संगीतातील संशोधन
व्याख्या
विषयनिवड, समस्या व प्रश्न हा मंत्र आणि वैज्ञानिक निष्कर्षाप्रत मांडणी हे संशोधन पध्दतीचे तंत्र होय. गरज ही संशोधनाची जननी आहे.
'संगीतातील संशोधन पध्दती' या विषयाच्या संदर्भात 'संशोधन' म्हणजे नेमके काय? याचा प्रथमतः शोध-बोध घेण्याचा प्रयत्न करू. नंतर अभ्यासांतर्गत उत्पन्न होणारी प्रश्नचिन्हे, त्यातून एखाद्या विषयाला फुटणारी वाट, मग संशोधनाच्या दिशेने वाटचाल करीत असताना जमा करावयाची साधन-सामुग्री, तिचे वर्गीकरण व तथ्यातथ्यता यांची तपासणी, या सर्वांसाठी विषयानुकूल वापरण्याची संशोधन-पध्दती व तिची निवड आणि नंतर विषयाची आकर्षक व क्रमवार मांडणी व त्या 'संशोधनाचे शीर्षक' या सर्वांचा क्रमाक्रमाने विचार करू. 'संशोधन' म्हणजे एखाद्या क्रियेच्या / प्रक्रियेच्या, घटनेच्या किंवा वस्तूच्या प्रकटीकरणाचा वा बाह्यदर्शनाचा मागोवा घेणे होय. दुसऱ्या शब्दात संशोधन म्हणजे कोणत्याही क्षेत्रात उद्भवणाऱ्या एखाद्या प्रश्नाचा वा समस्येचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करुन, गरज असेल तर प्रयोग करुन, काळजीपूर्वक अचूक असा केलेला 'तपास' म्हणजे संशोधन होय. हे संशोधन (वा तपास) जेव्हा शीर्षकासह वैज्ञानिक मांडणी करुन आकर्षक पध्दतीने, क्रमवार सादर केले जाते, तेव्हा तो 'शोधप्रबंध' होतो. म्हणजेच प्रश्नाचे वा समस्येचे शास्त्रीय पध्दतीने तर्कशुध्द निराकरण करण्यासाठी संशोधनाची गरज पडते आणि त्यातून त्याचे उत्तर मिळून निष्कर्षाप्रत येता येते / पोहोचता येते. संशोधन ही एक वृत्ती आहे, असे म्हटले तर गैर होणार नाही. कारण दीर्घ व्यासंग, सूक्ष्म अवलोकन व विश्लेषण, विवेचन आणि प्रयोगात्मक अनुभव यातूनच संशोधनाच्या वाटा धुंडाळता येऊ शकतात आणि त्याचे अंतिम उद्दिष्ट हे त्या-त्या विषयातील उपलब्ध असलेल्या (होणाऱ्या) क्रिया / प्रक्रियांमध्ये सुसूत्रता निर्माण करुन, त्यातून सुनियोजित शास्त्राची निर्मिती करणे, असे असते. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करीत असताना व त्यानंतर त्यावर मनन चिंतन करीत असताना, आपल्या मनात काही प्रश्नचिन्हे निर्माण होण्याची शक्यता असते. कधी हे प्रश्न तात्विक स्वरुपाचे असू शकतात तर कधी ते प्रायोगिक क्षेत्राशी निगडित असतात. ते निर्माण झाल्यानंतर त्यांना तसेच सोडून देऊन जो पुढे जाऊ पहातो तो 'सामान्य अध्ययक' होय, पण जो निर्माण होणाऱ्या प्रश्नाने / समस्येने वा अडचणीने पछाडला जातो व त्याचे उत्तर शोधून काढण्याच्या दृष्टीने धडपड करण्यास प्रवृत्त होतो आणि त्याचे शास्त्रशुध्द निराकरण होईपर्यंत प्रयत्नांची शिकस्त सोडत नाही, तो खरा 'संशोधक' होय! या अर्थी संशोधन ही शेवटी एक प्रवृत्ती ठरते. ज्याच्या चिंतन-मननातून अशी काही गरजच निर्माण होत नाही, त्याने आपल्या व्यासंगाची दिशा बरोबर आहे की नाही हे तपासणे, हे बरे.शिवाय संशोधन ही कधीच न शमणारी, सदैव असमाधानी वृत्ती आहे व निरोगी साशंकता ही संशोधनाची जननी आहे. कारण कधी-कधी संशोधनातून नवे नवे प्रश्न व समस्या निर्माण होतात व नव्या प्रश्नातून संशोधनाच्या नव्या दिशा स्पष्ट दिसू लागतात / सापडतात अशी ही एक संशोधनाची नावीन्यपूर्ण शृंखला आहे. याच संदर्भात तीन शब्द सांगता येतील, ते असे- Invention / Research / Review. आपल्या लेखाच्या विषयाचा संबंध 'Research' या शब्दाशी आहे. संशोधनाची अशी 'वृत्ती' सुजाण अध्यापकाने अध्ययकांमध्ये निर्माण करावयास हवी. म्हणजे, अभ्यासात विषयांतर्गत कोणते नवे प्रश्न भेडसावतात याकडे अंगुलीनिर्देशन करणे, प्रेरणा देणे व त्याबरोबर दिशा दाखविणे हे काम अध्यापकाने करावे आणि त्यानंतरचा दीर्घ व्यासंग व प्रत्यक्ष कृती यांच्या सहाय्याने समस्येच्या बुडाशी जाणे व त्या समस्येला संपूर्णपणे संशोधनाच्या पातळीवर नेऊन पोहोचविणे, ही जबाबदारी अर्थातच अध्ययकाची! संशोधन वृत्तीला असेही तोंड फुटू शकते- सांगण्याचे प्रयोजन एवढेच! विद्यार्थ्याला 'डोळे' आहेत पण दिसत नाही, 'कान' आहेत पण ऐकू येत नाही, अशी केवळ टीका करुन शिक्षकाला बाजूला होता येणार नाही. शिकवता-शिकवता उत्पन्न होणाऱ्या समस्यांची जाणीव विद्यार्थ्यांना करुन देऊन त्यांना उत्तर मिळविण्यासाठी प्रवृत्त करणे, हेही आदर्श शिक्षकाचेच लक्षण होय. कदाचित अधिक चिंतनातून विद्यार्थ्याला त्याची उत्तरे मिळत जातील, तो विषय- संदर्भात अधिक डोळस होईल, उत्तरातून नवे प्रश्न निर्माण होतील व नवीन प्रश्नातून संशोधनासाठी वाटा मिळत जातील. या पार्श्वभूमीवर शोधप्रबंध म्हणजे व्यक्तीच्या चिंतन-मननाचे फलित होय, असे मानता येईल. शोधप्रबंध व संशोधनाचा नेमका मंत्र कोणता हे जरी निश्चित सांगता येण्यासारखे नसले, तरी एकदा मंत्राची निश्चिती झाली की त्याचे तंत्र कोणते असू शकते याचाच विचार व प्रयत्न करावयाचा असतो. तर्कशुध्द विचारसरणीची कुवत असेल व दीर्घ व्यासंगात जिज्ञासू वृत्ती जागृत असेल तर संशोधनासाठी विषय सहज हाती लागू शकतो व विषयाचे निश्चितीकरण झाल्यावर, त्याचे तंत्र काय व कोणते याचा विचार आपोआपच सुटतो. विवक्षित/ थेट व नेमका विषय/उपविषय निवडणे व संशोधनामागील ध्येय धोरण तितकेच मजबूत असणे, हीच संशोधनाची प्राथमिक व अत्यावश्यक अशी पूर्वतयारी होय. विषयाचे संदर्भवर्तुळ वा चौकट निश्चित झाल्यानंतर त्याच्या संदर्भात साधनसामुग्री जमविण्यासाठी सिध्द होणे, ही नंतरची गरज आहे. नंतर सैध्दान्तिक विवेचनाची आखणी करणे, पूर्वप्रकाशित साहित्याच्या संदर्भात त्याचा आशय व अन्वयार्थ लावणे, तपासणे व मग क्रमवार तर्कशुध्द सूत्रांतून त्याची आकर्षक मांडणी करणे आणि सुयोग्य शीर्षक देऊन त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करणे, या तदनंतरच्या क्रमाने येणाऱ्या पायऱ्या होत.