पं.शारंगदेव व संगीत रत्नाकर
पं. शारंगदेवांचं स्थान शास्त्रकारांमध्ये उच्च दर्जाचं आहे. 'संगीत रत्नाकर' हा आधारभूत ग्रंथ लिहून त्यांनी संगीत क्षेत्रात फार मोठे कार्य केले आहे.
पं.शारंगदेवाच्या जन्माचा काळ १२१० ते १२४७ मध्ये म्हणजे १३ व्या शतकाच्या मध्यावर समजावा लागतो. १३ व्या शतकात म्हणजे जवळजवळ ७०० 'संगीत रत्नाकर' हा ग्रंथ लिहिला. शारंगदेवाचे वडील शोदल हे काश्मीरनिवासी होते. ते वर्षापूर्वी शारंगदेवाने दक्षिणेत आले तेव्हा देवगिरीच्या आनंदवंशीय राजाच्या दरबारी संगीतज्ञ म्हणून राहिले. १३ व्या शतकात संपूर्ण हिंदुस्थानात एकच संगीतपद्धती चालू होती. उत्तरी दक्षिणी असा भेद नव्हता, त्यामुळे 'संगीत रत्नाकर' ह्या ग्रंथाला दोन्ही पद्धतींचा आधारभूत ग्रंथ मानतात. ह्या ग्रंथाचे टीकाकार सिंहभूपाल यांच्या मते शारंगदेवाच्या ग्रंथापूर्वी भारताचा ग्रंथ दुर्योध वाटत असे. शांरगदेवाने आपल्या ग्रंथातील टीकेद्वारा, जरी ती भरताच्या ग्रंथाला अनुसरून असली तरी, सुगम असे संगीताचे ज्ञान सर्वांप्रती पोचविले. हा ग्रंथ संस्कृत भाषेत सूत्रपद्धतीने लिहिला. शारंगदेव बुद्धिमान होता व लहानपणापासून त्याला संगीताची साहित्याची आवड होती. 'संगीत रत्नाकर' ह्या आपल्या ग्रंथात प्राचीन व सामायिक संगीताचे विवेचन आहे. हा ग्रंथ सर्व संगीत साहित्याचा मुकुटमणी आहे. केशव, सिंहभूपाल, कल्लिनाथाने ह्या ग्रंथावर संस्कृतमध्ये न विठ्ठलाने तेलुगूमध्ये टीका केली आहे. शारंगदेवाने ह्या ग्रंथात मतंगापेक्षा संक्षिप्त व वैज्ञानिक दृष्टिकोनातून विवेचन केले आहे परंतु दोघांचे मत एकच आहे. ह्यात १. स्वराध्याय २. रागाध्याय ३. प्रकीर्णाध्याय ४. प्रबन्धाध्याय ५. तालाध्याय ६. वाद्याध्याय व ७ तालाध्याय असे सात भागात विभाजन केले आहे.
प्रथम अध्याय यात नादाचे स्वरूप, नादोत्पत्ती त्याचे भेद आहत व अनाहत ना सांगितले. ग्राम, मूर्च्छना, तान, स्वर, जाती, वर्ण, अलंकार आणि जातीचे संपूर्ण विवेचन केले आहे. द्वितीय अध्याय ग्राम वर्गीकरण आणि त्याचे विभाग रागांग भाषांग, क्रियांग, उपांग, राग, उपराग, भाषा, विभाषा, अंतर्भाषा इत्यादींचे स्पष्टीकरण दिले व देशी राग असे नाव दिले. ह्या काळात दक्षिणेपर्यंत संगीतावर मुस्लिमांचा प्रभाव पडू लागला होता ह्याची साक्ष त्याने आपल्या रागांना मालव, गौड, कर्नाट, बंगाल, द्रविड, सौराष्ट्र, दक्षिण, गुर्जर अशी प्रदेशानुसार नावे दिली त्यावरून लक्षात येते.
तृतीय अध्याय वाग्गेयकाराचे लक्षण, त्याचे गुणदोष, गीताचे व गायकाचे गुणदोष इत्यादींचे ह्यात वर्णन आहे. वाग्येकाराचे ८ गुण, गायकाचे २२ गुण व २५ अवगुण ह्यात वर्णिले आहेत. चतुर्थ अध्याय गानाचे निबद्ध व अनिबद्ध असे भेद सांगून त्याचे विस्तृत विवेचन केले आहे. धातू, प्रबंध, भेद इत्यादींवर विचार केला आहे. पंचम अध्याय हा तालविषयक आहे. षष्ठाध्याय हा वाद्याध्याय असून त्यात तत, सुषिर, अवनद्ध व घन वाद्ये यांचे विवेचन असून वादनविधी, तालवाद्ये ह्यासंबंधीचे विवेचन व वादकाचे गुणदोष दिले आहेत. सप्तम अध्याय हा नृत्य-नाट्य ह्यावर आधारित आहे.
ह्या ग्रंथात २६४ रागांचे वर्णन आहे. ह्या रागांचे वर्गीकरणाचा आधार कोणता हे मात्र सांगितले नाही. मतंगानंतर शारंगदेवाने देशी व मार्गी संगीतातील भेद दाखवून मतंगाप्रमाणे देशी रागांचे वर्णन केले. आहत नादाची कल्पना त्याने आपल्या शरीराच्या आधारावर केली आहे. २२ श्रुतींसाठी २२ नाड्या ही कल्पना त्यानेच प्रथम मांडली. आहत नादाचे पूप, अपूप, सूक्ष्म, अतिसूक्ष्म व तीव्र असे ५ भेद सांगितले. भरताने मानलेल्या २ ग्रामांशिवाय शारंगदेवाने गांधारग्रामाचेही वर्णन केले आहे. भरताच्या अंतरगांधार व काकली निषादाशिवाय अनेक विकृत स्वरांची स्थापना केली. परंतु ग्राम जाती आदींच्या वर्णनात भरताचेच अनुकरण केले. भरताच्या जातिगायनाच्या १० लक्षणांऐवजी १३ लक्षणे मानली, ती ग्राह्य ठरली व अजूनही त्यांचे महत्त्व आहे. मूर्च्छनांची मध्य सप्तकात स्थापना, विकृत स्वरांची कल्पना, मध्यम ग्रामाचा लोप आणि प्रति मध्यमाची कल्पना ह्यावरून रत्नाकराची मौलिकता सिद्ध होते. याच विकसित ग्रामजाती विलीन झाल्या आणि रागजातीचा प्रादुर्भाव झाला. रत्नाकराचे राग जरी दुर्बोध असले तरी त्याची रागपद्धतीआजही प्रचारात आहे. शारंगदेवाने सांगितलेले आलप्ती, गमक, तान, कूटतान, वर्ण, धातु आदींचे नियम आजही त्याच रूपात प्रचलित आहेत. रत्नाकराचे निबद्धगान आजही धृपद व ख्यालाच्या रूपात प्रचलित आहेत. शुद्ध व विकृत स्वरातील अंतर भरताने एका श्रुतीचे मानले पण शारंगदेवाने २ श्रुतींचे मानले.
शारंगदेवाने आपल्या ग्रंथात भरताच्या १८ जातींना मानले परंतु त्याच्या नियमानुसार विभाजन केलेले नाही. शारंगदेवाने २२ श्रुती मानल्या पण त्याने प्रथम श्रुतींची स्थापना केली व नंतर स्वरांचे मूल्यमान काढले, पण हे मात्र भरताचे अनुकरण आहे. भरताच्या श्रुती समान असणे आवश्यक नाही पण शारंगदेवाने समान मानल्या. शारंगदेवाच्या एका सप्तकात २२ श्रुतींची स्थापना क्रमशः ७ शुद्ध व ५ विकृत व त्याही 'चतुश्चतुश्चतुश्चैव' ह्या सूत्रानुसार केलेली आहे. त्याने आपला प्रत्येक स्वर शेवटच्या श्रुतीवर स्थापित केला आहे. शारंगदेव दक्षिणेतील विद्वान असल्याने त्यांनी आपल्या शुद्ध थाटाला 'मुखारी' नाव दिले जो आता कनकांगी नावाने प्रचलित आहे.
महर्षी भरतानंतर शारंगदेवाचा 'संगीत रत्नाकर' हा ग्रंथ विशेषरूपाने प्रचलित व लोकप्रिय झाला. दक्षिणेतील संगीतज्ञ याच ग्रंथाला आधारग्रंथ मानतात. त्यावेळी शुद्ध घाट हा काफी थाटाप्रमाणे होता. आज आपला शुद्ध घाट बिलावल आहे म्हणून रत्नाकरामध्ये सांगितलेले राग आपल्याकडे फारसे प्रचलित नाहीत. त्याने आपल्या रागांचा संबंध प्राचीन रागांशी व प्राचीन रागांचा संबंध जातींशी जोडण्याचा प्रयत्न केला.
'संगीत रत्नाकर' ह्या ग्रंथात शुद्धा, भिन्ना, गौडी, बेसरा व साधारणी ह्या ५ जातींच्या अंतर्गत ३० ग्रामराग मानले. शारंगदेवानंतर असा एकही ग्रंथ लिहिल्या गेला नाही की ज्याचा आधारग्रंथ 'रत्नाकर' नाही. शारंगदेवांची पद्धती जरी दुर्बोध असली तरी त्याची विद्वत्ता निर्विवाद आहे. संगीताच्या सांगोपांग वर्णनाला ह्या ग्रंथाशिवाय कुठलाही ग्रंथ आधारभूत नाही. अशा रीतीने जसजसे ग्रंथकार व ग्रंथ होत गेले तसतसे संगीतशास्त्रात काही ना काही परिवर्तन होत गेले. तरीपण प्राचीन शाखग्रंथ हा आपल्यासाठी अमूल्य ठेवा आहे, कारण ह्या प्राचीन शाखावरूनच आधुनिक शाखाच्या विकासाची कल्पना येऊ शकते.