सुगम गीतप्रकार - भाग २
कीर्तन
कीर्तन हा गीतप्रकार भक्तिरसाचा उत्कट आविष्कार असून सगुण व निगुण दोन उपासकांना ह्यात आनंद मिळतो. वल्लभ संप्रदायाने भक्तिमार्गाचा अवलंब कीर्तनातून केला. पदांचे शुद्ध उच्चारण, रागतालादी संगीतशास्त्रात पारंगत असणे कीर्तनकाराला आवश्यक असते. श्रोत्यांची एकतानता व एकरूपता साधण्यासाठी सोप्या शब्दाचे आख्यान व त्याबरोबर भक्तिरसाच्या काव्याचे व त्याला संगीताचे कोंदण आवश्यक असते. कीर्तनातून भक्तिरसाचे भावोद्दीपन केले जाते. म्हणून संतांनी भक्तिकाव्य आणि संगीत ह्यांचा सुंदर मेळ कीर्तनातून साधला. भारतीय संस्कृतीचा, परंपरेचा हा अमोलिक ठेवा असून तो आपण जतन करायला हवा. साहित्य, संगीत, अभिनय, वाक्चातुर्य ह्या सर्व गुणांचा ह्यात मेळ असून ईश्वराची आळवणी करण्याचा कीर्तन हा एक आनंददायक मार्ग आहे.. कीर्तनात आख्यान मूळ भाग असून तो साकी, दिंडी, श्लोक, अभंग, ओव्या, दोहे, भारूड, गौळण इ. अनेक गीतप्रकारांचा त्यात अवलंब केला जातो. कीर्तनात साथीला संवादिनी किंवा ऑर्गन, तबला किंवा मृदंग, झांज अशी वाद्ये घेतात. ताल दादरा, केरवा, धुमाळी असे असतात. कीर्तनाचे दोन प्रकार
१. भजनी कीर्तन,
२. नारदीय कीर्तन.
भजनी कीर्तनात नाट्य नाही, उत्तररंग नाही, विविध रस नाहीत. ह्यात फक्त भजन व नामसंकीर्तन असते. नारदीय कीर्तनात केवळ भगवद्भक्तीच नाही तर नाट्य आहे, संगीतही आहे. भिन्न भिन्न रुचीच्या लोकांचे समाराधन करणारी एक कला म्हणजे कीर्तन. नारदीय कीर्तनाचे दोन भाग
१. पूर्वरंग
२. उत्तररंग.
पूर्वरंगात सिद्धान्त, प्रवचन व उत्तररंगात त्याला धरून एखादे संगीतमय आख्यान जे अतिशय लोकप्रिय झाले, व ह्या संगीत आख्यानांचा संगीत नाटकावर खूप प्रभाव पडला. वल्लभ संप्रदायाने भक्तिगीताच्या स्थानावर कीर्तनाला खूप महत्त्व दिले आहे. रागतालादी संगीत शास्त्रात पारंगत असणे कीर्तनकाराला उचित आहे.
अष्टपदी
इ.स. १२ व्या शतकात उदयाला आलेला, पं. जयदेव यांनी रचलेला 'गीतगोविंद' ह्या ग्रंथात अष्टपदी हा गीतप्रकार आज तेवढा प्रचलित नाही. अष्टपदी ह्या पदांना आठ ओळी असतात. संस्कृत भाषेत श्रीकृष्णलीलावर आधारित अष्टपदी लपीला अतिशय डौलदार व भक्तिरसपूर्ण असा प्रकार असून आजही अष्टपदीची बांधणी लोकप्रिय आहे.
सावनी
पावसाळ्यात किंवा श्रावण महिन्यात गायिल्या जाणाऱ्या गीतांना सावनी असे म्हणतात. ठुमरी अंगाने गातात. वर्षाऋतूचे ह्यात वर्णन असते. केरवा, अद्धाअशा तालात ही गीते गायिली जातात.
कवाली व खमसा
हे यवनांच्या मुखातून गायिले जाणारे गीतप्रकार आहेत. उर्दू व हिंदी भाषेत शृंगारिक किंवा भक्तिपर गीते असतात. रूपक, व पश्तो अशा तालात गायिली जातात. टाळ्या वाजवून हि गीते गातात, व साथीला ढोलक असते.