पं. अहोबल व संगीत पारिजात
पं. अहोबल यांचा काळ १६ व्या शतकाच्या शेवटी समजला जातो. हे दाक्षिणात्य पंडित द्रविड ब्राह्मण कुळातले. वडील कृष्ण पंडित हे अतिशय विद्वान त्यांच्याजवळ अहोबलाने प्रथम संस्कृत भाषा व संगीताचे अध्ययन केले. दक्षिणी संगीताचे अध्ययन संपल्यावर त्यांनी उत्तरेकडे प्रयाण केले. निजामाच्या मुलखात धनवड या शहरी ते तेथील राजाच्या आश्रयाने राहिले. काही दिवसांनी पंडित लोचन याचे संगीतावरील संस्कृत ग्रंथ अहोबलाच्या पाहण्यात आले. त्यात प्रतिपादिलेली संगीतपद्धती आपल्या प्रांतात प्रसारार्थ घेऊन त्यांनी संगीतावर संस्कृत भाषेत एक मौल्यवान संगीत ग्रंथ लिहिला, तोच हा 'संगीत पारिजात'. हा ग्रंथ उत्तरी आणि दक्षिणी दोन्ही संगीत पद्धतींमध्ये आधारभूत व महत्त्वाचा मानला जातो. ह्या ग्रंथात स्वर, राग, ताल, वाद्य व नृत्य इत्यादी विषय चर्चिले आहेत. विशेषकरून ज्या तीन महत्त्वाच्या गोष्टी त्याने सांगितल्या त्या इतर कुणीही सांगितल्या नाहीत.
१. ह्या ग्रंथात त्याने त्या काळात जे बारा स्वर प्रचलित होते त्यांची स्थाने तारेच्या लांबीने निश्चित केली. म्हणजेच बारा स्वरांची स्थाने वीणेवर निश्चित करून प्रत्येक स्वराची तारेची लांबी सांगितली.
२. षड्ज ग्रामातील पहिल्या चार स्वरांच्या दीडपटीने पुढील ४ स्वर उंच असतात है सांगितले.
३. श्रुती व स्वर भिन्न नसून एकच आहेत हे सांगितले.
ग्रंथसार -
पं. अहोबल ही संगीताच्या इतिहासातील पहिली व्यक्ती की जिने प्रथम वीणेच्या तारेच्या लांबीवर स्थाने निश्चित केली. श्रुतिसंख्या २२, शुद्ध स्वर ७, विकृतस्वर २२, ५ जाती, स्वरांच्या जाती, रंग व देवता, १२५ रागांचे वर्णन, अलंकार व गमकेचे प्रकार इत्यादी सांगितले गेले. सा-प अचल व इतर स्वर तीव्र व विकृत मानून, षड्ज हा एकच ग्राम शिल्लक राहिला. ह्या ग्रामातही पहिले ४ स्वर 'सा रे ग म' व याच्या दीडपटीने 'पधनिसां' असे तो सांगतो. मध्यम ग्राम कां नाही ? ह्याचे उत्तर पंचम स्वर अचल झाल्याने मध्यम ग्राम होऊ शकत नाही, हे होय. मध्यम ग्रामात पंचम एका श्रुतीने खाली येतो आणि येथे पंचमात विकृती नाही म्हटल्यावर मध्यम ग्रामाची उत्पत्ती होऊ शकत नाही. ५ स्वरांच्या आरोहावरोहाला मूर्च्छना म्हणतात इ. माहिती ह्या ग्रंथात सांगितली आहे. कूटताना, खंडमेरू, नष्टोदिष्ट इत्यादी विषयांचाही उहापोह केला आहे. वर्नालंकाराच्या व्याख्या १५ प्रकारच्या गमका, वादी, संवादी, अनुवादी, विवादी इत्यादी तसेच ओडव, षाडव, संपूर्ण ह्या जाती, थाट व मेल ह्या शब्दाचे पारिभाषिक अर्थ व वर्गीकरण, रागाची व्याख्या व रागाचे १२२ प्रकार हे सर्व चर्चिले आहेत.
पं. अहोबल हा ग्रंथकार चतुर व कल्पक होता. श्रुती व स्वर ह्यात काही फरक नाही, षड्ज पंचमभाव म्हणजे दीडपटीचे प्रमाण हे स्पष्ट करून १२ स्वरांची तारेच्या लांबीवरून स्थाने ह्यापूर्वी कुणीच सांगितली नव्हती. पहिल्या कांडात शुद्धा भिन्ना, गौडी, बेसरा, साधारणी ह्या पाच प्रकारच्या गीती, संगीताचे दोन भेद बद्ध व अनिबद्ध, उद्ग्रह मेलपाक, ध्रुव, अंतरा व आभोग असे गीताचे ५ भाग. प्रबंधाचे ३८ प्रकार व ६ अंगे पर, ताल, स्वर, पाट, तेन व बिरुद असे, गीतांचे गुणदोष, प्रबंधांचे ३८ प्रकार, वाग्येयकार त्याचे भेद व गायकाचे गुणदोष हे सर्व विषय प्रथम कांडात आले आहेत. दुसऱ्या कांडात प्रथम तत, अवनद्ध, सुषिर असे वाद्यांचे ४ भेद असून सुमारे ४० वाद्यांची माहिती, नंतर तालाचे १० प्राण सांगून त्यांची लक्षणे व २०० देशी ताल सांगितले आहेत.तिसरे कांड हे नृत्य कांडच आहे.अहोबलाने रागांचे वर्णन करताना गौरीनिल समुद्भुत असे २० मेल सांगितले. उत्तरी संगीताचा त्याचा अभ्यास असला तरी दक्षिणी पद्धतीचा पगडा त्याच्यावर होताच नाहीतर तिसरे कांड हे नृत्य कांडच आहे. त्याने मेल हा शब्द वापरला नसता. लोचनाने संस्थान शब्द योजिला आहे. घाटाची मेलनामे शुद्धागौरी, मालवगौडी, मुखारी, भैरवी, बेलावाडी, शंकराभरण, श्री, नाट, भैरवी अशी दिली आहेत. पं. अहोबलाने १७ व्या शतकात तारेची लांबी सांगितली तर पाश्चात्यांनी ती १९ व्या शतकात सांगितली व त्यात साम्य आहे, ह्यावरून त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करावेसे वाटते. अशा ह्या बुद्धिमान शाखकार पं. अहोबलाचे १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात निधन झाले.