नाट्यसंगीत
मराठी संगीत नाटकांची परंपरा
महाराष्ट्रात नाट्यसंगीताचा दैदीप्यमान असा इतिहास आहे. वैदिक कालखंडातसुद्धानाटक हा प्रकार अस्तित्वात होता. उत्सव, यात्रा यांतून नाटकांचे प्रयोग होत असत. या नाटकांना ‘पारंपरिक रंगभूमी’ किंवा ‘लोकरंगभूमी’ असे म्हणता येईल. संस्कृत नाटके आल्यानंतरसुद्धा ही रंगभूमी आपले अस्तित्व टिकवून होती. पूर्वीच्या काळी कठपुतळीच्या माध्यमातून नाट्याविष्कार होत असे. ही नाटके पौराणिक कथांवर आधारित असायची. यात संगीताचा पुरेपूर वापर केलेला असायचा. महाराष्ट्रात तमाशा, गोंधळ, जागरण, भारूड, ललित इत्यादी लोककला अस्तित्वात होत्या. यांतून सर्वसामान्य लोक आपले मनोरंजन करून घेत असत. परंतु सुशिक्षित लोकांच्या करमणुकीसाठी म्हणून व इंग्रजी नाटकांच्या प्रभावातून मराठीत लिखित नाटके आली. यातूनच एका नव्या रंगभूमीचा जन्म झाला. विष्णुदास भावे यांनी ‘सीता-स्वयंवर’ हे नाटक रंगभूमीवर आणले. तेव्हापासून मराठी रंगभूमीचा अरुणोदय झाला असे म्हणता येईल. सुरुवातीच्या काळात नाटकांचा विषय हा पौराणिक असायचा. ही नाटके संगीताने परिपूर्ण असायची. अशा प्रकारे मराठी नाटक व संगीत असे एक समीकरण सुरुवातीपासूनच झाले होते. नाटकातील सूत्रधार हाच गायक असायचा. या काळातील नाटकांत शास्त्रशुद्ध संगीत नसायचे. क्वचित एखाद्या साध्या रागाचा उपयोग व्हायचा. हे संगीत हरिदासी वळणाचे असायचेमराठी रंगभूमीचे विवीध कालखंड मराठी रंगभूमीवरील संगीताच्या वाटचालीचे सर्वसाधारणपणे चार खंडांत विभाजन करता येईल.
१. इ. स. १८८० ते १९१० (किर्लोस्कर कालखंड)
२. इ. स. १९११ ते १९३५ (खाडिलकर कालखंड)
३. इ. स. १९३६ ते १९५५ (मराठी रंगभूमीच्या उत्कर्षाचा कालखंड)
४. इ. स. १९५५ ते आजपर्यंत - (मराठी रंगभूमीला नवसंजीवनी देणारा काळ).
(१) किर्लोस्कर कालखंड
मराठी रंगभूमीच्या विकासात अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी ३१ ऑक्टोबर, १८८० मध्ये ‘अभिज्ञान शाकुंतल’ हे नाटक रंगभूमीवर आणले. प्रेक्षकांना समजणारी भाषा, नाटकातील प्रसंगांना अनुरूप नाट्यरचना त्यांनी केली. त्यांनी साकी, दिंडी, लावणी, भजने इत्यादीच्या चाली नाट्यसंगीताला लावल्या. याचबरोबर त्यांनी नाटकातील पात्रांनी गाणी म्हणण्याचा प्रघात पाडला. अशा प्रयोगांमुळे किर्लोस्करांना मराठी रंगभूमीचे जनक म्हटले जाऊ लागले
(२) खाडिलकरांचा कालखंड
मराठी रंगभूमीवर क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचे कार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी केले. नाट्यसंगीताला बहराचा काळ आणला तो खाडिलकरांनीच. बालगंधर्वांसारख्या कलावंतामुळे खाडिलकरांचे नाव पुढे आले.
(३) कोल्हटकरांचा कालखंड
किर्लोस्करी संगीतात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला तो श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी पूर्वी सूत्रधार व नटीच्या प्रवेशाने नाटकाची सुरुवात व्हायची. परंतु त्यांनी मंगलाचरणाने नाटकाची सुरुवात करण्याची प्रथा सुरू केली. त्यांनी ‘मूक नायक’, ‘मतिविकार’, ‘वीरतनय’ इत्यादी नाटके रंगमंचावर आणली. ही सर्व नाटके, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी होती. रंगभूमीवर नवीन संगीत रुजवण्याचे कोल्हटकरांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. परंतु जो नवीन नाट्यप्रवाह त्यांनी सुरू केला, त्याचा फायदा पुढील नाट्यसंगीताला झाला.
४) राम गणेश गडकरी यांचे योगदान
मराठी रंगभूमीला खतपाणी घालून वृद्धिंगत करणारे कलावंत म्हणजेच राम गणेश गडकरी हे होत. त्यांनी ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘एकच प्याला’ इत्यादी नाटके लिहिली. गंधर्व कंपनीने ‘एकच प्याला’ हे सामाजिक नाटक २०-२-१८९५ रोजी रंगभूमीवर आणले. यातील भाषा, संवाद, पदांना लावलेल्या चाली, बालगंधर्वांचे हृदयस्पर्शी गायन इत्यादींमुळे हे नाटक व त्यातील संगीत लोकप्रियतेच्या अतिउच्च शिखरावर पोहोचले.
(५) बोलपटांची सुरुवात
नाट्यसंगीताला सोन्याचे दिवस आले असतानाच १९३१ साली बोलपटांची सुरुवात झाली. त्यामुळे मराठी रंगभूमीवर जबरदस्त आघात झाला. नाट्यसंस्था बंद पडू लागल्या. रंगभूमीवरील कलावंत चित्रपटांकडे वळू लागले. स्वस्त तिकिटे व नवलाईमुळे श्रोते चित्रपटांकडे आकर्षित होऊ लागले. अशा अवस्थेत नाटकातील जुनेपणा काढून नावीन्य आणण्याचा प्रयत्न झाला. ‘नाट्यमन्वन्तर’ या संस्थेत ‘आंधळ्यांची शाळा’ हा प्रयोग सादर केला. या काळात केशवराव भोळे, आचार्य अत्रे, मा. कृष्णराव व रांगणेकर यांनी रंगभूमी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. १९४३ साली मराठी रंगभूमीचे शताब्दी वर्ष आले. पूर्वी लोकप्रिय झालेली नाटके पुन्हा सादर होऊ लागली. रसिकांच्या मनात संगीत नाटकांविषयी नव्याने आकर्षण निर्माण झाले. अशा प्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळात संगीताचा विकास झाल्याचे दिसून येते.