पं. रामामात्य व स्वरमेलकलानिधी
पं. रामामात्य हा विजयनगरचा निवासी विजयनगरच्या राजांमध्ये कृष्णराय हा पराक्रमी, सर्व कलांची आवड असणारा होता. त्याच्यानंतर त्याचा चुलतभाऊ अच्युतराय गादीवर आला. त्याने इ. स. १५३० ते १५४२ पर्यंत राज्य केले. त्यालाही सर्व कलांची आवड होती, पण दुर्बल व दुर्गुणी असल्याने त्याचा प्रधान अमात्य तिम्मराजा याने सर्व सत्ता बळकावली. अच्युतराजाने कर्नूलचा किल्ला बांधला. ह्याच्या वेळी वैष्णवपंथाचा प्रचार झाला. प्रख्यात पुरंदारदास हा अच्युतरावाच्या पदरी विजयनगरात होता. तिम्मराज अमात्याचा पुत्र म्हणजे रामामात्य होय. याच्यावर अच्युतरायाची फार कृपा होती. अच्युतरापानंतर सदाशिवराव गादीवर आला. त्याने १५४२ ते १५६७ राज्य केले. याचाही प्रधान तिम्मराजच होता. स्वरमेलकलानिधी ह्या ग्रंथाचा काळ पं. रामामात्याने आपल्या ग्रंथाच्या शेवटी दिला आहे. श्रावणशुद्ध दशमी शके १४७२ साधारणनामसंवत्सर इ. स. १५५० साली म्हणजेच ह्या ग्रंथाचा रचनाकाळ १६ व्या शतकातला आहे. दरबारात राहून रामामात्याला संगीत साधना व मनन-चिंतन करण्यास अवसर मिळाला, त्यामुळे तो ग्रंथरचना करू शकला. आपल्या 'स्वरमेलकलानिधी' ह्या ग्रंथात त्याने स्वयंभू स्वरांचा उल्लेख केला असून २० मेल मानले व त्या मेलांतर्गत सर्व कर्नाटकी रागांना वाटून दिले. १६ व्या शतकाच्या अखेरीस त्याचे निधन झाले. ग्रंथसार ह्या ग्रंथात ५ प्रकरणे आहेत. १. उपोद्घात प्रकरण २. स्वर प्रकरण, ३. बीणा प्रकरण, ४. मेल प्रकरण व ५. राग प्रकरण.
1) उपोद्घात प्रकरण
ह्यात ग्रंथाची अनुक्रमणिका दिली आहे.
२. स्वर प्रकरण
यात ब्रह्मदेवाकडून सामवेदाची निर्मिती, ब्रह्मा, विष्णु, शंकर, सरस्वती, गजानन, यक्ष, गांधर्व, गान ह्या सर्वांना संगीत प्रिय होते. गंधर्व व गान असे गीताचे दोन भेद, 'गांधर्व' हे अपौरुषेय असून ह्याचा प्रयोग फक्त गंधर्वच करतात. ह्यामुळे मोक्षप्राप्ती होते असे सांगितले आहे. पंडितांच्या रचनांना व ज्यात देशी रागांचा समावेश आहे त्यांना 'गान' म्हणतात. गांधर्व गीत हे शाखाला धरून तर गान नेहमी प्रचाराला धरून असते. ह्या मताला शारंगदेवाची अनुमती आहे. आत्म्यास गापनाची प्रेरणा झाली की ब्रह्म ग्रंथीतील वायू क्रमाने हृदय कंठ व मूर्धा या तीन स्थानातून बाहेर येतो, त्याला 'नाद' म्हटले आहे. नादाचे तीन प्रकार एक मंद्र नाभीस्थान, मध्य हृदयस्थान व तार - मस्तकस्थान असून मंद्राच्या दुप्पट मध्य व मध्याच्या दुप्पट तार सप्तक आहे असे रामामात्याने मानले. नादाचे २२ भेद त्यांनाच श्रुती म्हणतात. श्रुती व स्वरस्थानावर चर्चा आहे. स्वरदृष्ट्या ग्रंथकाराने शारंगदेवाचे अनुकरण केले आहे. शुद्ध-विकृत स्वरांच्या व्याख्या दिल्या आहेत. १२ स्वरांनी राग गाण्याची पद्धत १६ व्या शतकापासून आहे. रामामात्याच्या ग्रंथातले शुद्ध व विकृत स्वर दक्षिणेत आजही प्रचारात आहेत.
3) बीणा प्रकरण
ह्यात शुद्धमेलवीणा, मध्यमेलवीणा व अच्युतरापदेवीवीणा अशी ३ वीणांची नावे दिली असून वीणेला तो चार तारा लावत असल्याचा उल्लेख आहे.
४. मेल प्रकरण
एकंदर २० मेलांची नावे असून मुखारी मेलाचे लक्षण ह्यात सात स्वर लागतात. 'अंतर गांधार' हा ११ व्या श्रुतीचा ध्वनी. 'काकली निषाद' हा दुसन्या श्रुतीचा ध्वनी. ह्या दोन स्वरांचे प्रतिनिधित्व स्वरक्रमाने, च्युत मध्यम व गांधार हा १२ व्या श्रुतीचा ध्वनी व च्युत निषाद ३ प्या श्रुतीचा ध्वनी मानावा असे पं. रामामात्य सांगतो. तसेच ह्या त्याच्या म्हणण्याला शारंगदेवाची मान्यता आहे असेही मानतो. अंतर गांधारव च्युत मध्यम गांधार तसेच काकली निषाद हे स्वर त्याने निराळे मानले तर १५ व्या मेलाच्या ऐवजी २० मेल होतात. मेलाला ७ स्वर असलेच पाहिजेत. २० मेलातून ६४ राग निर्माण होतात व त्याचे उत्तम, मध्यम, अधम असे ३ वर्ग केले आहेत.
५. राग प्रकरण
ह्या प्रकरणात ह्या ग्रंथात सांगितलेल्या ६४ रागांची लक्षणे दिली आहेत. -
1) क्रमाने श्रुती ध्वनीने उंच, २) ७ शुद्ध स्वरात २२ श्रुतींची वाटणी, ३) स्वर आपल्या शेवटल्या श्रुतीवर अभिव्यक्त होतो. ४) श्रुतींवर स्वर उत्पन्न होतो. ५) स्वराला अनुरणन असते. ६) तो स्वत: रंजक असतो. ७) रत्नाकराचा शुद्ध मेल मुखारीच आहे. ८) मेलातून राग निघतात. ९) शुद्ध व विकृत मिळून १२ स्वरांनी राग गाविला जातो. १०) गुर्जरी - मालवगौड मेलोत्पन्न, षाडव वर्ज्य, ग्रह अंश व न्यास स्वर ऋषभ, दिवसाच्या पहिल्या प्रहरी. अशा प्रकारे रामामात्याने आपल्या 'स्वरमेलकलानिधी' ह्या ग्रंथात पाचही प्रकरणात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.