तालाच्या दहा प्राणांची उपयुक्तता
उत्तर भारतीय वर्तमान तालपद्धतीचा विचार केला असता असे जाणवते की प्रचलित तालव्यवहार तत्कालीन तालापेक्षा खूप वेगळा आहे. तत्कालीन तालव्यवहार हा प्रबंध गायनाच्या संगतीसाठी म्हणून निर्माण झाला त्याचप्रमाणे आजचा तालही संगतीसाठीच विकसित झाला. पण या दोन्ही तालव्यवहारामध्ये खूप फरक आहे. पण कर्नाटकी संगीतपद्धतीतील ताल मात्र प्राचीन तालाशी निकटचा संबंध दर्शवितो.
प्राचीन तालपद्धती ही प्रबंध गायनासाठी अस्तित्वात आली. त्यामुळे त्या प्रबंध गायनाला अनुरूप अशी ती तालपद्धती आहे. प्रचलित ताल ध्रुपद, धमार व आता जास्तीत जास्त ख्याल गायनासाठी निर्माण झाला, प्राचीन ताल हा जास्त आखीव रेखीव (बाधीव) होता. त्या मानाने आजच्या तालपद्धतीत थोडी मोकळीक आहे असे वाटते.
वर्तमान तालपद्धतीत दशप्राणांचा उपयोग.
वर्तमानकालीन ताल प्रकट होण्याचा मुख्य मार्ग म्हणजे 'ठेका' होय. त्यामुळे आजचे सांगीत ठेकाप्रधान आहे. त्यामुळे गायनावेळी तालाची बंदीश म्हणजे ठेका अखंडपणे प्रकट व्हावा ही आत्ताच्या संगीतप्रकारांची गरज आहे. दशप्राणांपैकी काही प्राण स्वरूप बदलून आज वापरात दिसतात. उदा. तत्कालीन 'अंग' हा प्राण आजच्या तालातील खंड होय, 'अंग' म्हणजे भाग किवा अवयव. खंडाचा अर्थ तोच आहे, पण तत्कालीन 'अंग' हा प्राण लघु-गुरू आदीने दाखवत असत व आजच्या तालातील खंड हे विशिष्ट मात्रांचे असतात.
आजच्या तालपद्धतीत उपयोगात येणारे प्राण म्हणजे ग्रह, जाती, लय, यती, प्रस्तार हे होत.
ग्रह हा प्राण आज साथसंगत तसेच प्रामुख्याने स्वतंत्र तबला वादनावेळी अतिशय प्रभावी पद्धतीने सादर केला जातो. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतीत- अनागत सादर करताना आवर्तनातील ग्रहण करण्याची जागा (ग्रह) समेपासून जेवढी जवळ तेवढा तो 'ग्रह' अतिशय परिणामकारक, गायन-वादनाची साथसंगत करताना या 'ग्रहांचा' गरजेनुरूप प्रयोग केला जातो. प्राचीन तालशास्त्रात चतुरश्र व त्र्यश्र अशा दोन जाती सांगितल्या आहेत. पण नंतर त्यांच्या संयोगातून खंड, मिश्र, संकीर्ण इ. जाती निर्माण झाल्या. कर्नाटक व उत्तर हिंदुस्थानी तालपद्धतीत याचा खूप वापर करण्यात आला. आज स्वतंत्र तबलावादनाच्या साहित्यामध्ये विविध घराण्यांनी विविध जातींचा आधार घेऊन हजारो रचना निर्माण केल्या आहेत. गायन, स्वरवाद्यवादक मुक्तपणे या जातींचा वापर करताना दिसतात.
'लय' महत्त्वाचा प्राण तो तर भारतीयच काय; पण जगातल्या कोणत्याही काळातील, कोणत्याही संगीतप्रकारचा श्वास आहे.
'यती' हा प्राण तबल्यातील काही रचनांमध्ये दिसून येतो. यतीच्या सर्व प्रकारांच्या आधारावर स्वतंत्र तबलावादनातील पूर्वसंकल्पित रचनांमध्ये 'यती'च्या आधारावर रचनांची निर्मिती दिसून येते.
स्वतंत्र तबलावादनाच्या साहित्यामध्ये विस्तारक्षम रचनांचे ठळक अस्तित्व दिसून येते. विस्तारक्षम रचनांचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विस्तारणे होय. या विस्ताराचे मूळ या प्राचीन तालपद्धतीतीत 'प्रस्तार' या प्राणात असावे. फरक एवढाच आहे की, सद्यःकालात या रचनांचा विस्तार लघु-गुरु इ. अवयवांनी न होता विविध बोल/बोलसमूहांच्या आधारे होत असतो. पण कल्पनासूत्र प्रस्ताराप्रमाणेच असते.