गुरुशिष्य परंपरा
संगीतातील गुरू शिष्य परंपरेचे आकलन
भारतीय शास्त्रीय संगीताला महाराष्ट्रात आणि एकूणच दक्षिणेत गंगेप्रमाणे आणण्यात या 'सात स्वरश्रीं'चा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याबद्दल या पुस्तकात संक्षिप्त पण अतिशय महत्त्वाची अशी माहिती देण्यात आली आहे. आकाशस्थ सप्तर्षीना जसं आपल्या संस्कृतीत महत्त्व आहे तसेच या सात स्वरश्रींना महाराष्ट्रातील संगीतात आणि एकूणच संगीतात स्थान आहे. संतांची, लढवय्यांची आणि विचारवंतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला एकेकाळी संगीताच्या आश्रयाची वानवा होती. सदैव सुरू असणाऱ्या युद्धांमुळे महाराष्ट्रात एकेकाळी कलेला फारसा आश्रय मिळाला नव्हता. निदान भारतीय शास्त्रीय संगीत कलेच्या बाबतीत तरी तसं दिसतं. त्या विरुद्ध उत्तरेत अयोध्या, जयपूर, ग्वाल्हेर, लखनऊ अशी अनेक संस्थाने युद्धे टाळून परकीय सत्तांची चाकरी पत्करून का होईना शांततेत आणि समृद्धीत नांदत होती. ज्यामुळे तिथे कला आणि संगीत यांना वाव देण्यास मदत झाली. तेथील राजा महाराजांचा कलेतील व्यासंग अथवा रसिक वृत्ती याच्यामुळेही उत्तरेत भारतीय संगीत कला फोफावली. पण दक्षिणेत ही गंगा कशी आणणार? शतकानुशतके युद्धांमुळे आलेली गरिबी आणि रोजचा संघर्ष यातून कलेसाठी वेळ आणि पैसा कुठून आणणार? तरीही या विपरीत परिस्थितीत वर उल्लेख केलेल्या सात स्वरश्री पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर, पंडित विष्णु नारायण भातखंडे, पंडित भास्करबुवा बखले, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ साहेब, गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे, संगीतसम्राट अल्लादिया खाँसाहेब या विभूतींनी ही संगीत गंगा आपल्याकडे आणण्याचा भगीरथ प्रयत्न केला. भगीरथ म्हणण्याचं कारण असं की पूर्वीच्या काळी कोणतीही कला सर्वसाधारणपणे स्वतःच्या घराबाहेर आणि घरण्याबाहेर जाऊ द्यायची नाही असा कल बुजुर्ग कलाकारांचा असे. यात दुसरी बाजू अशीही असेल की सत्पात्री दान झाले नाही तर ती विद्या वाया जाते. परिणामतः विद्येचा प्रसार फारसा चांगल्या रीतीने होत नाही. जुन्या काळी कोणत्याही गुरुकडे शिकायचे असल्यास मोठी रकम देऊन गुरूच्या नावाचा गंडा बांधावा लागत असे. या सर्व प्रकारासाठी पैसा मुबलक नाही आणि उस्ताद लोकांशी रक्ताचा संबंध नसल्यामुळे ही गंगा आपल्याकडे आणायला बुजुर्ग लोकांना फार कष्ट पडले. एक तर महत्प्रयासाने ती विद्यार्जन करणे, रियाझ करणे आणि तिचे जतन करून ती पुढच्या पिढीकडे सोपवणे हे यज्ञकार्यच असते. विद्या देताना देणाऱ्याचे तेवढे मोठे मन पाहिजे आणि घेणाऱ्याचं पात्रही तेवढे सशक्त पाहिजे. घेणाऱ्याची बुद्धी ही कोणत्याही इतर संस्कारांनी दूषित झाली नसली पाहिजे हा कटाक्ष एकेकाळी संगीतात विद्या देताना असायचा. 'पाटी कोरी पाहिजे' या नियमामुळे बऱ्याच वेळी गुरु दुसऱ्या गुरूकडून आलेल्या विद्यार्थ्याला(शिकवायची इच्छा झालीच तर) किंवा 'बाहेर'च्या विद्यार्थ्याला विद्यादान करण्यास तयार नसत. याचे कारण त्याच्यावर आधीचे कोणते संस्कार असतील तर त्याच्या गळी आपले संस्कार उतरवणे जड जाणार याची त्यांना कल्पना असे. तसे संस्कार असतील आणि ते त्या गुरूच्या विचारात बसणारे नसतील तर एकतर अशा विद्यार्थ्याला शिकवायचेच नाही किंवा आधीचे संस्कार पुसून टाकून आणि मग स्वतःची शैली विद्यार्थ्यांमध्ये उतरवायचा प्रयत्न कोणताही गुरू करतो. या गोष्टीचे नेमकं चित्रण 'संगीत कट्यार काळजात घुसली' या नाटकात मार्मिकपणे केलेलं आहे. पं. भानू शंकर शास्त्री यांच्याकडे थोडा काळ लहानपणी शिकलेला सदाशिव जेव्हा काही कारणाने अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी येतो पण त्याला राजगायक पद असलेले पंडितजी निघून गेल्यामुळे पंडितजींऐवजी त्यांचे प्रतिस्पर्धी खाँसाहेब आफताब हुसेन खांँ हेच राजगायक आहेत असे कळते तेव्हा तो त्यांना आपल्याला शिकवण्याची विनंती करतो. पण सदाशिव हा पंडितजींच्या परंपरेत तयार झालेला असल्याने सदाशिवाच्या गळ्यावर आता खॉंसाहेबांचे संस्कार चढवणे अशक्य आहे असे खांसाहेब सांगतात. संगीतात अशाप्रकारे कधीकधी एकीकडून दुसऱ्या गुरुकडे जाणाऱ्या विद्यार्थ्याला काही मनस्ताप होण्याची तसेच गुरुलाही त्या विद्यार्थ्यांवर नवीन संस्कार चढवण्याची कसरत करावी लागण्याची शक्यता असते. त्यामुळेच गुरु बदल हा एखाद्याच्या कला जीवनातील मोठा धोक्याचा बदल असू शकतो त्याच वेळी तो बदल कल्याणाचा पण असू शकतो.
खरे तर गुरुचे स्वप्न काय असते, तर आपण दिलेली कला आहे त्या स्वरूपात विद्यार्थ्याने उतरविणे आणि दिलेल्या तालमीप्रमाणे रियाज करून स्वतःचे गुरुचे आणि घराण्याचे नाव रोशन करणे असा एक सर्वसाधारण सिलसिला आहे. शिष्याला चांगला गुरू शोधण्यासाठी दारोदारी हिंडावे लागते तर गुरूला एक चांगला शिष्य मिळण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागते. इथे चांगला याचा अर्थ स्वभावाने किंवा परिस्थितीने चांगला असं बिलकुल नाही. गुरुची कला, त्याने दिलेली विद्या आत्मसात करून गुरुची विचारशैली सुद्धा आत्मसात करणे आणि तिच्याशी कोणतीही प्रतारणा न करता त्याच्यात वाढ करणे, निदान तिचे पावित्र्य राखणे हे जे शिष्य करतात ते शिष्य गुरूच्या जवळचे असतात. गुरू शिष्याला फक्त विद्या देत नाही तर संस्कारही देतो. शिष्याने काय करावे तसेच काय करू नये याचेही शिक्षण उत्तम गुरू देत असतो. शिष्यालाही ही विद्या 'प्राप्त होणे' ह्या समाधानात न राहता तिच्यावर अतीव मेहेनत घेणे हे एक महत्कार्य करायचे असते. कलेतून मिळणाऱ्या विद्येच्या सहाय्याने आधी सिद्धी, मग आनंद आणि मग पैसा व प्रसिद्धी या गोष्टी पाठोपाठ येतात. काही वेळा त्याही मिळतीलच असेही नाही पण हा यज्ञकुंड सतत सुरू ठेवावा लागतो. एक स्पर्धा, एक कार्यक्रम अथवा काही परीक्षा पदव्या एवढेच याचे कार्य न राहता ती एक जीवनसाधना होऊन जाते. या सर्व प्रकाराला आणखी एक बाजू असते ती म्हणजे कलाकाराची कला आणि प्रतिभा. परंपरेने मिळालेल्या विद्येला स्वतःच्या प्रतिभेचा साज संस्कारांच्या आणि मिळालेल्या विद्येच्या मदतीने चढवायचा असतो. हे सगळे करताना पोटापाण्याची, संसाराची काळजी कशी घ्यायची हे ज्याचे त्याने पहायचे असते. कारण कलेतील शिक्षण कोणत्याही मोठ्या पगाराचे आश्वासन देत नाही. कला करताना पैशासाठी कला म्हटले की मनाला मुरड घालून पण तरीही उच्च निर्मितीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन पांडवांप्रमाणे अज्ञातवासाची काही वर्षे घालवावी लागतात, पण आपलं स्वत्व आणि संयम सांभाळून याही परीक्षेतून बाहेर पडून तप्त सुर्यप्रमाणे उजळून निघतो तो कलाकार. प्रेक्षकांच्या टाळ्यांसाठी तो गात वाजवत नाही, तर आतून मिळणाऱ्या आनंदासाठी तो क्षणोक्षणी आसुसलेला असतो. त्याला मिळणाऱ्या आनंदात प्रेक्षक सहभागी होऊन कधी डोलतात तर कधी अखंड टाळ्या वाजवत बसतात आणि कधी कधी स्तब्ध होतात. हे सर्व कलाकाराने विद्यार्थी म्हणूनच पहायचे आणि भोगायचे असते. अशा प्रकारे या आराधनेत खुद्द कलाच त्याची गुरू बनते.