पतियाळा घराणे
सदारंगांच्या तिसऱ्या पिढीत ग्वाल्हेर घराणे व चौथ्या पिढीत दिल्ली व किराणा ही घराणी निर्माण झाली. मिया अचपल है दिल्ली घराण्याचे निर्माते, ह्यांचे चिरंजीव तानरसखाँ व तानरसखाँचे शिष्य कालेखाँ ह्यांनी पतियाळा घराण्याची निर्मिती केली. कालेखाँचा आवाज अतिशय चपळ होता, त्यामुळे चमत्कृतीपूर्ण आलापी, टप्पा अंगाची ख्याल गायकी, छोट्या छोट्या पण सफाईदार ताना घेऊन अशी एक नावीन्यपूर्ण शैली त्यांनी सुरू केली. ही गायकी पतियाळा घराण्याची म्हणून ओळखली जाऊ लागली. कारण ते स्वतः पतियाळा गावी स्थायिक झाले होते. त्यांनी आपली दोन मुले अलीबरवा व नीरा ह्यांना उत्तम रीतीने संगीताचे शिक्षण दिले. त्यांच्याबरोबर फत्तेअली हा शिष्यही चांगला तयार केला. अलीबक्ष व फत्तेअली ह्यांची जोडी त्यावेळी 'आलियाफत्तू' अशा टोपण नावाने खूप गाजली. कल्पकता, प्रतिभा व मेहनत ह्यामुळे त्यांचे गायन ग्वाल्हेर व जयपूरमधील कलावंतांना मोहित करून गेले. त्यांनी पतियाळा घराण्याला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. अली बख्शांचे पुत्र व कालेखांचे शिष्य म्हणजे बडे गुलाम अलीखाँ हे पुढे पतियाळा घराण्याचे प्रवर्तक ठरले. ते 'सबरंग' ह्या टोपणनावाने ओळखले जाऊ लागले.
पतियाळा घराण्याची वैशिष्ट्ये
१. टप्पा अंगाची ख्याल गायकी, छोट्या छोट्या पण आकर्षक व कलात्मक ताना.
२. आवाजाचा लगाव खुला व ढाला, पण आवाज तिन्ही सप्तकात फिरेल अशी तयारी. आवाज लोचदार व तंबोऱ्याच्या तारेसारखी तेजस्वी झार असते. त्यासाठी तसा आवाज बनविण्याची तालीम दिली जाते.
३. तानांची फिरत व बढत करण्यासाठी आवाज हलका व चपळ बनवला जातो. ताना विविध प्रकारच्या पेचदार, वक्र, आलंकारिक व द्रुत लयीत - गाण्याची जोरदार तयारी.
४. उपशास्त्रीय व लोकसंगीत गाण्याकडे जास्त कल पंजाबी ढंगाने ठूमरी व भजने म्हणण्याकडे जास्त कल.
५. रसोत्पत्ती करण्यासाठी स्वर, शब्द व लय ह्यांचा सुंदर समन्वय साधला जातो.
६. प्रचलित राग गायनावर भर, चमत्कृतीपूर्ण ताना घेऊन गायनात सौंदर्यनिर्मिती करण्याकडे जास्त कल.