ईश्वर प्राप्तीसाठी संगीत
ईश्वरप्राप्तीसाठी संगीत या विषयावर चर्चा सुरू करण्याआधी आपल्याला ईश्वर म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. ईश्वर म्हणजे एक वैश्विक चैतन्यशक्ती. ही शक्ती चराचरामध्ये जागृत असते. जी शक्ति माणसांमध्ये सुद्धा जागृत असते. माणसाने ईश्वर हा सर्वप्रथम स्वतःमध्ये शोधला पाहिजे, आणि आपल्याशीच आपण संवाद साधला पाहिजे. असा संवाद साधला असता "आपण का जन्माला आलो", "आपले पृथ्वीवरील कार्य काय", "आपण जगात कसे वागले पाहिजे", "आपण जगाला काय दिले पाहिजे" या सर्वांचा विचार आपण केला पाहिजे. हा विचार करताना आपल्याला हे कळून येईल की कुठलंही चांगलं सामाजिक कार्य करीत असतात आपल्याला एका दैवी शक्तीची साथ मिळत असते. परंतु त्यासाठी अहंकार बाजूला ठेऊन त्या वैश्विक शक्तीच्या अस्तित्वावर विश्वास ठेवायला हवा. म्हणून संत तुकोबामहाराज म्हणतात,
जेथे जातो तेथे | तू माझा सांगाती ||
चालविशी हाती | धरोनिया ||
सदासर्वदा देव सन्निध आहे | कृपाळू पणे अल्प धारिष्ट्य पाहे ||
आपण नेहमी सकारात्मक विचार ठेवून काम करीत राहिलो, तर आपल्याला दोन तीनदा अपयश आले, तरी चौथ्या वेळेला यश येतेच. म्हणून आपल्या जीवनाचे ध्येय आपण ठरवून जर आयुष्यामध्ये कार्य करत राहिलो तर आपल्याला नक्कीच ईश्वरी सत्तेचे अनुभव येऊ लागतील.
परंतु हे सर्व सर्वांना कळतेच असे नाही. कारण प्रत्येकाची बुद्धी ही देवाने वेगवेगळी दिलेली असते. म्हणून जगामध्ये द्वैत आणि अद्वैत असे दोन भाव निर्माण झाले. माणसांमध्ये अहंकार हा खोलवर रुजलेला असल्यामुळे तो स्वतःला देवा पेक्षा वेगळे मानतो. त्याच्यामध्ये गुण वृद्धी होताच त्याला मी स्वतः देवच आहे असे वाटायला लागते. मी आणि देव हे वेगवेगळे आहोत असे जे म्हणतात त्यांच्या मनात द्वैतभाव असतो.
ईश्वर प्राप्ती चा जेव्हा विचार केला जातो तेव्हा तुम्ही आत्म्याशी आणि आत्मा परमात्म्याशी संयोग साधतो. तेव्हा एक प्रकारचा अद्वैत भाव निर्माण होतो व त्या माणसाला सगळ्या वस्तूंमध्ये, सजीव माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये देव दिसू लागतो. तुझे माझे असे काहीच उरत नाही. त्याला अद्वैत भाव असे म्हणतात. उदाहरणार्थ, संत एकनाथ महाराजांनी नदीवरून आंघोळ करून येत असताना एका तहानलेल्या गाढवाला पाणी पाजले. कारण त्यांना त्या तहानलेल्या गाढवा मध्ये विठ्ठल दिसला. याचा अर्थ एकनाथ महाराजांचा मनात अद्वैत भाव निर्माण झाला होता.
सर्व संतांनी हेच सांगितले आहे की ईश्वर बाहेर नसून आपल्या अंतर्मनात वास करत असतो. म्हणून अंतरी असलेला "श्रीराम" बघा असं सर्व संत आपल्याला सांगतात. आपल्यामध्ये जर देव आहे असं मानलं तर षड्रिपू हे आपोआप हळूहळू शांत होतात. काम क्रोध लोभ मद मत्सर आणि दंभ हे सहाही रीपु हळूहळू शांत होतात. कारण आपण आपल्या मध्ये अत्यंत मंगल आणि पवित्र शक्ती वास करीत आहे अशी कल्पना करतो. आणि अशाप्रकारे सर्व वासना या आपल्यामध्ये क्षय पावतात आणि आपलं मन आणि शरीर हे शुद्ध होऊ लागतं. शेवटी परमात्म्याशी तादात्म्य पावतो. यालाच कदाचित ईश्वरप्राप्ती असं म्हणत असावेत. ज्ञानेश्वरांपासून ते अगदी सर्व संतमंडळी पर्यंत ही ईश्वरप्राप्ती त्यांना अशाच प्रकारे झाली असावी असं मला वाटतं.
संगीत हा देखील ईश्वरप्राप्तीचा एक मार्ग आहे. संगीतात एक अद्भुत शक्ती आहे. गोड, कर्णमधुर असे १२ नाद म्हणजे स्वर. यात सात शुद्ध, चार कोमल आणि एक तीव्र असे भेद आहेत. या १२ स्वरांमधून विवक्षित स्वर निवडून त्यांना विशिष्ठ नियमांनी बांधतात तेव्हा "राग" तयार होतो. असे सर्वसाधारणपणे ४०० राग आहेत. पण त्यातील प्रचलित साधारण १०० आहेत. या रागांवर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून,वेगवेगळ्या प्रतिभावंतांनी, शेकडो वर्षे, रियाजाच्या माध्यमातून संशोधन केले आहे. त्यात "संगीतोपाचर" ही दृष्टिकोन होताच.
संगीत मनको पंख लगाये,सुरोंकी रिमझिम रस बरसाये, स्वरकी साधना है ईश्वरकी ||
असे एका हिन्दी गाण्यात म्हटलेच आहे.
संगीत म्हणजेच बारा स्वर आणि त्यांना प्रवाहित करणारी लय आणि त्या लयी वर बेतलेले वेगवेगळे ताल. संगीतामध्ये स्वर हे प्रधान असतात आणि त्यांना प्रवाहित करण्यासाठी लय आणि ताल हे निश्चित केले जातात. हे स्वर निर्गुण निराकार, मंगल आणि पवित्र असल्यामुळे ते आपल्या मनात तसाच पवित्र भाव निर्माण करतात. संगीत ऐकल्याने मन शांतीचा अनुभव करू लागते. संगीतामुळे मन सर्व प्रकारची द्वेषभावना विसरून जाते. संगीतामुळे वासना हळूहळू शांत होऊ लागतात. एका वेगळ्याच समाधीमध्ये मन रंगून जाते. परंतु यासाठी संगीत ऐकण्याची सवय आपणास बालपणापासून असावी लागते. त्यासाठी आपल्या कुटुंबा मध्ये सुद्धा संगीत ऐकण्याची, शिकण्याची सवय असावी लागते. बालपणी आपल्या मनावर आपले आई, वडील, काका, काकू,मामा मामी असे अनेक नातेवाईक सुसंस्कार करत असतात. असे संस्कार अमृतासमान असतात. त्यातून जर आपले राग संगीत मुलांना नियमितपणे ऐकविले गेले,शिकविले गेले, तर संगीत मुलांच्या मनावर चांगले संस्कार करेल व मन शांत करेल. हे संगीत बुद्धीची कुशाग्रता ही वाढवते. दया-क्षमा-शांतीचे रोपण पण मनामध्ये करते. स्वर हे साक्षात्कारी असतात. स्वरसंवाद ऐकणे व त्यातील संजीवक ऊर्जा अनुभवणे हा एक रोमांचकारी अनुभव असतो. संगीत ऐकणे हे नेहमी माणसाला लाभदायकच ठरत असते.
नाद हा दोन प्रकारचा असतो. एक "आहत नाद". जो दोन वस्तूंच्या एकमेकांवरील आघाताने, हवेत लहरी निर्माण झाल्यामुळे आपल्या कानांना ऐकू येतो. दुसरा अनाहत नाद. आपल्या शरीरातील विविध अशा क्रियांमधून निर्माण होतो. उदाहरणार्थ, रक्त वाहणे, हृदयाचे ठोके, जुन्या पेशींचा नाश होणे व नव्या पेशी जन्माला येणे, पाच प्राणांचे शरीरातून वहन, या सगळ्यातून एक प्रकारचा नाद निर्माण होत असतो. परंतु तो आपल्या कानाला ऐकू येत नाही. तो नाद नक्कीच आपल्या शरीरामध्ये होत असतो. त्या नादाला "अनाहत नाद" असं म्हणतात. सर्व सृष्टीमध्ये नाद हा कणाकणा मध्ये भरलेला आहे. नाद हा सर्व सृष्टी व्यापून उरलेला आहे. पृथ्वीवरचे सर्व आवाज थांबले, तर आपल्याला ओमकार ऐकू येईल असे काही शास्त्रज्ञ म्हणतात. ओमकारा चा नाद आपल्या शरीरामध्ये जागृत ठेवला तर आपले शरीर आणि मन शुद्ध होण्यास मदत होते आणि आपण अध्यात्मिक वाटेवरुन मार्गक्रमण करू लागतो. शेवटी ईश्वरप्राप्तीचे ध्येय गाठू शकतो. संगीताबरोबरच स्तोत्र, मंत्र यांचे पठण आपण केले पाहिजे. तो सुद्धा एक प्रकारे ईश्वरप्राप्तीचा मार्ग असू शकतो. शब्दब्रह्म आणि नादब्रह्म जेव्हा एकत्र होतात, त्यावेळेला मंगल आणि पवित्र अशी एक शक्तिमान ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा आपल्या शरीरातील अनेक अमंगल अपवित्र असे जे काही असते त्याचा नाश करते. आपण मंगल ,पवित्र वाटेवरून वाटचाल करू लागतो. आत्म्याचा आपण परमात्म्याशी संवाद साधू लागतो. हीच ईश्वरप्राप्तीची पहिली पायरी असते. आत्म्याचा संवाद जेव्हा परमात्म्याशी होऊ लागतो त्या वेळेला आत्मा परमात्मा हे एक होऊन आपल्याला ईश्वरप्राप्तीचा एक विलक्षण अनुभव घेता येतो.
लेखक -
किरण फाटक