पं. मतंग व बृहद्देशी
संगीत क्षेत्रात प्राचीन शास्त्रकारांचे जीवन व कार्य ह्याविषयी काहीही माहिती मिळत नाही. त्यामुळे भरताप्रमाणेच मतंगाच्या काळाविषयीही मतभेद आहेत. 'बृहद्देशी' ह्या ग्रंथाचा लेखक मतंग आहे एवढी माहिती मात्र खात्रीपूर्वक मिळते. साधारणपणे चौथ्या शतकापासून सातव्या शतकापर्यंत बृहद्देशी ह्या ग्रंथाचा रचनाकाळ असावा. तसेच हा ग्रंथ भरताच्या नाट्यशास्त्रानंतरचा आहे हे निश्चित. ह्यावरून मतंग हा भरतानंतरचा आहे हेही स्पष्ट होते. कारण बृहद्देशी ग्रंथात भरताच्या नाट्यशास्त्राचा उल्लेख आढळतो.
बृहद्देशी ह्या ग्रंथात ग्राम व मूर्च्छना ह्याबद्दल विस्तृत विवेचन केले आहे. 'राग' ह्या हाब्दाचा उल्लेखही सर्वप्रथम ह्याच ग्रंथात मिळतो. देशी रागाची व्याख्या करताना मतंग म्हणतो की, साधारण जनतेमध्ये प्रचलित राग देशी राग आहे. संवादान्तर सांगताना त्याने नरताप्रमाणे ९ व १३ श्रुतींना मानून विवादी स्वरांचे अंतर २ श्रुतींचे मानले आहे. मतंगाने जातीतून ग्रामरागांची उत्पत्ती मानली आहे. मतंगाच्या बृहद्देशी ह्या ग्रंथात संगीताच्या इतिहासात प्रथमच देशी रागांचे वर्णन केले आहे. त्यापूर्वी मूर्च्छना सात स्वरांची असायची परंतु मतंगाने १२ स्वरांच्या मूर्च्छनेची कल्पना केली आहे. मतंगाच्या बृहद्देशी ग्रंथात आठ अध्याय असून ताल आणि वाद्यावर या ग्रंथात विचार केला आहे. नंतरच्या सर्व विद्वानांनी मतंगाची मते सन्मानपूर्वक उद्धृत केली आहेत. मतंग चित्रा वीणा वाजवीत असे परंतु 'किन्नरी बीणा' ही नवीन प्रकारची वीणा त्याने तयार केली.