पुराणकाळातील संगीत
वैदिक काळातील पवित्रता पुराणकाळातील संगीतात राहिली नव्हती. तरीही रोजच्या जनजीवनात संगीताला एक महत्त्वाचे स्थान होते. या काळात वीणा या वाद्याव्यतिरिक्त कोणतेही नवीन वाद्य अस्तित्वात आले नाही. या काळातील माणूस कठीण संघर्षाला तोंड देऊन आपला उदरनिर्वाह करण्यात व्यग्र होता. या काळात कंठसंगीत व नृत्य या कलांचा उत्कर्ष झाला होता. नाटकाची प्रथाही याच काळात सुरू झाली. परंतु या नाटकात संगीताला अधिक महत्त्व दिले गेले होते. निरनिराळ्या ठिकाणी काही विशेष कारणांनी या नाटकांचे प्रयोग होत असत व त्यातूनच नाटकातील मंडळी ही नाटक व संगीताचा प्रचार करत फिरत. पुरुषांबरोबर स्त्रियांचाही त्यात सहभाग असे. समाजात नाट्यसंस्थेला एक चांगली प्रतिष्ठा निर्माण झाली होती. एक विशेष म्हणजे त्या काळी संगीताचे विधिवत शिक्षण घेतले जात असे व त्यामुळे संगीतज्ञ हे सुजाण, सुशिक्षित व ज्ञानी होते. वैदिक काळाप्रमाणेच या काळातही विद्यार्थ्यांना संगीताचे धडे घेणे आवश्यक व क्रमप्राप्त मानले जात असे. गृहस्थजीवनातही संगीताला महत्त्वाचे स्थान दिले गेले होते. या काळात लोकगीते व लोकनृत्यांचाही प्रचार वाढत होता. संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी लहान लहान गट तयार केले गेले होते. परंतु या गटांमधील लोकांच्या संकुचित वृत्तीमुळे संगीताच्या विकासात अडथळा निर्माण होत होता. यामुळे सर्वसामान्य जनता संगीतापासून वंचित राहू लागली होती. याचे आणखी एक कारण म्हणजे संगीत हे केवळ मनोरंजनासाठी वापरले जाऊ लागले. संगीतातील पावित्र्य, सौंदर्य व आत्मिक आत्मसंतोष या गोष्टींचा हास होऊ लागला होता.
वैयक्तिक पातळीपेक्षा सार्वजनिक स्तरावरच संगीताचे प्रचलन अधिक होत होते. वीणा वाद्याचे प्रचलन या काळात अधिक होते. पौराणिक काळात यज्ञ, होम, हवनापेक्षा रोजच्या जीवनातील संगीत हे एक अविभाज्य अंग बनले होते. संगीत हे केवळ मोक्षप्राप्तीसाठी नव्हे तर मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी असलेले एक माध्यम मानले जाऊ लागले. या काळातील तैत्तरीय उपनिषद, ऐतरेय उपनिषद, शतपथ ब्राह्मण इत्यादी ग्रंथात संगीताचा अभाव जाणवतो. याज्ञवल्क्य वर्ण रत्न-प्रदीपिका, प्रतिभाष्प प्रदीप व नारदीय प्रभृती ग्रंथातून संगीताचा परिचय होतो. मार्कंडेय पुराण, वायु पुराण, विष्णु पुराण इत्यादी पुराणात देखील संगीताचे विस्तृत विश्लेषण उपलब्ध झाले आहे. या पुराणात ग्रामराग, रागिणी, तीन सप्तक (मंद्र, मध्य, तार), मूर्छना, नृत्य, नाट्य, वाद्य इत्यादींचे वर्णन दिसून येते. सामगानासाठी या काळात खूप आदराचे स्थान होते. सामगान हे केवळ यज्ञयागादि प्रसंगीच नव्हे तर त्याकाळच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य अंग होते. या काळातील पहिला जाणवणारा विशेष म्हणजे मनुष्यप्राणी सगुण/साकार देवदेवतांचा उपासक झाला. देवदेवतांची निवासस्थाने ही कल्पना आली व त्यातूनच देऊळ, मंदिरे यांची निर्मिती झाली. आजही दक्षिणेकडच्या देवळांची पाहणी केली तर आपल्याला सहज लक्षात येते की मंदिर वा देऊळ हे समाजजीवनाचे केंद्रवर्ती स्थान होते आणि अर्थात त्याच ठिकाणी सर्व कलाही आश्रयाला आल्या होत्या. एखाद्या देवालयाच्या बांधणीत जसा वास्तुकारांचा संबंध होता तसाच देवालयामध्ये शिल्पाकृती कोरणारा शिल्पकार होता, छतांवर, भिंतींवर चित्रे रंगवणारा चित्रकार होता आणि मुख्य म्हणजे उत्सवप्रसंगी देवालयाच्या नटमंडपात नृत्यविलास, नाटके, प्रवचने, गायन, वादन आदि सर्व कला रुजू होत होत्या. भरतानेदेखील आपल्या ग्रंथात नाट्याच्या आधारे संगीत, नृत्य व वादन यांची एकत्र चर्चा केलेली दिसून येते. देवदेवतांनी वरीलप्रमाणे आकार घेतल्यानंतर सर्वच कलांनादेखील आकार आले. संगीताचे स्वर वाढले, लयीची मोजमापे वाढली. तथापि सामाजिक घटनांवर भक्तिसंप्रदायाचा प्रभाव असल्यामुळे संगीतकला अजूनही देवदेवतांच्या गुणगानात रमलेली होती. आज संगीताचे जे कलात्मक स्वरूप आपल्याला दिसते ते त्यावेळी नव्हते. मंदिरापुरते तरी संगीतकलेचे स्वरूप धार्मिकच होते. धर्म म्हणजे प्रजेला धारण करण्याची शक्ती व संगीत प्रजाजनांचे मानसिक उन्नयन व उदात्तीकरण करीत होते. धर्म एक आंतरिक प्रवृत्ती आहे व जनमानसात ती संगीताच्याआधारावर प्रवाहित होत होती. पुराणकाळात राजे व त्यांचे दरबार अस्तित्वात आले. राजा विष्णूचा अवतार मानला जाऊ लागला. त्यामुळे इश्वरस्तुतीबरोबरच संगीताची अभिव्यक्ती राजस्तुतीसाठीही होऊ लागली. देवळात संगीताचे स्वरूप धार्मिक तर दरबारात लौकिक असल्याचे आढळून येते. 'पुराण' या शब्दाचा अर्थ आहे प्राचीन, पुराण हा शब्द वेद, ब्राह्मण, उपनिषद, रामायण, महाभारत या सर्वांत आढळतो. पुराणाची ५ लक्षणे आहेत. १) सर्ग म्हणजे सृष्टी. २) प्रतिसर्ग - वर्तमान सृष्टीचा विनाश आणि नवीन सृष्टीचा विकास. ३) वंश देवता व ऋषींचा वंश परिचय. ४) वंशानुचरित राजांचा जन्मवृत्तांत. ५) मन्वंतर मनू (आदिमानव) या विषयी विस्तारित माहिती. (मनुचे पुत्र - मानव- ज्यातून मानव वंश निर्माण झाला असे पुराणाचे मत आहे.) भारतात एकूण १८ पुराणे आहेत. तसेच ग्रीस, इजिप्त इ. देशातही पुराणे अस्तित्वात आहेत.