पं. व्यंकटमखी व चतुर्दण्डप्रकाशिका
दक्षिण भारतातील प्रसिद्ध संगीतज्ञ पं. व्यंकटमखी ह्यांचा 'चतुर्दण्डप्रकाशिका ग्रंथ दक्षिणी संगीत पद्धतीत मान्यता पावला व आजही तो प्राचीन ग्रंथात श्रेष्ठ मानला जातो. ह्यांचे पूर्ण नाव व्यंकटेश्वर गोविंद दीक्षित होते. आईचे नाव नागमांबा होते. वडील तंजावरचा अंतिम राजा श्री विजय ह्याच्या दरबारी दिवाण होते. त्याच दरबारात पं. व्यंकटेश गायक म्हणून नियुक्त झाले होते. इतिहासकारांच्या मते राजा विजय राघव इ. स. १६६०मध्ये सिंहासनावर बसला. हा राजा शूर तर होताच पण त्याला सर्व ललितकलांची आवड होती. त्याच्याच दरबारी राहून व्यंकटेश्वराने 'चतुर्दण्डिप्रकाशिका' हा ग्रंथ लिहिला. व्यंकटेशाने पं तानप्पाचार्य ह्यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. व्यंकटमखींची गुरुपरंपरा शारंगदेवापर्यंत जाते. त्यांचे दुसरे बाबा गुरु 'होराचार्यांच्याकडून त्यांच्या गुरुपरंपरेची माहिती मिळते. आपल्या गुरुवर्यांकडून यथोचित ज्ञान संपादन करून पं. व्यंकटेशाने 'राग आरभी' मध्ये गुरूच्या वर्णनासंबंधी 'गंधर्व जनता खर्व' ही रचना केली. हे गीत आजही दक्षिणी संगीतात प्रचलित आहे.
'चतुर्दण्डिप्रकाशिका' याचा शाब्दिक अर्थ 'चार दण्डांना प्रकाशित करणारा' असा होतो. पं. व्यंकटेश्वराने सांगितले की संगीताचे चार दण्ड म्हणजे स्तम्भ आहेत, ते असे १. आलाप, २. स्थाय, ३ गीत व ४. प्रबंध. या चार स्तंभांवरच संगीताची इमारत उभी आहे. संगीतविषयक मौलिक माहिती देणारा म्हणून त्यांना 'व्यंकटमखी' म्हणू लागले. आपल्या सुप्रसिद्ध 'चतुर्दण्डिप्रकाशिका' ह्या ग्रंथान पं. व्यंकटमखी ह्यांनी गणिती पद्धतीने हे सिद्ध केले की एका मेलातून (घाटातून) जास्तीत जास्त ७२ रागांची निर्मिती होऊ शकते. परंतु प्रचारात त्यांनी फक्त १९ रागांनाच मान्यता दिली. एका सप्तकात सात शुद्ध व पाच विकृत असे बारा स्वर मानले. पं. व्यंकटमखीनंतर त्यांचा प्रभाव सर्व दाक्षिणात्य संगीतकारांवर पडला. पं. त्यागराज, श्यामाशास्त्री, मुकुटस्वामी दीक्षित इत्यादी सर्व विद्वानांनी त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांच्या आधारावरच आपल्या गीतरचना केल्या. १७ व्या शतकाच्या अखेरीला तंजावर येथे पं. व्यंकटमखी ह्यांचे निधन झाले.