पं.किशन महाराज
जीवनी
भारतीय संगीतात तबला या वाद्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तबला या वाद्याला लोकप्रिय करण्यात अनेक कलावंतांनी मोलाचे योगदान दिले आहे. यात बनारस घराण्याचे थोर कलावंत पंडित किशन महाराज यांचा नामोल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. त्यांचे जीवन कार्य पुढीलप्रमाणे आहे.
जन्म व बालपण
पं. किशन महाराज यांचा जन्म बनारस येथील कबीर चौरा मोहल्ला येथे दि. ३ सप्टेंबर, १९२३ रोजी झाला. कृष्णाष्टमीच्या मध्यरात्री त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव किशन असे ठेवण्यात आले. घरात सांगीतिक वातावरण होते. त्यांच्या वडिलांचे नाव हरि महाराज तर आईचे नाव अंजीरादेवी असे होते.
गुरू व शिक्षण
पं. किशन महाराज यांनी तबला वादनाचे प्राथमिक शिक्षण वडील पं. हरि महाराज यांच्याकडून घेतले. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे काका पंडित कंठे महाराज यांच्याकडून त्यांनी तबला वादनाची विधीवत तालीम घेतली.
वादन शैली
बनारस घराण्याची जी वादन शैली आहे त्याची सर्वच वैशिष्ट्ये त्यांच्या वादनात दिसून येतात. उंचीपुरी देहयष्टी, गौरवर्णीय रुबाबदार चेहरा, कपाळावर शोभून दिसणारा कुंकुम तिलक, मानेवर रूळणारे केस त्यांचे व्यक्तिमत्व खुलवत होते. वीरासनात बसून ते वादन करायचे. त्यांचे दायाँ बायाँचे संतुलन अतुलनीय होते. बनारसी बोलबाट, चलन चाला, नृत्याचे बोल इत्यादी बोल प्रकार ते उत्तम प्रकारे सादर करायचे.
साथसंगत
स्वतंत्र वादनाबरोबरच ते उत्तम साथ करायचे. त्यांनी उस्ताद फैय्याज खां, पं. ओंकारनाथ ठाकूर, उस्ताद बडे गुलाम अली खां, पं. भीमसेन जोशी, पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खां यांसारख्या दिग्गज कलावंतांसोबत साथसंगत केलेली आहे. याच बरोबर शंभूमहाराज, पं.गोपीकृष्ण आणि पंडित बिरजू महाराज यांच्या नृत्याला त्यांनी साथसंगत केली. त्यांनी १९६५ मध्ये ब्रिटनमध्ये कॉमनवेल्थ कला समारोहातही साथसंगत केली आहे.निचा नगर, आंधिया, बडी माँ या चित्रपटांतील गीतांना त्यांनी तबल्याची साथसंगत केली आहे.
पुरस्कार
पंडित किशन महाराजांना संगीतासाठी केलेल्या अथक परिश्रमांबद्दल व सांगीतिक कार्याबद्दल अनेक मानसन्मान व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना लय भास्कर, संगीत सम्राट पुरस्कार, काशी स्वर गंगा सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, ताल चिंतामणी, लय चक्रवर्ती, उस्ताद हाफिज अलीखां या पुरस्कारांसह भारत सरकारच्या पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आले आहे.
शिष्यसंप्रदाय
पंडित किशन महाराज हे उत्तम तबला वादक तरहोतेच परंतु ते एक आदर्श गुरूही होते. त्यांनी अनेक शिष्य निर्माण केले. यात पंडित कुमार बोस, पंडित बाळकृष्ण अय्यर, सुखविंदर सिंह नामधारी अशा शिष्यांचा नामोल्लेख करता येईल.ज्यांनी तबला वादनाचा देशविदेशांत प्रचार व प्रसार केला, ज्यांनी अनेक चित्रपट गीते आपल्या तबला साथीने अजरामर केली; ज्यांनी अनेक शिष्य घडवून अभिजात संगीतात मौलिक योगदान दिले, अशा थोर तबला वादक पंडित किशन महाराज यांचा ४ मे, २००८ रोजी बनारसजवळील खजूरी येथे मृत्यू झाला. देशातील सर्वच संगीतकारांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पं. किशन महाराजांच्या निधनामुळे संगीत जगतात जी पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून न निघण्यासारखी आहे.