भरत नाट्यशास्त्रातील तालाध्याय
विस्तृत अध्ययन
भारतीय संगीतातील अन्य घटकांप्रमाणेच 'भारतीय ताल' या संकल्पनेचा शास्त्रोक्त अर्थ लावण्यासाठी भरतमुनींचा 'नाट्यशास्त्र' हाच ग्रंथ अत्यंत उपयुक्त असा आहे, की जो पहिला व अत्यंत प्राचीन आहे. नाट्यशास्त्राच्या ३१ व्या 'तालविधानाध्याय' नावाच्या अध्यायात तालाचे सूक्ष्म निरुपण पहायला मिळते. या अध्यायामध्ये तालाची खालीलप्रमाणे व्याख्या पहावयास मिळते.
तालो घन इति प्रोक्तः कला पात-लयान्वितः । कलास्तस्य प्रमाणं वै विज्ञेयं तालयोक्तृभिः ।।
याचाच मराठीत अर्थ पुढीलप्रमाणे सांगता येईल.
'काल, पात आणि लय यांनी युक्त कालाचा विभाग (ठराविक कालखंड) किंवा परिमाणात्मक प्रमाण (परिमाण म्हणून काम करणारा निश्चित काळ) की जो घनवाद्यांच्या वर्गात येतो त्याला 'ताल' म्हणतात. गायन-वादनावेळी ज्यावेळी तालव्यवहार म्हणजे कालगणती सुरू असते तेव्हा त्या वेळेच्या परिमाणाला 'कला' असे म्हणतात. त्यावेळी याचा अर्थही 'ताल का प्रमाण निदर्शक काल' असा असतो. साधारणपणे व्यवहारातील काष्ठा, निमेष किंवा क्षण यांना तालासंदर्भात कला मानले गेलेले नाही. याचे प्रमाण ५ (पाच) निमेष म्हणजे १ मात्रा असे संगितले आहे. (हाच नाट्यशास्त्रानुसार 'मात्रा' या शब्दाचा अर्थ आहे, जो प्रचलित तालव्यवहारातील मात्रेच्या अथर्थापेक्षा भिन्न आहे.) आता 'काल' या शब्दाचा अर्थ पाहू. पाच निमेषांच्या साहाय्याने बनलेली एक मात्रा अथवा अनेक मात्रांच्या प्रयोगाने बनलेला निश्चित कालखंड अथवा गानसमय हा 'काल' म्हणून गणला अथवा ओळखला जातो. काल आणि मात्रांच्या वेळेनुसार लयीची निर्मिती होत असते. मात्रेची तीन स्वरूपे अथवा प्रकार 'नाट्यशास्त्र' या ग्रंथात वर्णिलेले आहेत. ते खालीलप्रमाणे
१) लघु २) गुरु ३) प्लुत
ही तीनही अक्षरांच्या मात्राकालाची नावे आहेत. यावरून हे लक्षात येते की तालांची उत्पत्ती वृत्तांच्या गुरू-लघु आदी अक्षरनियमांच्या म्हणजेच छंदाच्या आधारे झाली आहे. या तीनही मात्रास्वरूपांची कालप्रमाणे पुढीलप्रमाणे आहेत.
लघु - एक मात्रिक काल (कला)
गुरू - द्वि मात्रिक काल (कला)
प्लुत - त्रिमात्रिक काल (कला)
'कला' या घटकाला / संज्ञेला आधार मानून भरतमुनींनी खालील पाच तालांची निर्मिती केली. (याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संख्या व स्वरूप नेहमीच अपरिवर्तनीय राहिले. म्हणजेच त्यांच्या संख्येत आजही कोणतीही वाढ झालेली नाही व त्यांचे स्वरूपही बदललेले नाही.)
१) चच्यत्पुट २) चाचपुट
३) षपितापुत्रक (पंचपाणी)
४) उद्घट् ५) सम्पक्वेष्टाक
वरील तालांमध्ये प्रमुख ताल दोनच आहेत व ते म्हणजे चच्यत्पुट व चाचपुट. यातील चच्यत्पुट म्हणजे चतुरश्र व चाचपुट म्हणजे त्र्यश्र जातीच्या तालांना प्रातिनिधिक ताल म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याविषयी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'अश्र' म्हणजे 'कोन' अथवा बाजू होय. म्हणून ज्याला चार कोन अथवा बाजू असतात तो 'चतुरश्र' व ज्याला तीन कोन अथवा बाजू असतात तो 'त्र्यश्र' असा याचा अर्थ आहे. चार संख्या सम व तीन संख्या विषम संख्या दर्शवितात.
पूर्वीच्या ग्रंथांमधून असा उल्लेख आढळतो की संगीत दोन प्रकारचे आहे. ते म्हणजे
१) मार्गी संगीत व २) देशी संगीत
मार्गी संगीत म्हणजे ब्रह्मादी देवतांनी शोधलेले, भरतादी मुनींनी शंकरासमोर सादर केलेले संगीत होय. प्रथेप्रमाणे हे संगीत कल्याणकारी असे होते. यावरून तालांचेही दोन प्रकार निर्माण झाले. ते म्हणजे मार्गी ताल व देशी ताल होय.याचा अर्थ असा की, मार्गी संगीत सादर करताना वापरात आलेल्या तालांना 'मार्गी ताल' व देशी संगीतासाठी वापरल्या जाणाऱ्या तालांना 'देशी ताल' असे संबोधले जाऊ लागले.
भरतमुनींच्या 'नाट्यशास्त्र' या ग्रंथानुसार पाच मार्गी ताल व त्यांचे भेद पुढीलप्रमाणे.
१) चच्चतपुट - याची निर्मिती गुरू आणि लघु अक्षरांनी झाली आहे. यामध्ये चार अक्षर असल्याने याला श्रेष्ठ गणले गेले आहे. प्रारंभीचे दोन वर्ण गुरू, एक लघु व अंतिम वर्ण प्लुत याचे स्वरूप असून याच्या मात्रा ८ होतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरतमुनींनी तालाच्या भागांना (सशब्द वा निःशब्द) क्रियेद्वारे प्रदर्शित करण्यासाठी प्रत्येक भागासाठी निश्चित केलेल्या क्रियेचे प्रथम अक्षर लिहिले.
२) चाचपुट : याही तालाची निर्मिती गुरु व लघु अक्षरांनी झालेली आहे. याला त्र्यश्र ताल' असेही म्हणतात. एक गुरु- दोन लघु एक गुरू अशा संयोगाने याची निर्मिती झाल्यामुळे याच्या मात्रा ६ आहेत.
३) षट्पितापुत्रक : हा ताल षट्, पिता आणि पुत्रक या तीन शब्दांनी बनलेला आहे. 'षट्' चा ६ असा अर्थ आहे. पण 'पिता' व 'पुत्रक' या शब्दांचे अर्थ स्पष्ट होत नाहीत. कदाचित असे असेल की, जसे पित्याचे स्वरूप पुत्रामध्ये दिसते त्याचप्रमाणे या तालाच्या प्रथम विभागाचे प्रतिबिंब दुसऱ्या विभागात दिसून येते. यामुळेच त्याला असे नाव पडले असावे. यामध्ये ६ अक्षरे, ६ क्रिया व ६ गुरु असून विभागही ६ आहेत. या तालाला 'पंचपाणी' असेही म्हणतात. हा ताल 'त्र्यश्र' मध्ये मोडणारा असून यांच्या मात्रा १२ आहेत.
४) उद्घट्ट : उत्+घट्ट = उद्घट्ट. याचा अर्थ घासलेला किंवा रगडलेला असा होय. नावावरून अर्थ शोधायला गेल्यास अशी कल्पना करता येते की सर्व अंग गुरू व क्रियांची संख्या कमी असल्याने परस्पर संघर्ष झाला असेल यामुळेच याचे असे नाव पडले असेल असे डॉ. रामशंकर पागलदास यांच्या 'तबला कौमुदी' ग्रंथात वर्णिले आहे. हा ताल त्र्यश्र आहे. याचा उपयोग पूर्ण गीतकाला न होता केवळ उल्लोप्यक व ओवेणकच्या छोट्याशा खंडातच होतो. याच्या मात्रा ६ आहेत.
५) सम्पक्वेष्टाक : याची उत्पत्ती षपितापुत्रकापासून झाल्याचे मानण्यात आलेले आहे 'सम्पक्व' व 'इष्टिका' यांच्या संधीने हा शब्द बनला आहे. 'इष्टिका 'ऐवजी 'इष्टाक' असा शब्द वापरला गेला आहे. 'सम्पक्व'चा अर्थ पूर्ण व्यवस्थित शिजलेली व 'इष्टिका' म्हणजे 'वीट' होय. म्हणून 'सम्पक्वेष्टाक' या पूर्ण शब्दाचा अर्थ 'चांगल्याप्रकारे शिजलेली म्हणजेच पक्की भाजलेली वीट'. याच्या १२ मात्रा आहेत.
भरतमुनीलिखित नाट्यशास्त्र'मधील 'ताल' या संकल्पनेची आणखी काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-
१) मार्गी संगीतामध्ये पाच निश्चित ताल आहेत.
२) तालांना मात्रासंख्येद्वारे न दर्शविता तालाच्या खंडांना लघु, गुरू, प्लुत या चिन्हांनी स्पष्ट केले आहे. उदा. चाचपुट ताल ऽ॥ऽ (६ मात्रा)
३) चिन्हांच्या आधारावरच विभाग दिसतात (असतात). उदा. चाचपुट ऽ॥ऽ - ४ भाग
४) सम/ खाली दाखविण्यासाठी कोणतीही चिन्हे नाहीत. त्याऐवजी भरतमुनींनी तालाच्या भागांना (सशब्द वा निःशब्द) क्रियेच्या आधारे दाखविण्यासाठी प्रत्येक भागावर असलेल्या क्रियेचे प्रथम अक्षर वापरले आहे.
५) भरतमुनीकृत नाट्यशास्त्रा 'मध्ये तालांचे ठेके दाखविलेले नाहीत.
६) 'नाट्यशास्त्रा'मध्ये पाटाक्षरांची संख्या १६ सांगितली आहे की, जी 'पुष्कर' या वाद्यावर वाजविली जात असत. ती अक्षरे क, ख, ग, घ, ट, ठ, ड, त, थ, द, ध, म, र, ल, ह अशी आहेत.
७) पुष्कर, पणव, दर्दुर व मृदंगावर क, ट, र, त, ठ, द, ध ही अक्षरे उजव्या बाजूला व ग, ह, ध डाव्या बाजूला वाजवीत असत. उर्ध्वक मृदंगामध्ये 'थ' व आलिंग्य मृदंगामध्ये क, र, ण, घ, व आणि ल ही अक्षरे काढली जात असत.
८) अ, आ, इ, ई इ. सर्व स्वरांना व्यंजनांबरोबर जोडून व्यंजन-स्वर संयोग दाखविलेला आहे.
९) ध्रुवा, छंद यांच्यामध्येच म्हणजे यांच्या अंतर्गतच वादन केले जात असे. निश्चित बोल वाजविण्याचे बंधन नव्हते. पण मात्रिक व वार्णिक छंदानुसार वादनाचे बंधन होते.
१०) समपाणि, अर्धपाणि, अर्धार्धपाणि, पाश्रर्वपाणि आणि प्रदेशिनी या 'पंचपाणि प्रहत'च्या अंतर्गत वादनशैली निश्चित केली गेली.