रामायण व महाभारत कालीन संगीत

0

रामायण-व-महाभारत-कालीन-संगीत

रामायण व महाभारत कालीन संगीत


 रामायणकालीन संगीत


              रामायण हे भारताचे प्राचीन सांस्कृतिक महाकाव्य आहे, ज्याची रचना वाल्मिकींद्वारे झाली. प्राचीन कवी वाल्मिकींनी गेय काव्याच्या रूपात रामायणाची निर्मिती केली. रामायण काळात संगीत-कलेबरोबरच संगीत-शास्त्राचाही विकास झाला होता. यासंबंधीचे प्रमाण रामायणात मिळते. गंधर्वाबरोबर अप्सरांचा उल्लेख झाला आहे. गंधर्व हे गान व वीणा वादन करत असत आणि अप्सरा त्यांच्याबरोबर नृत्यप्रदर्शन करीत असत. हा नृत्य आणि नाट्याचा व्यवसाय नट, नर्तक, शैलूष या जाती करीत तसेच त्यांना राजाश्रय प्राप्त होता. अप्सरांच्या गानशिक्षकाच्या रूपात तुंबरुचा उल्लेख सापडतो. रामायणात यज्ञादिसारख्या धार्मिक अनुष्ठान प्रसंगी सामगानाचा उपयोग होत होता. सामगान हे फक्त यज्ञादि, वैदिक, गांधर्व व लौकिक संगीत होते. रामायणाच्या काळात यज्ञानंतर नृत्य तथा संगीताचे कार्यक्रम होत असत. या यज्ञांमध्ये वेद मंत्रांचे उच्चारण होत असे. असे म्हणतात की, श्रीराम स्वतः नृत्य तसेच गायनकलेत निपुण होते. या काळात संगीत हे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात व्यापलेले होते. युद्धप्रसंगी, धार्मिक कार्यात आणि आश्रमात संगीताचे प्रचलन मोठ्या प्रमाणात असे. श्रीरामचंद्रांचा जन्म तसेच लग्न या शुभसमयी देवदुंदुभी वाजवल्याचे तथा नृत्य व गाण्यासंबंधीचा उल्लेख रामायणात मिळतो. विशेष अतिथीचे स्वागत शंख, दुंदुभीच्या घोषात स्तुतीगायनाबरोबर केले जात असे. युद्धात सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी ज्या वाद्यांचा वापर केला जायचा त्यात भेरी, दुंदुभी, मृदंग, पणव, शंख, तूर्य (तूरही) आणि वंश इत्यादी प्रमुख वाद्ये होती. वीणा वाद्यांतर्गत वल्लकी आणि विपंची यांचा विशेष प्रचार होता. वादकांसाठी 'तूर्य' ही संज्ञा वापरली जात असे. रामायणात साम तसेच गंधर्व दोघांच्या संबंधी प्रचलित उत्कर्षाचे प्रमाण उपलब्ध आहे. सामगान केवळ आश्रय रागापर्यंत मर्यादित वैदिक संगीत होते. तसेच गांधर्व वैदिक संगीताव्यतिरिक्त प्रसंगावर किंवा यज्ञपात्रांमध्ये यज्ञविधीच्या बाहेर केले जाणारे लौकिक संगीत होते. रामायणकालीन पाठ्यक्रमात वेद तसेच शिक्षण सहा वेदांगाच्या अंतर्भावात होते. या अंतर्गत सामच्या शिक्षण ग्रंथाचे यथाविधी अध्ययन केले जात होते यात शंका नाही. या परिस्थितीत सामगीतांचे वर्ण तसेच स्वरांचे गानशिक्षण प्रणीत (प्रचलित) नियमांनुकूल केले जात होते. अश्वमेध यज्ञप्रसंगी यज्ञकर्मासाठी एकत्रित-ऋत्विजांमध्ये साध्यसंपन्न करण्यात सामगायकाला तोच सन्मान प्राप्त होत असे. (ऋत्विज म्हणजे पुरोहित) दशरथाच्या अंत्येष्टीच्या प्रसंगी सामगान विद्वानांद्वारे यथाशास्त्र केले गेले. भाद्रपद मासामध्ये सामग विद्वान आपल्या स्वाध्यायास प्रारंभ करत. संगीताचे पुष्कळ प्रमाण रामायणामध्ये उपलब्ध आहेत. संगीताचा प्रभाव केवळ मनुष्यांवरच नाही तर पशुंवरसुद्धा झाला होता. हरिणांना संगीताने प्रभावित करून पाशबद्ध केले जात होते. गांधर्वच्या अंतर्गत मार्गी विधान उच्च आणि अभिजात संगीताचे द्योतक होते. रामायण काळातील संगीतात लव आणि कुश यांची अद्भुत योग्यता होती. अश्वमेध यज्ञप्रसंगी त्यांनी रामायणाचे अलौकिक गायन केले होते. त्याकाळी स्त्रियांनादेखील संगीताची शिक्षा दिली जात असे. रावणाच्या राण्या सर्व वाद्ययंत्र वाजवण्यात व नृत्य तसेच गायनात निपुण होत्या. रावणाची बहीण शूर्पणखा एक प्रसिद्ध संगीतज्ञ होती. या व्यतिरिक्त्त रावण-बली यासारख्या राजांच्या दरबारात विवाह तसेच जन्म यासारख्या प्रसंगांच्या वेळी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जात. श्रीरामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या वेळीही असाच संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. अयोध्येतदेखील सर्व प्रकारच्या कलाकारांचे संगीतज्ञांचे सुसंघटीत संघ होते. यावरून असे स्पष्ट होते की रामायणकाळात संगीतकला ही मनोरंजनाचे प्रमुख साधन होती.


महाभारतकालीन संगीत 


               भारतीय संगीत हे अतिशय प्राचीनतम संगीत आहे. भारतीय संगीताला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. भारतीय संगीताचा विकास हा देवदेवतांच्या काळापासून मानला जातो. वैदिक काळातही भारतीय संगीत खूप विकसित अवस्थेत पोहोचले होते. भारतीय संगीताचा आद्यग्रंथ मानल्या जाणाऱ्या सामवेदाची निर्मिती याच वैदिक काळात झाली. तसेच भारतीय साहित्यातील दोन महान ग्रंथ 'रामायण' व 'महाभारत' यांची निर्मितीसुद्धा याच वैदिक काळात झाली. महाभारतातील संगीताचे पुढीलप्रमाणे वर्णन करता येते. महाभारतातील संगीताचे अनेक उल्लेख मिळतात. या काळात गायन, वादन, नृत्य यांचे एकत्रित, त्याचप्रमाणे स्वतंत्र कार्यक्रम होत असल्याचेही अनेक उल्लेख आढळतात. यासाठी गांधर्व संज्ञा मिळते. 'गांधर्वो नाम नामतः  महाभारतकालीन संगीत हे धार्मिक म्हटले तर वावगे होणार नाही. कारण महाभारतात सामगायन व गाथांचा एकत्रित उल्लेख आढळतो. यावरून महाभारतकालीन संगीत हे धार्मिक संगीत होते असे म्हटले तर वरील मताला पुष्टी मिळेल. महाभारताच्या काळात साम आणि गांधर्व या दोन्ही प्रकारच्या संगीताचे प्रचलन समान स्वरुपात होते. यज्ञादि प्रसंगी सामगान हे वैदिक काळातील आर्यांचे दैनंदिन जीवनातील एक अंग होते. जेथे ऋषीमुनी वास करीत असत तेथे साम व अन्य वेद यांचे पठण होत असे आणि हे वेद पठण करण्याची पद्धतीही संगीतावर आधारित होती. सामवेदापर्यंत भारतीय संगीत हे उदात्त, अनुदात्त, स्वरित या ३ स्वरांपर्यंतच विकसित झाल्याचे पहावयास मिळते. या वेदांचे गायन हे प्रामुख्याने ऋषि-मुनी, पुरोहित तसेच गांधर्व यांच्याकडून होत असे. महाभारतकाळात जे सामगायन होत असे त्यात प्रामुख्याने भारुडे, बृहत, जेष्ठ इ.चा उल्लेख मिळतो. अशाप्रकारे संगीतातील दिव्य कलाकारांच्या रूपात गंधर्व व किन्नरांचा उल्लेख महाभारतात झाला आहे. महाभारताचा काळ हा पूजा, आराधनेचा होता. ब्रह्मा, विष्णू, महेश यांची आराधना नृत्य तसेच गायन यापासून सुरू झाली. राजकुमारी, महाराणी यांना ललितकलांचा शौक होता. स्त्री आणि पुरुष दोघेही कलेचा आनंद घेत असत. या काळात गीत/वादि (वाद्य) तथा नृत्य यांचा वापर जीवनाच्या विभिन्न अंगांच्या रूपात होत होता. महाभारतात वाद्यांतर्गत तत, वितत, घन, सुषिर या चतुर्विध वाद्यांचा उल्लेख मिळतो. तंतुवाद्यांतर्गत वीणेचे अधिकाधिक प्रचलन होते आणि तिचा वापर यज्ञात, वैदिक संगीत आणि लोक-उत्सवात जनसंगीतात होत असे. वीणा तथा वल्लरी या व्यतिरिक्त वेणू, मृदंग, पणव, पटह, मुरजे, भेरी, पुष्कर, तथा शंख इ. वाद्यांचे प्रचलन होते. तसेच मृदंग व चर्मवाद्यांचे प्रयोग होत होते. या व्यतिरिक्त हाताने टाळी देण्याची पद्धतही रूढ होती. महाभारतात अर्जुनाला गांधर्व वैदिक संगीत ४१ विशारद म्हटले आहे. गीत, वाद्य तथा साम यांची शास्त्रबद्ध शिक्षा त्याला प्राप्त होती. अज्ञातवासाच्या काळात अर्जुनाने राजा विराटच्या राजकन्येला नृत्य व गायनाचे शिक्षण दिले. यावरून तो ललितकलेत प्रवीण असल्याचे सिद्ध होते. महाभारताचे नायक श्रीकृष्ण हे एक कुशल नर्तक आणि संगीतज्ञ होते. बासरी वादनामुळे त्यांना मुरलीधर हे नाव पडले. त्यांची बासरीवरची तान संपूर्ण भारतात लोकप्रिय होती. त्याकाळची रासलीला ज्यात श्रीकृष्ण व गोपिका अभिनय करत ती फार लोकप्रिय होती. हरिवंश-पुराणानुसार चित्रलेखा, उर्वशी, हेमा, रंभा, मेनका, केशी व तिलोत्तमा या महाभारत काळातील सुंदर अप्सरा नृत्य गायनात कुशल होत्या. मोठमोठ्या ठिकाणी संगीताचे शिक्षण देण्यासाठी त्याकाळी संगीत शाळांचे प्रयोजन केले जात होते. षड्ज्ञ तथा मध्यम ग्रामाच्या व्यतिरिक्त ग्रामाचे प्रचलन या काळाची विशेषता आहे. वीणेवर या ग्रामांच्या मूर्च्छना स्थापित केल्या जात असत. या काळात कुशल नृत्य-गीत विशारद गंधर्व होते. संगीताचार्य असे. यांच्याद्वारे संगीताचे शिक्षण प्रसारित होत होते. अर्जुनाने याच गंधर्व संगीताचार्यापासून शिक्षा घेतली होती. विश्वावसु, चित्रसेन इ. गंधर्वांचे संगीत विशारदाच्या रूपामध्ये अनेक स्थळांवर उल्लेख मिळतो. उदा. अर्जुनाचे गुरुशिष्य संबंध. महाभारत काळात संगीताचा सगळ्या वर्गात प्रचार झाला होता. गायनासंबंधी काही शास्त्रीय शब्दांचेही संकेत महाभारतात आढळतात. जसेः प्रमाण, लय, स्थान, मूर्च्छना, तान, आलाप, ताल, सप्तस्वरांची नावे इ. महाभारताच्या काळातील सर्वात महत्त्वपूर्ण रचना म्हणजे श्रीकृष्णाची भगवद्‌गीता ही होय. हे या विश्वातील एक अतिशय अत्युच्च काव्य आहे ज्यात काव्य, ज्ञान, योग, भक्ती तसेच कर्मयोग यांचा संगम दिसून येतो. महाभारत काळात संगीताचा उत्कर्ष झालेला दिसून येतो.


संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookJoin NowFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top