पं. जयदेव व गीतगोविन्द
पं. जयदेव थोर संगीतज्ञ होते. उत्कृष्ट वाग्गेयकार होते. त्यांची 'गीतगोविन्द' ही एक अजरामर कृती आहे. गीतगोविन्दातील बहुतांश पदे गेय- लयतालछंदोबद्ध व रागबद्ध असून त्यांनी त्या पदांवर रागांची नावे व तालांची नावेही दिली आहेत. परन्तु त्या काळात स्वरलिपी नसल्याने त्यांच्या स्वर-रचना नाहीत. ती पदे ते स्वतः गात असत. संस्कृतमधील त्या पदांचा अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला असून लॅटिन, जर्मन व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला आहे. ही पदे भावपूर्ण, रसयुक्त व लालित्य यामुळेच गेयतेतही उत्कृष्ट ठरली. 'गीतगोविन्दा'तील ह्या पदांमध्ये राधाकृष्णाच्या लीलांचे वर्णन आहे. या गीतांना 'अष्टपदी' असे म्हणतात. अनेक पदे आजही वैष्णव मंदिरात रागात व तालात गायिल्या जातात. दक्षिणेतील मंदिरात नृत्यासाठी अष्टपदी घेतात. कवी जयदेवांचा जन्म १२ व्या शतकात बंगालमधील केंडुला गावी झाला. ह्यांच्या पित्याचे नाव श्रीमजीपदेव होते. बालपणातच आईवडिलांचे निधन झाल्याने ते उदास होऊन जगन्नाथपुरीला गेले व तेथील पुरुषोत्तम धाम येथे राहू लागले. काही दिवसानंतर ते तीर्थयात्रेला निघाले. भ्रमण करीत असताना त्यांचा विवाह झाला. पत्नीसह ते पुन्हा भ्रमण करू लागले त्यावेळी त्यांनी गीतगोविन्दाची रचना केली. ऐन तारुण्यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला व पुन्हा ते खोल निराशेच्या गर्तेत बुडाले. त्यांना वैराग्य प्राप्त झाले. पुढे वैष्णव संप्रदायाचे महात्मा श्री यशोदानन्दन यांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले. हे गुरू ब्रजनिवासी होते. पत्नीच्या मृत्यूपूर्वी काही दिवस ते सन्मानाने राजदरबारी राहिले होते. परन्तु तिच्या मृत्यूनंतर त्यांनी राजाश्रय सोडला व आपल्या मातृभूमीला ते परतले. तेथे संन्यासी जीवन व्यतीत करीत असताना त्यांचा मृत्यू झाला. तेथे त्यांची समाधी बांधली असून आजही दरवर्षी मकरसंक्रांतीला तेथे जत्रा भरते.