वैदिक संगीत
भारतात आर्यांच्या आगमनाने वैदिक युगाचा प्रारंभ मानला जातो. या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तसेच शुद्र या नावाचे वर्ग स्थापित झाले होते. ब्राह्मणच अन्य तीन वर्णांना विद्या तसेच संगीताचे ज्ञान प्रदान करत असत. यामुळे संगीताची मुख्य जबाबदारी ब्राह्मणांच्या हातात होती. अश्वमेध यज्ञामध्ये मनोरंजनाच्या निमित्ताने गाथा गायन तसेच वीणा आदी वाद्यांचे वादन केले गेले. 'शतपथ ब्राह्मण' या ग्रंथात असे नमूद केले आहे की यज्ञांमध्ये नियुक्त गायक, यांच्याबरोबर वादक आणि उत्कृष्ट प्रबंधकही असत. वैदिक संगीताचे साधनुरूप साहित्य ६००० वर्षांपूर्वीपासून प्रचलित असणाऱ्या संगीताच्या बाबतीत साधनरूप (Source material) आजही प्राप्त आहेत किंतु ते त्यापेक्षाही अधिक उपलब्ध असल्याची संभावना आहे. ही साधनसामग्री निम्नप्रकाराने सांगितली गेली आहे. वैदिक युग हे भारताच्या सांस्कृतिक इतिहासात प्राचीनतम युग मानले गेले आहे. भारतीय संगीताची सुरुवात वैदिक युगापासूनच झालेली दिसते. अतिप्राचीन काळामध्ये ४ वेद म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद यांची रचना झाली. म्हणून त्या युगाला वैदिक युग म्हटले जाते. या काळातील संगीताचे विवेचन स्वतंत्ररूपाने आढळत नाही. तरीदेखील वैदिक साहित्यात ठिकठिकाणी मिळणारे संगीताचे उल्लेख या आधारावर तत्कालीन संगीताचे अनुमान सहज लावता येते.
वेदांव्यतिरिक्त ज्या ग्रंथांमधून वैदिक संगीत विषयक माहिती मिळते ते ग्रंथ पुढीलप्रमाणे -
१) नारदीय शिक्षा २) बृहद्देशी ३) सामवेद संहिता ४) ऋक प्रतिसाख्य ५) तैत्तरिय प्रतिसाख्य ६) पाणिनी शिक्षा ७) पाणिनी अष्टाध्याय ८) संगीतमय वेदपाठ.
ऋग्वेदकालीन संगीत
वैदिक साहित्यात ऋग्वेद हा प्राचीनतम ग्रंथ आहे. याच्या रचनेच्या काळात म्हणजेच ऋग्वेदकाळात गीत, वाद्य व नृत्य या तीनही कला प्रचलित होत्या. ऋग्वेदामध्ये गीत या शब्दासाठी गीर, गातु, गाथा, गायत्र, गीती तसेच काही साम शब्दांचा प्रयोग दिसून येतो. या गाथांचे गायन करणाऱ्यांना 'गाथिन' म्हटले जाते. याच्या वेळी सामगानाचे संकेत आढळून येतात. ऋग्वेदकाळात सामाचे आविष्करण करणारे अंगीरस, भारद्वाज तसेच वसिष्ठ यांचा उल्लेख आढळतो. सामाचे गायन विशिष्ठ छंदात केले जाते. यज्ञादि धार्मिक कार्यामध्ये सामगानाच्या उल्लेखाव्यतिरिक्त काही लौकिक प्रसंगीदेखील सामगायनाचा उल्लेख सापडतो. ऋग्वेदामध्ये 'अर्चिनो गयन्ति, गाथिनो गयन्ति आणि सामिनो गयन्ति' ही पदे मिळतात. यातील अर्चिक संगीत हे एका स्वराचे, गाथिक हे दोन स्वरांचे तर सामिक हे तीन स्वरांचे असते. ऋग्वेदकाळात सामगायन तीन स्वरांवर होत होते. हे ३ स्वर अवरोही क्रमांमध्ये होते. त्यांचा क्रम गं रें सां (तिन्ही तार सप्तकातील) असा होता. ऋग्वेदकाळात गायनाबरोबर वाद्यांचाही प्रयोग होत होता. वाद्यांमध्ये वीणा, वाण, तुणव, दुंदुभी, नाडी, वेणू, कर्करी, गर्गर, गोध्म, पिंग, अघाटी इ. वाद्यांचे उल्लेख मिळतात. प्रातःकालीन मंगल वाद्यांच्या स्वरूपात वीणादी वाद्यांचा प्रयोग केला जात असे. ऋग्वेदात गीत, वाद्य याबरोबरच नृत्याचाही उल्लेख मिळतो. 'नृत्यमनो अमृतः' या श्लोकावरून या काळात नृत्यकला असण्याचे प्रमाण मिळते.
यजुर्वेदिय संगीत
यज्ञ व त्यासंबंधीत कार्याचे विस्तृत वर्णन यजुर्वेदात आहे. तसे पाहता संगीताच्या विकासाच्या दृष्टीने यजुर्वेदाचे महत्त्व दिसत नाही. तरीही प्राचीन संगीताची स्थिती समजण्यासाठी यातील उल्लेख महत्त्वपूर्ण आहेत. यजुर्वेदामध्ये सामगायनाचे स्थान अनिवार्य आहे. किंबहुना असेही म्हणता येईल की, सामगानाशिवाय यज्ञाची कल्पनाच शक्य नव्हती. म्हणूनच सामगायकांच्या संख्येमध्ये वाढच होत राहिली. या वेदामध्ये सामगानातील ३ स्वरांना उदात्त, अनुदात्त आणि स्वरित अशी नावे दिली गेली. उदात्त हा स्वर उंच तर अनुदात्त खालचा स्वर होता. स्वरित या स्वराबाबत अनेक मतभेद आहेत. काही ग्रंथात उदात्त व अनुदात्त यांच्यामधील स्वर म्हणजे स्वरित असे म्हटले आहे. तर काही ठिकाणी उदात्तपेक्षा उंच आणि अनुदात्तपेक्षा खालचा स्वर 'स्वरित' असे म्हटले आहे. विभिन्न ग्रंथांमध्ये स्वरित या स्वराबाबत विभिन्न मते आपल्याला दिसून येतात. सामगायनात वैदिक संगीताच्या व्यतिरिक्त गाथा, नादवंशी आदि लौकिक संगीत तत्कालीन समाजात प्रचारात होते. गाथादि गीते ही वीर काव्यासारखी गीते होती. त्यांचे गायन व्यावसायिक, लौकिक प्रसंगात केले जात असे. या वेदामध्ये वीणा, वाण, तुणव, दुंदुभी, भूमी दुंदुभी, शंख तसेच तलब इ. वाद्यांचा उल्लेख मिळतो. अश्वमेध इ. यज्ञांच्या वेळी मनोरंजनासाठी गाथागान तसेच वीणावादनासारखे संगीतप्रकार आयोजित केले जात. नृत्य तसेच नाटक या कलांचेही सादरीकरण होत असे. गीत व नृत्य यांच्या साथीला हाताने (टाळीने) मोजून ताल देणाऱ्या व्यक्तींची योजना केली जात असे.
सामवेदिय संगीत
चारही वेदांमध्ये सांगीतिक दृष्टीने सामवेद हा अतिशय महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. वैदिक संगीतात देवांची आराधना करण्यासाठी ऋग्वेदाच्या ऋचांचे गायन केले जात असे. याच गेय ऋचांचा संग्रह सामवेदामध्ये झालेला आहे. जे मंत्र गायले जात त्यांनाच 'साम' म्हटले जात असे. या ऋचांचा संग्रह बनवल्याने सामवेदाची निर्मिती झाली. साहित्यिक दृष्टीने सामवेदाची रचना स्वतंत्र नाही म्हणजे ऋग्वेदाचे ते गेय रूपांतर होय. परंतु गेय रूपात असल्याने संगीतात या ग्रंथाला अतिशय महत्त्व आहे. यालाच 'साम संहिता' असेदेखील म्हणतात व त्या ऋचांना 'सामयोनीवृषक' असे म्हणतात.