किशोरी अमोणकर
हिंदुस्थानी गायन परंपरेमध्ये किशोरी आमोणकर ह्या जयपूर घराण्यातील एक अग्रगण्य गायिका म्हणून ओळखल्या जातात. किशोरी आमोणकर यांचा जन्म १० एप्रिल १९३२ रोजी मुंबई या ठिकाणी झाला. त्यांचे वय सहा वर्षाचे असतानाच वडिलांचे छत्र हरपले. त्यांनी त्यांची आई व जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. अगदी कमी वयातच जयपूर घराण्यातील संगीताचे धडे पूर्ण करत असतानाच आपल्या बुद्धी, कौशल्याच्या व कल्पकतेच्या आधारावर नवीन गायन शैलीची निर्मिती केली. मोगूबाई कुर्डीकर यांच्या व्यतिरिक्त किशोरी आमोणकर यांनी भेंडी बाजार घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अंजनीबाई मालपेकर, आग्रा घराण्याचे अन्वर हुसेन खान, ग्वाल्हेर घराण्याचे शरदचंद्र अरोलकर व बाळकृष्ण बुवा पर्वतकार यांच्याकडे देखील संगीताचे शिक्षण घेतले.किशोरी आमोणकर यांच्या मैफिलीमध्ये इतर रागांच्या बरोबर जौनपुरी, पटदिप, बिहाग, अहिर तसेच ठुमरी, भजन व ख्यालाचाही समावेश असे. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीबरोबरच चित्रपटांमधील गाणी गाण्याचीही त्यांना आवड होती त्यामुळेच १९६४ मध्ये त्यांनी ‘गीत गाया पत्थरोन’ या चित्रपटातील गाणी गायली.किशोरी आमोणकर यांनी आकाशवाणीसाठी १९५२ मध्ये गायला सुरुवात केली. तसेच १९५७ मध्ये पंजाबमधीलअमृतसर या ठिकाणी शास्त्रीय गायनाचा पहिला कार्यक्रम सादर झाला. ‘शृगेरी मठातील जगद्गुरू ‘महास्वामी’ यांनी किशोरी आमोणकर यांना ‘गान सरस्वती’ या उपाधीने सन्मानित केले. ‘प्रभात’, ‘समर्पण’ तसेच बॉर्न टू सिंग या सह अनेक अल्बम त्यांनी तयार केले.संगीत क्षेत्रातील अलौकिक योगदानाबद्दल १९८५ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. या व्यतिरीक्त भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल १९८७ मध्ये ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच २००२ मध्ये ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.किशोरी आमोणकर यांनी सांगीतिक कार्यक्रम, स्वतःचा रियाज सांभाळत असताना अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण दिले. किशोरी आमोणकर यांनी जे असंख्य शिष्य घडवले त्यापैकी माणिक भिडे, अश्विनी देशपांडे-भिडे, आरती अंकलीकर, गुरिंदरकौर असे अनेक प्रख्यात शिष्य आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील या गायिकेचे वयाच्या ८४ व्या वर्षी म्हणजेच ३ एप्रिल २०१७ रोजी मुंबई या ठिकाणी निधन झाले. किशोरी आमोणकर जरी शरीर रुपाने नसल्यातरी त्यांच्यातील संगीत व भावपूर्ण गायकिने आजही संगीत परिवारात असल्याचे दिसून येतात.