भक्तिसंगीत
भावगीत हा शास्त्रीय संगीतापेक्षा पूर्णपणे वेगळा असा ललित किंवा सुगम गीतप्रकार असून त्याचे आता वेगळे शास्त्र बनले आहे. कुठलेही गीत भावयुक्त असणे व गाणे ही भावगीताची ओळख आहे. शब्दप्रधानता किंवा काव्यश्रेष्ठता ही महत्त्वाची. हीच गोष्ट भक्तिगीताच्याही बाबतीत आहे. परंतु भक्तिगीताचा विषय केवळ परमेश्वराची भक्ती हाच असावा लागतो. भक्तिगीत हे भजन आणि भावगीत ह्या दोन्ही गीतप्रकारांचा सांधा आहे.
वेदकालापासून भक्तिसंगीताचा उगम आहे. सामसंगीतातील सर्व रचना भक्तिरसप्रधान आहेत. यज्ञयागादी मंगलप्रसंगी भक्तिगीताला फार महत्त्व होते. परमेश्वराची आळवणी, त्याचे स्मरण, त्याचे गुणगान ह्यांनी युक्त पदे असायची. पण त्यांना भक्तिगीत ही संज्ञा नव्हती. पदांची रचना भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली असे. भक्ती हे परमेश्वर प्राप्तीचे महत्त्वाचे साधन. भक्तिगीतातून माधुर्य व सत्त्वभाव उद्दीपित होतात. गीत हे संवेदनशील असल्याने शांती व वैराग्य उत्पन्न होते. ह्या भावांच्या निर्मितीसाठी रागानुकूल छंद छंदानुकूल शब्द व शब्दानुकूल लय असेल तर त्या शब्द-स्वर-लयीच्या आधाराने ईश्वरी नाममंत्राची चेतना जागृत राहते, असा संदेश साधुसंतांनी दिला व ही भक्तिधारा भारताच्या दक्षिणोत्तर अखंड वाहते आहे. स्वामी वल्लभदास, स्वामी चैतन्यप्रभू, संत सूरदास, संत मीराबाई, संत तुलसीदास, संत गोरखनाथ, संत नरसी, स्वामी हरिदास इ. अनेक हिंदी भाषिक संतांनी भक्तिगीते रचली. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास, संत चोखा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई इ. अनेक मराठी भक्तिसंगीत रचणारे संत होऊन गेले. भक्तिमार्गाने मानवाचे कल्याण साधणे हे ध्येय त्यांनी भक्तिगीतांतून साकारले.
इ. स. १४ व्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंत भक्तिसंगीत व भक्ति- साहित्याकरिता महत्त्वाचा कालखंड होता. सर्व संत गायक संसारातील भोगाला त्याज्य मानीत. यज्ञप्रधान संस्कृतीतून भागवत धर्माचा उदय झाला. भक्तिसंगीताने तो समृद्ध झाला. परंतु रामभक्तीची सांगीतिक व साहित्यिक अभिव्यक्ती ११ व्या शतकानंतर झाली. कृष्णभक्तीने तर संपूर्ण भारताला भक्तिरसात बुडवून टाकले. ह्याचे केंद्रस्थान वृन्दावन ! कितीतरी संगीतकारांना व नर्तकांना त्याने भक्तिसंगीताची प्रेरणा दिली. मानवाची सौंदर्याभिरुची रसिकतेला पोषक व समृद्ध करणारी ठरली. ती भक्तिभावाने छंदोबद्ध व स्वरबद्ध भक्तिकाव्ये संगीताच्या कोंदणात चपखल बसून झळाळू लागली. भक्तिरसयुक्त गेय पद राग, स्वर व तालाने विभूषित होऊन तिने अनिर्वचनीय आनंदनिर्मिती झाली. सगुण निर्गुण काही असो परंतु भक्तिसंगीत भक्तिभावाने बहरून आले हा भक्तिसंगीताचाच महिमा होय.