नाद
साऱ्या संगीत विश्वाची निर्मिती ज्यावर सर्वस्वी अवलंबून आहे तो नाद. यावाचून गीत, नृत्य, स्वर काहीच शक्य नसल्याने याला नादब्रह्म असेही म्हटले गेले आहे. संगीताचा संबंध ध्वनीशी आहे. आपण जे ऐकतो ते ध्वनीच आहेत. काही ध्वनी ऐकणे आपणास आवडते, अशा ध्वनीला मधुर ध्वनी अशी संज्ञा आहे. काही ध्वनी ऐकणे आवडत नाही, अशा ध्वनीला कर्णकटू किंवा कर्कश अशी संज्ञा आहे. पुरातन ग्रंथांमध्ये मधुर व कर्णप्रिय ध्वनीकरिता नाद ही संज्ञा आहे. भारतीय परंपरेमध्ये, आत्म्यामधून प्राण, प्राणामधून अग्नी आणि अग्नी आणि वायू यांच्या संयोगाने नाद निर्माण होतो, असे मानले गेले आहे. जो नाद संगीताला उपयोगी आहे त्याला “संगीतोपयोगी” आणि दुसऱ्या प्रकारच्या नादाला “संगीतोनुपयोगी”असे म्हटले गेले आहे.
आहत् नाद :
जो नाद कानाने ऐकता येतो आणि जो दोन वस्तूंच्या संघर्षातून उत्पन्न होतो त्यास आहत नाद म्हणतात या नादाचा संगीतामध्ये विशेष संबंध आहे. किंवा आहत नाद हाच संगीतासाठी उपयुक्त आहे.
अनाहत नाद :
अनाहत नाद म्हणजे ज्या नादाचा केवळ अनुभव करता येतो तसेच या नादाला विशेष कारण नसते, म्हणजे जो नाद कोणत्याही दोन वस्तूच्या संघर्षाशिवास उत्पन्न होतो त्यास अनाहत नाद म्हणतात उदा. ज्याप्रमाणे स्वतःचे दोन्ही कान बंद केल्यावर आपल्याला जो एक घुमणारा आवाज ऐकू येतो तो अनाहत नाद होय. याशिवाय नादपासनेच्या विधिव्दारे ध्यानाच्या अवस्थेमध्ये असल्यावर जो सूक्ष्म नाद ऐकू येतो तो अनाहत नाद होय.
प्राचीन काळात याच अनाहत नादाची उपासना आपले ऋषीमुनी करत. परंतु हा नाद संगीतोपयोगी नाही त्यामुळे संगीताशी या नादाचा काहीही संबंध नाही.