ताल
संगीतात तालाचे महत्व
मानवी जीवन सुखकारक होण्यासाठी त्यामध्ये एकसूत्रता व शिस्तीची आवश्यकता असते. त्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. हीच सुसूत्रता व शिस्त सांगीतिक विश्वात महत्त्वपूर्ण आहे. संगीतातील मधुर स्वरांना जोपर्यंत लय तालबद्ध करून सादर करत नाही तोपर्यंत संगीताची आनंदानुभूती घेणे अशक्य आहे.
|| ‘गीतं, वाद्यं तथा नृत्यं
त्रयं संगीत मुच्यते’ ||
या व्याख्येवरून संगीताचे व्यापकत्व सिद्ध होते. संगीताचा मुख्य उद्देश आनंद प्राप्ती आहे. गायन, वादन व नृत्याविष्काराला मूर्त रूप देण्यासाठी ते तालबद्ध असणे आवश्यक आहे. संगीत श्रवणीय होण्यासाठी ताल अंग हे महत्त्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे कलावंत स्वररूपी पुष्पांना एका तालरूपी धाग्यामध्ये बांधून सुंदर हार तयार करतो, तेव्हा त्याची अभिव्यक्ती श्रेष्ठरूप धारण करते. ताल विरहीत संगीत हे अरण्यक संगीत आहे आणि तालयुक्त संगीत हे सामाजिक संगीत आहे.
|| मुखंप्रधान-देहस्य नासिका मुख्य मध्यके
तालहीनं तथा गीतं नासाहीन मुख यथा ||
संगीत रत्नाकरमधील या श्लोकाच्या अनुषंगाने विचार करता शरीरामध्ये मुख महत्त्वाचे आहे. मुखामध्ये नासिका महत्त्वाची असते. नासिका नसेल तर माणसाची अवस्था व्यवस्थित राहणार नाही. त्याचप्रमाणे संगीतात ताल नसेल तर त्याची दुरावस्था होईल.
|| यस्तु तालं न जानाती, गायको न च वादकः
तस्मात सर्व प्रयत्नेन,कार्य तालावधारणम् ||
ज्याला तालाचे ज्ञान नाही त्याला कलावंत म्हणणे उपहासाचे ठरेल. त्यामुळेच अथक परिश्रमाने तालविद्याग्रहण करणे आवश्यक आहे. संगीतामध्ये विभिन्न तालाच्या व लयीच्या माध्यमातून रसांची निर्मिती होते. जेव्हा माता आपल्या बाळाला अंगाई गाऊन थोपटते तेव्हा ते बाळ लवकर निद्रादेवीच्या आधीन होते. सैनिकांमध्ये स्फुरण व जोश निर्माण होण्यासाठी विविध वाद्यांचे वादन केले जाते. कुस्तीच्या फडातील पहिलवानामध्ये हलगीचा नाद जोश निर्माण करतो. लोकनृत्यामध्ये नर्तक, नर्तकीचे नृत्य परमोच्च गतीकडे वाटचाल करते तेव्हा पूर्ण वातावरण नृत्यमय होते. नर्तक, दर्शक, तालवाद्य वादक यांच्यामध्ये एक प्रकारचे तादात्म्य निर्माण होऊन सर्व जण मंत्रमुग्ध होतात. ही भावविभोर अवस्था निर्माण करण्याची शक्ती तालामध्ये आहे. त्यामुळे तालविहीन संगीताची कल्पना आपण करू शकत नाही. संगीतात तालामुळे आवर्तने निर्माण होतात, त्यामुळे एक प्रकारची शिस्त त्यामध्येयेते. गायन, वादन, नृत्याच्या आविष्कारामध्ये वैविध्यपूर्ण व चमत्कृतीपूर्ण रितीने समेवर येणे, अतीत, अनागतसारख्या नजाकती करणे केवळ तालामुळेच घडते.
‘श्रुतीर्माता लय: पिता’ या उक्तीनुसार श्रुती माता तर लय ही पिता आहे. या मातापित्याचा आश्रय घेऊन गायन, वादन, नृत्यातील कलावंत आपला सांगीतिक विचार प्रकट करतो. आपल्या विविध कल्पना लय व तालाच्या विभिन्न प्रयोगातून तो व्यक्त करतो. ही अभिव्यक्ती करत असताना तालाच्या आधीन राहून वेगवेगळ्या लय लयकारीचा प्रयोग, सवाल-जवाब इत्यादी प्रकार तालामुळेच शक्य आहेत. प्रामुख्याने ताल ही अशी रचना आहे की, ज्याच्या आधारावर संगीतामध्ये वेळेचे मापन केले जाते. तालाची लांबी आवश्यकतेनुसार कमी जास्त करता येते. एकंदर तालामुळे अतिशय सुंदर, कलात्मक व लयात्मक रचनेचा आनंद आपल्याला घेता येतो.