भावसंगीत

0

भावसंगीत

 भावसंगीत


                आधुनिक युगात शास्त्रीय संगीताबरोबरच भावसंगीताचाही प्रचार झाला आहे. सर्वसाधारण श्रोत्यांना आकर्षित करणारा हा प्रकार असल्याने भावसंगीताचे क्षेत्र शास्त्रीय संगीतापेक्षाही अधिक व्यापक झाले आहे. याचे कारण मुख्य म्हणजे ह्या संगीतात जी वैशिष्ट्ये आहेत ती सर्वसामान्य लोकांना सहजसुलभ व आकर्षित करण्याजोगी आहेत. ती वैशिष्ट्ये अशी 


सरलता व रसाळता 

                  सरल गीतरचना, स्वरमधुर चाल अथवा धुन व अर्थप्रधान ह्या तिन्हींचा समन्वय म्हणजे भावसंगीत होय.


भावसंगीताचा उगम


                        ज्याप्रमाणे प्रथम भाषा व नंतर शास्त्र त्याचप्रमाणे संगीतातही प्रथम स्वर नंतर शास्त्र जन्मले. भाषेच्या माध्यमातून भाव व्यक्त करण्याची प्रक्रिया निर्माण झाली. गद्याप्रमाणे पद्यातही भाव व्यक्त करता येतात. काव्याला स्वरांची जोड दिली गेली तेव्हा ती भावाभिव्यक्ती अधिक रंजक व प्रभावी ठरली. लोकसंगीत व भक्तिसंगीत यांची निर्मितीसुद्धा याच प्रक्रियेतून झाली आहे. किंबहुना सुगम संगीत ही ह्या संगीताची पुढची पायरी आहे. परमेश्वरी उपासनेसाठी भक्तिसंगीताची व निसर्गसुलभ भावाभिव्यक्तीसाठी लोकसंगीताची तसेच मानवी मनातील नैसर्गिक, तरल व सूक्ष्म भावनांची अभिव्यक्ती भावगीतातून झाली.सुगम संगीतात राष्ट्रभक्तिपर गीते, वीररसोत्पादक स्फूर्तिगीते समरगीत,  लग्नसमारंभादी काळासाठी मंगल गीते, तसेच अंगाई गीते, ओव्या श्रमपरिहारार्थ अशी बऱ्याच उद्देशांनी अनेक प्रकारांनी भावाविष्कार करणारी गीते सुगम संगीतात समाविष्ट होतात. भक्तिसंगीत व भावसंगीत हेही संगीत ह्यातलेच होय. भूपाळ्या, ओव्या ह्या अशाच होत. भावसंगीतालाच भावगीत असेही म्हणता येईल. महाराष्ट्रात भावगीताचे मूळ फार पूर्वीच्या काळात असले तरी पहिले मराठी भावगीत प्रचारात आणण्याचे कार्य व श्रेय श्री. जी. एन्. जोशी ह्यांचेच आहे. नंतर श्री. गजानन वाटवे ह्यांनी मराठी भावगीताला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आज आपल्याला भावगीताचे अत्यंत विकसित स्वरूप पहायला मिळते. खूप सखोल अभ्यास न करताही गायकाला भावगीतगायनात प्रावीण्य व नावलौकिक मिळवता येतो. मात्र आवाजाची अनुकूलता, गीतप्रस्तुतीची आकर्षक लकब, स्पष्ट व भावानुसार योग्य उच्चार, स्वरतालाचे आवश्यक ज्ञान व ह्यामुळे गीतातील भावाविष्कारात समरसता निर्माण करण्याची कुवत ह्या बाबतीत सुगम संगीत किंवा भावगीतगायकाने दक्ष असायला हवे. सुगम अथवा ललित संगीतात बसणारे असे कितीतरी प्रकार आहेत, ज्यांना विशिष्ट रागाचे किंवा विशिष्ट गायकीचे बंधन नसते. शब्दांना महत्त्व जास्त, भावोत्कटता जास्त महत्त्वाची. त्याला स्वर व लयीची जोड असते. भावगीते, चित्रपटगीते व प्रादेशिक लोकगीते ही सुगम संगीत ह्या सदरात बसतात. आत्तापर्यंत सुगम संगीत इतके लोकप्रिय नव्हते. पण विसाव्या शतकात सुगम संगीत इतके लोकप्रिय झाले की त्याचे स्वतंत्र शास्त्र बनत आहे.


भावगीत व चित्रपटगीत


                               ज्या गीतात सुराइतकेच भावांना म्हणजे शब्दांना अधिक महत्त्व आहे त्याला भावगीत म्हणायचे. काव्यात फक्त शब्दांना महत्त्व असते त्याबरोबरच वृत्त, छंद, अलंकार ह्यांनाही महत्त्व असते. पण तेच काव्य गेयतेच्या अंगाने असले व त्याला स्वरतालबद्ध केले तर ते भावगीत होते. कवी बी, कुसुमाग्रज, सुधांशु, भा. रा. तांबे, शांता शेळके, सुरेश भट, ग. दि. माडगुळकर, शांताराम नांदगावकर, जगदीश खेबुडकर, सुधीर मोघे अशी कितीतरी कवींची नावे घेता येतील की ज्यांचे काव्य भावोत्कट व गेय असल्याने त्यांना चाली दिल्या गेल्या आहेत. ती गीते चित्रपटात व इतरत्र गायिली गेली, ध्वनिमुद्रित झाली. भावगीत गायकाला संगीताचे ज्ञान असले किंवा तो काही प्राथमिक संगीताचे धडे घेतलेला असला तर त्याला भावगीत तालासुरात गाणे सोपे जाते. परंतु त्याला शास्त्रीय संगीताचे ज्ञान असले तरच तो भावगीत गाऊ शकतो असे नाही. कारण भावगीत गाण्यासाठी त्या गायकाचा आवाज हलका, सुरेल, गोड आणि भावोत्कट असावा लागतो. हीच गोष्ट चित्रपटसंगीताच्या बाबतीतही लागू पडते. परंतु भावगीताचे ताल त्रिताल, झपताल, एकताल, दीपचंदी हे क्वचित तर रूपक, केरवा, दादरा, अध्धा हे ताल प्रामुख्याने असतात. तांत्रिक बाबीथोडयाशा भिन्न आहेत. परंतु शास्त्रीय संगीत येत असल्यास भावगीत, चित्रपटगीते गाणे सुलभ जाते एवढे नक्की. आता ह्याच गीतांचा जमाना आहे, एवढेच नाही तर पॉप व रिमीक्सचाही जमाना येऊ घातला आहे. आतापर्यंत आपण जे गीतप्रकार पाहिले त्यांचे प्राचीन व आधुनिकी गीतप्रकार, उपशास्त्रीय व सुगम गीतप्रकार असे भाग पडले असले तरी त्यातील साचेबंदपणा काही गीतप्रकारात उरलेला नाही. उदा. उपशास्त्रीय गीतप्रकार हे शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायिले जातात व शास्त्रीय ढंगाने त्यात आलापादी अलंकारांनी त्याचा आनंद वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. हेच उपशास्त्रीय गीतप्रकार (टप्पा ठुमरी सोडून) सुगम संगीताच्या मैफिलीत गायिले जातात. सुगम संगीतातील दादरा, कच्ची होरी, भजन, गझल गीते त्यामुळे उपशास्त्रीय प्रकारातही मोडू शकतात. ह्याचा अर्थ कुठलेही गीत अगर काव्य याचे गायन कुठल्या रीतीने केले जाते, कुठल्या अंगाने त्याचा सांगीतिक आविष्कार होतो ह्यावर त्या गीताला कुठल्या प्रकारात घालायचे हे सहज समजू शकते. त्यामुळे आजकाल उपशास्त्रीय व सुगम संगीताच्या सीमारेषा पुसट झाल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. भजनी मंडळात, देवळात म्हटली जाणारी भजने, अभंग सुगम संगीतातील असूनही शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायिली जाणारी भजने, अभंग, गझला ह्यांची गायकीच्या ढंगामुळे उपशास्त्रीय संगीतात गणना होऊ शकते.


संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top