सुगम किंवा ललित संगीत
सुगम संगीत हा संगीताच्याच क्षेत्रातील एक भाग आहे. शास्त्रीय संगीताप्रमाणे ह्या गीतप्रकारांना रागाचे व रागोचित स्वरमालिकांचे बंधन नसते. केवळ स्वरतालयुक्त असावे एवढीच अपेक्षा असते. काव्य-शब्द-भाव व लय या बाबींना अधिक महत्त्व असते. भावगीते, चित्रपटगीते ही प्रामुख्याने सुगम संगीताच्या प्रकारात बसतात. तसेच भजने व इतर गझलादी गीतप्रकारही सुगम संगीतच आहेत. ह्यापेक्षा लोकगीत किंवा लोकसंगीत है प्रकार मात्र थोडेसे वेगळे आहेत.
प्राचीन काळापासून लोकमुखातून सहजपणे बाहेर पडलेले काव्य हे लोकगीत असे म्हणणे इष्ट. भारत हा बहुभाषी, बहुप्रांतीय व बहुवर्णीय देश असल्याने प्रत्येक प्रांतातील व त्या त्या भाषेतील लोकगीत हे भिन्न विषयांचे पण दैनंदिन जनरीतीत अडकलेले, भावोत्कट व शक्यतोवर सोप्या व एकसारख्या चालीत, सोप्या तालात बद्ध असते. खूपशी लोकगीते ही समूहाने गायिली जातात. उदा. कोळीगीते, शेतकरीगीते, स्त्रीगीते - ओवी, भूपाली इ. भिन्न भिन्न प्रांतातील भिन्न भिन्न भाषीय गीते आपापली वैशिष्ट्ये घेऊन येतात. उदा. महाराष्ट्रात लावणी, पोवाडे, ओव्या, गौळणी, भजने, गोंधळ, भारूड वगैरे. पंजाबातील टप्पा, हीर, भांगडागीत (नृत्यासह), उत्तरेकडे होरी, चैती, सावनी, आल्हा, इ. गुजरातेत गरबागीत तर राजस्थानात मांड, पिपली वगैरे. दादरा, कजरीपरंतु आजकाल सर्व लोकगीते आकाशवाणी, दूरदर्शन व चित्रपट ह्या माध्यमांतून संगीताच्या क्षेत्रात घातली जातात.