पं.श्रीनिवास व रागतत्त्वविबोध
पं.श्रीनिवास ह्यांच्याविषयी वैयक्तिक स्वरूपात जास्त माहिती उपलब्ध नाही. यांचा जन्म १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात ब्राह्मण कुळात झाला. संस्कृत भाषा, शास्त्र, संगीतशास्त्र व कला ह्या विषयांचा त्याचा गाढा अभ्यास होता. हा अहोबलाचा अनुयायी होता. 'संगीत पारिजात' ह्या अहोबलाच्या ग्रंथातील जे जे विषय त्याला संदिग्ध वाटले, ते ते त्याने आपल्या ग्रंथात स्पष्ट करून सांगितले.
ग्रंथसार -
पं.श्रीनिवास ह्याने गायनाला अनुकूल अशा वेदऋचा ग्रंथाच्या प्रारंभीच उद्धृत केल्या आहेत. पं. अहोबल हे पहिलेच विद्वान शाखकार होते ज्यांनी सर्वप्रथम वीणेच्या' तारेवर बारा स्वरांची स्थाने निश्चित करून तारेची लांबी काढली होती, परंतु काही स्थाने स्पष्ट नव्हती. त्यांचेच अनुसरण करून श्रीनिवासने वीणेच्या तारेवर स्वरांची स्थाने निश्चित केली. नंतर श्रुतिसंख्या २२ सांगून त्यांची नावे व त्यांच्या जाती त्याने सांगितल्या. श्रुती व स्वर यातील भेदही त्याने अहोबलाच्या ग्रंथाप्रमाणेच सांगितला.
'चतुश्चतुश्चतुश्चैव' ह्या सूत्राप्रमाणे सा म प ४ श्रुती, रे-ध-३ श्रुती व ग-नि-२ श्रुती हीच २२ श्रुतींची मांडणी त्यानेही केली. 'जो नाद मनाचे रंजन करतो त्याला स्वर म्हणावे. ध्वनिभिन्नता असल्यावाचून स्वर वेगळा होत नाही,' असे प्रतिपादन केले. पर्यायी नामे शुद्ध ऋषभाला पूर्व गंधार, शुद्ध गंधाराला तीव्रतर ऋषभ, शुद्ध मध्यमाला अतितीव्रतम गंधार, शुद्ध धैवताला पूर्व निषाद व शुद्ध धैवताला तीव्रतर धैवत अशी स्वरनामे दिली. षड्ज पंचम अचल स्वर म्हणजे श्रुती न सोडणारे सांगितले आहेत. लोचन व अहो बलाप्रमाणे ह्या ग्रंथातील शुद्धस्वरसप्तक हल्लीच्या काफीच्या स्वरसप्तकाप्रमाणे दिसते. आपल्या नियतश्रुतीवर जेव्हा शुद्ध सात स्वर असतात तेव्हा त्या स्वरसमुदायास षड्जग्राम म्हणतात. स्वरांच्या विशिष्ट कंपनास गमक म्हणतात, अशी गमकसंख्या १५ आहे. रागोत्पत्ती करणाऱ्या स्वरसमुदायास मेल म्हणतात अशा मतांचे ग्रंथात प्रतिपादन केले. १०४ रागांना भिन्न मेलात बसविले. अशा ह्या थोर ग्रंथकाराचा मृत्यू १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला.