संगीतातील घराणी
घराण्याचा उगम :
'घराणे' हा शब्द उच्चारला की आपण आपल्या दैनंदिन जीवनात ऐकलेले शब्द व्यक्ती 'राजघराण्यातील आहे किंवा अमुक व्यक्ती 'प्रतिष्ठित घराण्या'तली आहे अमुक अशा संदर्भात ऐकल्यावर 'घराणे' ह्या शब्दाचा अर्थ 'एका चांगल्या व विशिष्ट कुळाची व परंपरा असलेलं, समाजात नावलौकिक पावलेलं कुटुंब' असा बोध होतो. ह्याचा अर्थ ह्या कुटुंबाची परंपरा कुटुंबाचा मागोवा घेणारी असते. कोणत्याही कलेचा इतिहास पाहिला तर तिच्या मागे एक परंपरा असते, तिचे महत्त्व समाज मानीत असतो. कुठल्याही विद्येचा मूळ उद्गाता, निर्माता कोण ह्याचा शोध घेणं हा मानवी स्वभाव आहे. आपल्या भारतात विद्येचा निर्माता ब्रह्मदेव, विद्येची देवता सरस्वती किंवा संगीताची गंगोत्री सामवेदात आहे असे मानतात. येथूनच संगीताची परंपरा सुरू झाली असली तरी भारतीय संगीतात घराण्याचा उगम केव्हा झाला हे सांगणे कठीण आहे. संगीतावरील प्राचीन वाङ्मयात 'घराण्याचा 'चा उल्लेख नाही. सातत्याने चालत येणारी परंपराच घराणं निर्माण करू शकते. 'घराणे' ह्या शब्दाला समकक्ष अशा संज्ञा प्राचीन वाङ्मयात आढळतात. वैदिक काळात सामगायनाच्या अनेक शाखा प्रचलित होत्या. उदा. जैमिनी वगैरे. त्यानंतर गांधर्व काळात मागधी, अर्धमागधी, संभाविता, पृथुला ह्या गीतशैली प्रचारात आल्या होत्या. पुढे मतंगाच्या काळात सुद्धा भिन्ना, गौडी, बेसरा, साधारणी ह्या गीतशैली प्रचारात आल्या. यातूनच पुढे ध्रुपदाच्या वाण्या प्रचारात आल्या व ह्या बाण्यांचेच परिवर्तन ख्यालगायकीच्या काळात घराण्यात झालेले दिसून येते.
१३ व्या शतकापासून हिंदुस्थानावर मुसलमानांची सतत आक्रमणे सुरू झाली. त्यांनी आपले संगीत आत्मसात केले व त्यात त्यांनी स्वतःच्या कल्पनेने जी भर टाकली ती संगीताची शैली घराण्याच्या चौकटीत बंदिस्त केली व जपून ठेवली. १३ व्या शतकात अमीर खुसरोने 'ख्यालगायन' हा नवीन प्रकार प्रचारात आणला व त्या ख्यालगायनाच्या भिन्न भिन्न शैली अस्तित्वात आल्या. अभिजात संगीतातील विकसित अवस्था म्हणून ख्वालगायकीने ध्रुवपदगायकीनंतर हिंदुस्थानी संगीतात प्रवेश केला. ध्रुवपदगायनापेक्षा ख्यालगायनात कलावंताला स्वतःच्या प्रतिभेला योग्य तो न्याय देता येऊ लागला. पहिला फरक पडला तो स्वरांच्या मांडणीत. परंपरेने चालत आलेली गायकी, तिचा तपशील, आराखडा व वळणे यांच्यासह माहिती असली तरी ती गायकाला स्वतःच्या अंगाने उच्चारावी लागते. गायकीच्या दृष्टीने त्यातील भावोत्कटता प्रभावी असावी लागते. त्याच्या सुराचा लगाव कलात्मक असावा लागतो. आपल्या प्रकृतिधर्मानुसार व आपल्या प्रतिभेच्या सामर्थ्यानुसार स्वतंत्रपणे कलाविष्कार करण्याची संधी ख्पालगायकीने गायकाला प्राप्त करून दिली. कलावंताच्या कल्पकतेला वाव मिळाला परंतु त्याबरोबरच आपल्या गुरूकडूनमिळालेल्या ज्ञानाचा वारसा जपण्याचीही जबाबदारी येऊन पडली. प्रत्येक घराणं परंपरेने ती गायनशैली आपापल्या परीने जपून ठेवू लागलं. प्रत्येक आविष्कार शैली एका विशिष्ट पद्धतीने मांडली जाऊ लागली. ह्या सर्व आविष्कारपद्धतींना इतरांपासून वेगळेपणा प्राप्त झाला आणि त्या शैलींनाच 'घराणी' असं नाव पडलं. प्रत्येक कलावंताला आपल्या घराण्याचं कर्तृत्व सिद्ध करावं लागलं. आपल्या घराण्याची प्रतिष्ठा जपावी लागली. ख्यालगायकीची अनेक घराणी सरंजामशाहीतच निर्माण झाली. बहुतेक सर्व घराणी ग्वाल्हेर गायकीतूनच निर्माण झाली. कारण अकबराच्या वेळेपासून ग्वाल्हेर हे संगीतकलेचे माहेरघर होते. ग्वाल्हेरहून संगीताचे शिक्षण घेऊन बहुतेक नायक पोटासाठी संस्थानांच्या दरबारात नोकरीला राहिले. या त्यांच्या संस्थानांच्या नावांवरूनच घराण्यांची नावे पडली आहेत. उदा. ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, पतियाळा इ. ह्या घराण्यांच्या बाबतीत सविस्तर विचार करायचा तर ते का व कसे उत्पन्न होते हे बघावे लागेल.
घराणे का व कसे निर्माण होते ?
नादातून संगीताची उत्पत्ती होते. नाद है संगीताचे उपादान आहे परंतु नाद हा क्षणजीवी असतो. अनुसरणाने त्याचे अस्तित्व टिकवता येते. परंतु हा नाद चिरंजीवी करण्यासाठी त्याकाळी ध्वनिमुद्रणाचे तंत्र विकसित झाले नव्हते. मग कुठल्याही गायकाची शैली चिरकाल टिकावी, ऐकायला मिळावी ह्यासाठी आपले शिष्य तयार करून ही शैली समाजात लोकप्रिय करणं, संगीताचा वारसा जपून ठेवणं ह्या इच्छेमधूनच घराण्याची कल्पना उगम पावली असावी. गायकाच्या गायनाचा ठेवा किंवा वारसा हा तंतोतंत त्याच्यासारखे गाऊनच जपायचा, ह्यातून संगीतकलेतील गुरुशिष्यपरंपरेलाही प्रोत्साहन मिळाले नि ह्यामुळेच आजतागायत संगीतकला जोपासली गेली. गुरुशिष्यपरंपरेतून संगीत कलेला सातत्य लाभते त्यातूनच घराण्याचा उगम होतो, घराण्यांचे संवर्धन होते, घराणी- नावलौकिकास येतात.
अभिजात संगीतात घराण्यांचे महत्त्व
भिन्न भिन्न आवाजधर्म असणारे शिष्य कंठसाधना करून, गुरूचा स्वर, त्याची शैली आपल्या गळ्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात. गुरूच्या गळ्यातील गुणधर्म आपल्या गळ्यात उतरवण्यास शिष्याला वर्षानुवर्षे लागतात. हे अभिजात संगीताचे संस्कार गळ्यावर बसविणे फार कठीण असते. तपस्या व मनोबल पणाला लावावे लागते व हे सर्व गुरूच्याच मार्गदर्शनाने साध्य करणे शक्य होते. गुरूची शैली तंतोतंत आत्मसात करणे हे ध्येय बाळगून परंपरेने शिष्य हा वारसा पुढे चालवितात, ह्यातून घराणी चालू राहतात, हे घराण्याचे महत्त्वाचे कार्य आहे.
घराण्याच्या प्रस्थापनेची तत्त्वे :
१. घराण्याला तीन पिढ्यांचे सातत्य हवे. घराण्याचा संस्थापक, त्याचे शिष्य व ह्या शिष्यांचे शिष्य. ज्या घराण्यात ही शिष्यपरंपरा होत नाही ती घराणी पुढे मूळ धरूनही त्यांचा वृक्ष होत नाही. उदा. पं. भास्करबुवा बखले, कै. पं. वझेबुवा ह्यांची गायकी सुंदर असूनही त्यांची स्वतंत्र घराणी नाहीत, याउलट जयपूर, आग्रा, " किराना, ग्वाल्हेर, पतियाळा, इंदोर ह्यांची गायकीची घराणी त्यांच्या शिष्यांमुळे चालू राहिली.
२. घराण्यांच्या गायकीत रीतभात, शिस्त आणि अंतर्गत कायदे यांचे पालन करायला हवे. हे पालन गायकाने आपल्या गायकीची रीत तिची सौंदर्यप्रणाली, तिचे अंतर्गत कायदे हे स्वतःच्या आवाजधर्मावर आधारित ठेवून गायन सुश्राव्य करायचे असते.
३. प्रत्येक घराणे हे संस्थापकाच्या आवाजधर्मावर आधारलेले असते. घरंदाज गायकी ही आवाजाचा लगाव, सुरेलपणा, वजन, स्वराला स्थिर ठेवणे ह्यावर अवलंबून असते.
४. अभिजात संगीतात शब्दप्रामाण्य गौण व स्वरविलास महत्त्वाचा असतो. शब्दाश्रित भावनेला गौण स्थान असून स्वराश्रित भावना प्रमाणभूत असणे ही घरंदाज गायकीची प्रतिज्ञा आहे. प्रत्येक घराण्याने कमीअधिक प्रमाणात ही सांगीतिक शुद्धता वा संयम पाळला आहे. कोणत्याही घराण्याने स्वरप्रामाण्याचे ब्रीद सोडलेले नाही.
संगीताचे दोन घटक स्वर व लय यांच्या विलासाला जास्तीत जास्त अवकाश ज्या गायकीमध्ये सांभाळला जातो तिच्यातच संगीताचे मूलभूत सामर्थ्य निर्माण होऊ शकते. संगीतबाह्य गोष्टींचा जिथे ताबा असतो तिथे संगीताच्या स्वरविलासाला वाव मिळत नाही व म्हणून तिथे घराणीही निर्माण होत नाहीत.