लावणी
हा गीतप्रकार केवळ सुगम संगीतातला नसून ह्याचा तोंडावळा लोकसंगीताशी अधिक जुळतो. हालसातवाहनाच्या गाथासप्तशतीपासून लोकसंगीताची लावणी व पोवाडयाची वाटचाल होत गेली. ह्या गाथा लग्नप्रसंगी गायिल्या जात असा उल्लेख मैत्रायणी संहितेत आहे. केवळ गाण्यासाठीच गाथा रचल्या नसून एका कथानकाला धरून त्याची गुंफण केली जाई. कथानकाला प्रारंभ करणारी गाथा हेच ध्रुवपद मानून कथानकातील एक भाग जेवढ्या कवनात पुरा होत असेल तेवढ्या गाथा गाऊन मग ध्रुवपदाचे आवर्तन करायचे अशी गाथागायनाची पद्धती होती. यातूनच कथानकाच्या ओघाला धरून तयार झालेली लावणी निर्माण झाली असावी. शाहीर सगनभाऊ ह्यांच्या 'सिद्धनाथाच्या लावणी'चा तोंडवळा या गाथांमधील नाट्यसंगीताशी मिळताजुळता आहे. या गाथांमध्ये एक समृद्धिगीत असून त्याचा तोंडवळा 'पिकला ग गहू हरभरा' या लावणीशी जमतो. या गाथांमधील कृष्णगोपीच्या सामूहिक नृत्याचे वर्णन पाहून आपल्याकडील गौळणी या नृत्यातून आल्या असाव्यात असे वाटते.
लावणी हा मराठी गीतप्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक परंपरेची शान आहे. नृत्य, नाट्य, संगीत यातून मनोरंजन करण्याचा हा एक शृंगारिक आविष्कार असून यातील गीते कधी चंचल व शृंगारिक तर कधी श्लेषात्मक कोडे घालणारी, कधी भक्तिरसाचा आविष्कार करणारी व वेदांताचा पुरस्कार करणारी असतात. हिंदी भाषेतही क्वचित लावण्या असतात. लावणी हा ठसकेबाज, डौलदार अशा ढंगाचा गीतनृत्यप्रकार असून ह्यात मनाला खेचून टाकणारी कोडी सवाल-जबाबाच्या रूपात असतात. लावणीची सांगीतिक जडणघडण ख्यालगायकीची लय, ठुमरीचा हळुवारपणा आणि टप्प्याची दाणेदार तानबाजी अशा मिश्रणाने झाली आहे. लावणीच्या ह्या सांगीतिक ठेवणीने समाजाला त्या काळात वेड लावले. लावणीचे हे विशेष लक्षात घेऊनच राम जोशी, होनाजी बाळा, सगनभाऊ, शाहीर प्रभाकर, पठ्ठे बापूराव ह्या कवींनी म्हणजे शाहीरांनी शृंगार, विरहार्तता इ. भावनांतून होणारा आनंद लावणीतून व्यक्त केला. लावणी हा महाराष्ट्राचा अमोल ठेवा आहे.
पोवाडा
हा एक वीररसप्रधान गीतप्रकार असून महाराष्ट्राची खासियत आहे. महाराष्ट्रात हा मराठ्यांच्या काळात अतिशय लोकप्रिय झाला. शूरवीरराजे व त्यांचे पराक्रम राजांचे प्रमुख सरदार ह्यांच्या शौर्याची वीरगाथा, युद्धाची वर्णने ह्यांनी युक्त असा हा पोवाडा जनतेची मने जिंकून घेई. त्यांचे बाहू स्फुरत व त्यांच्या शौर्याला धैर्याला आवाहन करीत. म्हणूनच छत्रपती शिवाजी, तानाजीच्या पराक्रमाचे पोवाडे आजही तितक्याच ओढीने लोक ऐकतात. बुलंद, खणखणीत आवाज, ललकारी जी जी जी ही धृवपदाला लागलेली, जेव्हा गायक गातात तेव्हा सामाजिक व राजकीय जनजागृतीला ते आव्हानात्मक वाटते. स्पष्ट शब्दोच्चार, आवेश व द्रुत लय, ढोलकी, डफ व तुणतुण्याची साथ, कथाकथनाचा ओघ ही पोवाड्याची वैशिष्ट्ये. छत्रपती शिवाजीच्या काळात १७ व्या शतकात अनेक शाहीरांनी गायिली. पेशवाईतल्या राम जोशी, अनंत फंदी आणि प्रभाकर ह्या शाहीरांचे पोवाडे लोकप्रिय आहेत.
उपशास्त्रीय व सुगम किंवा ललित गीतप्रकारांमध्ये पुष्कळदा सरमिसळ होते. त्यामुळे त्या बाबतीत मतभेद निर्माण होऊ शकतात. पण हे गीतप्रकार ज्या ढंगाने व शैलीने गायिले जातील त्यावर त्यांना कुठल्या भागात टाकायचे हे अवलंबून राहील. भजने, होरी, नाट्यसंगीत, गझल इ. गीतप्रकार रागांमधून शास्त्रीय ढंगाने आलाप तानांसह सादर केले तर ते उपशास्त्रीय प्रकारातही बसू शकतात. परंतु भावगीत व साध्या काव्यावर भर देणाऱ्या पद्धतीने गायिले तर ते सुगम संगीताच्या प्रकारात बसू शकतात. लोकगीतेसुद्धा आजकाल चित्रपटगीत, भावगीत अशा सुगम संगीताच्या प्रकारात बसू लागली आहेत.