सुगम गीतप्रकार - भाग १
कच्ची होरी
होळीच्या वर्णनपर काव्यांची स्वरतालबद्ध गुंफण म्हणजे होरी होय. कच्ची होरी धमार ह्या शास्त्रीय गीताप्रमाणे रागबद्ध व धमार तालात किंवा ठुमरी अंगाने गायिली जात नाही तर ती केरवा तालात किंवा इतर तालात, द्रुत लयीत व कुठल्याही मिश्र रागांच्या सुरावटीत बांधलेली असते. ही ब्रजभाषेत कृष्णलीला, रंग खेळणे आदी रासक्रीडांविषयी असते म्हणून हिचा सुगम संगीतात किंवा उपशास्त्रीय संगीतात अंतर्भाव केला जातो.
सादरा, दादरा व गझल
हे गीतप्रकार व गझल हाही गीतप्रकार उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतातच गणल्या जातो. दादरा, सादरा ही गीते शृंगाररसयुक्त व दादरा, केरवा, रूपक झपताल वगैरे तालात गायिली जातात. ह्या तिन्ही प्रकारांना रागाचे बंधन नसते. प्रामुख्याने शब्दप्रधान असून ह्यांना शास्त्रीय संगीतासारखे बंधन नसते.
अभंग, भजन व ओवी
हाही महाराष्ट्राचा वारसा असून तिला एक संस्कृती व परंपरेचे अधिष्ठान लाभले आहे. ज्ञानेशादी ओवी, तुकारामांचे अभंग हे भक्तिरसाचा उत्कट आविष्कार असून त्यांनी सुगम संगीतात मानाचे स्थान मिळविले आहे. अभंग हे मराठीतच असले तरी संत सूरदास,कबीर, संत मीराबाई आदी अनेक संतांची भजने हिंदी भाषेतही गायिली जातात. या भजनांनी हिंदी भाषा अधिक समृद्ध व प्रगल्भ झाली. अभंग, भजनांसाठी भजनी केरवा, दादरा, रूपक इत्यादी ताल योजिले जातात. ह्यांना रागांचे बंधन नसून तिरसपूर्ण असे हे काव्य अतिशय लोकप्रिय झाले आहे. परमेश्वराची स्तुती, लीला, भक्ती व उपासना ह्यासंबंधी स्वच्छ निर्मळ मनाने आळवलेली गीते म्हणजे भजने होत. भजनांचे दोन प्रकार आहेत. वारकरी पंथांची भजने साधी एकतारीवर तर दुसरी मृदंगाच्या साह्याने म्हटली जातात.