी तिच्या गोडव्यामुळे आज तिचा वापर चित्रपट संगीतात मोठ्या प्रमाणात होताना दिसतोआहे. आज अनेक तरुण ढोलकी वादकांनी आपल्या वादन कौशल्याने ढोलकीला शास्त्रीय बैठक प्राप्त करून दिले आहे.
इ.स. 17 व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये तमाशा हा अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार आहे. हा कलाप्रकार सिद्ध होण्यापूर्वी महाराष्ट्रात गोंधळ, जागरण, बळीराजा आणि महासुभा, जोतिबा इत्यादी देवतांच्या कार्याची जागृती पर गीत गायन होत असे. त्याचबरोबर जागरण, वाघ्या-मुरळी, दशावतार, बहुरूपी, वासुदेवाची गाणी, पोतराज इत्यादी लोककला प्रकारामध्ये ढोलकीला महत्त्वाचे स्थान होते. या सर्व नाट्यात्मक लोककला प्रकारात आणि तमाशामध्ये तांत्रिक अंगाच्या दृष्टीने आणि वांग्मयीण बाजूने काही एक प्रमाणात साधर्म्य आढळते. तमाशा हा गण, गवळण, लावणी, बतावणी आणि वग अशा पाच अंगाने तमाशा समृद्ध झाला आहे. तमाशातील मुख्य वाद्य म्हणजे ढोलकी, तुणतुणे, हलगी किंवा कडे आणि झांज या चारींच्या वाद्यमेळ्यात नर्तकीच्या पायातील शाळांचाही म्हणजेच घुंगरांचाही भर पडत असे.
- डॉ.कृष्णा धों. होरंबळे
(रूपक संगीत विद्यालय, आजरा, जि.कोल्हापूर)